औरंगजेब इथे गाडला गेला! छत्रपती संभाजीनगरमध्ये झळकले मनसेचे बॅनर
02-Apr-2025
Total Views | 23
छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात सध्या वाद सुरु असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे एक बॅनर झळकले आहे. एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होतीये तर दुसरीकडे, औरंगजेब इथे गाडला गेला, अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहे.
रविवार, ३० मार्च रोजी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला असा बोर्ड लावा. तसेच औरंगजेबाची कबर दाखवण्यासाठी शाळेच्या सहली घेऊन जात त्यांना महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला हे सांगितले पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली होती.
त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे. औरंगजेब इथे गाडला गेला असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. यासोबत राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा फोटोदेखील लावण्यात आला आहे. या बॅनरचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.