मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Maulanas Reaction on Waqf Amendment Bill) वक्फ सुधारणा विधेयकावरून देशभरात राजकीय गदारोळ सध्या सुरु आहे. बहुतांश जण विधेयकाच्या समर्थनात आहेत, विरोधी पक्ष मात्र विधेयकाच्या विरोधात युक्तिवाद करत आहेत. अशातच दोन मौलानांनी वक्फ सुधारणा विधेयकावर दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी विधेयकाचे समर्थन केले आहे, तर मिल्लत कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान या विधेयकाविरोधात आवाज उठवला आहे.
मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांचे म्हणणे आहे की, वक्फ विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे. त्यामुळे मुस्लिमांचा विकास होईल. कारण आतापर्यंत वक्फ बोर्ड आणि माफिया मिळून देशाच्या मौल्यवान जमिनी हडप करत होते. नवीन विधेयक मंजूर होताच सर्व गोष्टी थांबतील. बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची गुंतवणूक मुस्लिम लोकांच्या हितासाठी केली जाईल. वक्फ विधेयक मंजूर होताच सर्व मुस्लिम धार्मिक स्थळे नव्या स्वरूपात विकसित होतील. त्यातून मिळणारे उत्पन्न मुस्लिम महिला व मुलांच्या शिक्षण, वैद्यकीय आदींवर खर्च केले जाईल.
मौलाना तौकीर रझा खान यांचे विधेयकास उघडपणे विरोध नसला तरी असे मुद्दे आणून हिंदूंची देशातील खऱ्या मुद्द्यांपासून दिशाभूल केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, सरकारने असे विधेयक आणून मुस्लिमांना दडपण्याचा निर्णय घेतला आहे. वक्फ जमिनीवर सरकारची वाईट नजर आहे. मुस्लिमांवर गुन्हे केले जात आहेत. वास्तविक वक्फ सुधारणा विधेयक आल्यास कोणाचेच नुकसान होणार नाही, हे स्पष्ट आहे. केवळ मताच्या भूकेपोटी काहीजण वक्फ सुधारणा विधेयकाबाबत खोटे पसरवण्याचे षडयंत्र रचून अनेकांची दिशाभूल करत आहेत.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक