ज्या काळात स्त्री घराच्या बाहेर पडत नसे, त्या काळात निर्मलाताई लव्हाटे नऊवारी साडी नेसून घराबाहेर पडत, सायकल चालवत शेतमळ्यात जात. शेतीभाती, घरदार आणि त्यासोबतच समाजासाठीही सत्कर्म करणार्या निर्मलाताई आज 92 वर्षांच्या आहेत. आजही त्यांच्या कार्यपद्धतीत काही बदल नाही. तोच उत्साह, तीच निष्ठा, तीच प्रेरणा. तर अशा या कर्मयोगिनी निर्मलाताई लव्हाटे यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
हानपण पुण्यात गेले. समज येण्याआधीच पितृछत्र हरपले. घरची आर्थिक परिस्थिती बिघडली. पण, जगणे तर आवश्यकच होते. त्याकरिता कष्टाशिवाय पर्याय नव्हता. आपल्या आईबरोबरच वेगवेगळ्या घरांत जाऊन वेगवेगळी कामे निर्मलाताईंना करावी लागली. जे वय खेळण्या-बागडण्याचे होते, अशा वयात कष्टाची सोबत करावी लागली. वयाच्या 14व्या वर्षीच चतुर्भूज झाल्या आणि पुण्यावरून रवानगी नाशिकला झाली. नाशिकचे नारायणराव लव्हाटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लव्हाटे कुटुंबीय नाशिकमधील पारंगत वेदशास्त्रांचे घर. त्यांचे सासरे आयुर्वेदाचे डॉक्टर. वेदपारंगत घर पूजाअर्चा करणारे कर्मठ ब्राह्मण असे कुटुंबीय. घरची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम. घरी कामकाजाकरिता अनेक नोकर-चाकर होते. सासरे वैद्यकशास्त्राचे जाणकार होते. नाशिक शहरातील सगळ्यांकरिता स्वेच्छेने विनामूल्य वैद्यकीय सेवा देत होते.
पण, अशी वैद्यकीय सेवा देताना आयुर्वेदिक औषधे स्वतःच्याच घरात बनवली जात असल्याने सगळ्यांनाच तिकडे लक्ष द्यावे लागत असे. अत्यंत कष्टमय गरीब कुटुंबातून निर्मलाताई अत्यंत नावाजलेल्या भरभक्कम घरात आल्या. त्यांचा सर्व गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. कष्टाची जाणीव असल्यामुळे एक रुपयासुद्धा मिळवायला किती कष्ट पडतात, किती त्रास होतो, यांची त्यांना पूर्णतः कल्पना होती. लव्हाटे कुटुंबीयांची अनेक एकरांची शेती होती. परंतु, त्यांचे त्या शेतीकडे लक्ष नव्हते. सदर शेती त्यांनी कसण्यासाठी अनेकांना दिलेली होती. त्यातून जे काही उत्पन्न येईल, ते उत्पन्न लव्हाटे यांच्या घरी येत असे. लव्हाटे शास्त्र्यांनी खरेच किती उत्पन्न येते, आपल्याला किती येते, याकडे कधीच व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितले नव्हते. जे येते, त्यामध्ये ते समाधानी होते. ईश्वराने आपल्याला एवढेच दिले, असा त्यांचा भाव होता.
निर्मलाताई लव्हाटे कुटुंबीयांत येऊन एक तप झाले होते. सासर्यांचे वयोमान वाढले होते. दृष्टी कमी झाली होती. सासूबाईंनाही कामकाज करणे अशक्य झाले. जीवनचक्रातील शेवटचा श्वास सासूबाईंनी घेतला. या धक्क्याने सासरेसुद्धा गडबडले. त्यांचे चित्त विचलित झाले. सासूबाई गेल्यामुळे घराचा कारभार निर्मलाताईंकडे आला. एक तपभर त्यांनी घरातल्या सगळ्या गोष्टींचे फक्त अवलोकनच केले होते. त्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागल्या. आपली जर एवढी शेती, तर त्यापासून आपल्याला उत्पन्न कमी का? आपली शेती जे कुळ कायद्याने करतात, त्यांच्याकडे भरभक्कम पैसा, पण आपल्याकडे काहीच उत्पन्न नाही. अशा वेळी निर्मलाताईंनी आपल्या सासर्यांना सांगितले की, मी आपल्या या शेतीकडे लक्ष देते. खरे म्हणजे तो काळ असा होता, ज्या काळात स्त्री ही घरातच असे. आर्थिक कामकाजाकरिता निर्मलाताईंनी मात्र त्याकडे लक्ष देण्याचे ठरवले. सासर्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. सासर्यांनी सांगितले, “मी तुला एकही पैसा देणार नाही.” निर्मलाताई म्हणाल्या, “चालेल. मला फक्त आपल्या शेतीत जाण्याची तुम्ही अनुमती द्यावी.” नाईलाजास्तव सुनेच्या हट्टापाई सासर्यांनी निर्मलाताईंना शेतीवर जाण्यास परवानगी दिली.
निर्मला त्यामध्येच खुश होत्या. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होती व आपल्या कर्तृत्वावर त्यांचा पूर्णतः विश्वास होता.
निर्मलाताई स्वतःच्या घरापासून सात-आठ किमी लांब असलेल्या म्हणजे आत्ताच्या लव्हाटे नगरमध्ये असलेल्या शेतीत जाऊ लागल्या. ज्या काळात स्त्री घराबाहेर पडत नसे, अशा काळात निर्मलाताई नऊवारी साडी, सायक लवर सोमवार पेठ ते आत्ताचे लवाटे नगर असा प्रवास करू लागल्या. सायकलवरून जाणार्या निर्मलाताई सर्वांनाच अनोख्या वाटत होत्या. समाजाच्या विरुद्ध त्या वागत आहेत की काय, अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. पण या सगळीकडे दुर्लक्ष करून निर्मलाताईंनी शेतीत जाणे सुरूच ठेवले. शेतीचा अभ्यास केला आणि वर्षभरातच त्यामध्ये पैसा कमावून मिळवलेले सर्व आर्थिक उत्पन्न त्यांनी आपल्या सासर्यांच्या हाती सुपूर्द केले. सासरे अवाक् झाले. त्यांना आपल्या सुनेचे कौतुक वाटू लागले. सासर्यांनी सांगितले, “तुला जे योग्य वाटेल, ते तू कर. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी नव्हे, तर तुझ्याबरोबर आहोत.” निर्मलाताईंचा हुरुप वाढला. त्या शेतीतील बारिकसारिक कामे स्वतः शिकू लागल्या. काम करणार्या नोकर-चाकरांना त्यांनी आत्मसन्मान दिला, पण चोरीमारी करण्यास बंधने घातली. शेतीत फक्त त्यांनी उत्पन्न घेतले नाही, तर घेतलेले उत्पन्न मार्केटमध्ये जाऊन विकण्यासाठीसुद्धा ताई तत्पर होत्या. शेतीतील सगळी कामे खत आणणे, बी-बियाणे पेरणे, त्याची मशागत करणे, त्याकडे लक्ष देणे आणि आलेले उत्पादन बाजारात जाऊन विकणे त्याला चांगला भाव मिळवणे अशी सगळी कामे ताई करू लागल्या.
ज्या काळात स्त्री ही घरात असे, त्या काळात निर्मलाताई घराबाहेर पडून आपल्या शेती करू लागल्या. त्याच्यातून त्यांच्या घराचे उत्पन्नही वाढायला लागले. काळानुरूप सायकल जाऊन ‘लुना’वर प्रवास सुरू झाला. वाढत्या नाशिकमध्ये लव्हाटे नगरमधली शेती बंद करून एक 40 एकराचा प्लॉट त्यांनी स्वतः ‘डेव्हलप’ केला. सासर्यांची असलेली संपत्ती नाशिक शहरात असलेले वेगवेगळ्या ठिकाणी असलेले वाडे यांची सर्व माहिती घेऊन त्या सगळ्या वाड्यांवर त्यांनी बारिकसारिक लक्ष देणे सुरू केले. जे भाडेकरू भाडे देत नव्हते, त्यांना ते देण्यास सांगितले. न दिल्यास ते घर रिकामे करून घेऊन त्यामधूनपण त्यांनी उत्पन्नाचा स्रोत उत्पन्न केला. बदलत्या नाशिकमध्ये लव्हाटे नगरमधील 40 एकरांचा प्लॉट त्यांनी स्वतः ‘डेव्हलप’ केला. नाशिक शहरातला असा पहिला प्लॉट एवढा मोठा प्लॉट होता की, ज्याची ‘डेव्हलपमेंट’ स्वतः ताईंनी केली. वाड्यांची देखभाल करणे, प्लॉटची आखणी करणे यांकरिता आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींची माहितीसुद्धा त्यांनी करून घेतली. वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याससुद्धा त्या कचरल्या नाहीत. येणार्या सर्व संकटांना सामोर्या जात विविध प्रकारची कामे करत त्यांनी एक अत्युच्च असे शिखर गाठले.
शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. अधिक लक्ष केंद्रित करून त्यांनी उत्पन्न वाढवले. घरातील कर्त्या पुरुषाप्रमाणे लव्हाटे कुटुंबीयांची सर्व मालमत्तेची देखभाल ताईंनी अत्यंत निरलसपणे, प्रचंड आत्मविश्वासाने केली. त्यामध्ये प्रचंड अशी वाढही केली. लव्हाटे नगरमधल्या शेतीत जरी त्यांनी प्लॉट ‘डेव्हलप’ केलेला असला, तरी शेतीपासून त्या दूर राहिलेल्या नाहीत. अन्य ठिकाणी शेती घेऊन शेतीचा व्यवसाय त्या करतच राहिल्या. आपल्या जमिनीतील 12, 13 एकर रस्त्याकरिता जागा गेली, तरी त्या डगमगल्या नाही. उर्वरित जागेवर त्यांनी नाशिकमध्ये चांगली वसाहत कशी होईल, चांगले लोक कसे तेथे येतील, असा दृष्टिकोन ठेवून, पैसे कमावणे एवढा भाग न ठेवता, स्वच्छ सुंदर नाशिक कसे होईल, याकडे लक्ष ठेवत त्यांनी लव्हाटे नगरची आखणी केली. अशा या लव्हाटे नगरमध्येच त्यांनी सुंदर असे देवीचे मंदिर उभे केले. आज वाढलेल्या नाशिकमधील या भागातील एक आध्यात्मिक केंद्र म्हणून सदर मंदिराकडे बघितले जाते. ही ताईंची नाशिककरांना खूप मोठी देणगी आहे.
स्वतःला शिक्षण घेता आले नाही. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ताईंनी ज्यांना कोणाला शिक्षणाकरिता मदत लागेल, त्यांना सढळ हस्ते मदत केली. अनेक तरुणांना शिक्षणाकरिता तर मदत केली, पण अनेक शाळांनासुद्धा शैक्षणिक मदत करण्यासाठी त्या मागे राहिल्या नाहीत. सासर सांभाळत असतानाच आपल्या माहेरच्या लोकांनाही त्या विसरल्या नाहीत. आपण कमी आर्थिक स्थितीतून चांगल्या घरात आलो, याची जाण ठेवत त्यांनी आपल्या भाऊ-बहिणी यांनासुद्धा मदत करत त्यांनासुद्धा आर्थिक स्थान उंचावण्याकरिता मदत केली. आपल्या भाच्यांना शिक्षणासाठी मदत केली आणि हे सगळे करत असताना जे कष्ट आपल्या आईने सोसले, त्या आईला त्या कधीही विसरल्या नाहीत. आपल्या सासूबाईंची सेवा जशी केली, तशीच त्यांनी आपल्या आईलाही आपल्या घरीच घेऊन आल्या. आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आईची सेवा केली. आईचा सांभाळ केला. मातृभक्ती म्हणजे काय, हे ताईंच्या या वागण्यातून कर्तव्यातून दिसते. एक उत्कृष्ट मातृभक्त म्हणूनच त्यांचा उल्लेख करावा लागेल.
आज वयाच्या 92व्या वर्षातही त्या आपल्या शेतीत लक्ष देण्यासाठी चक्कर मारत असतात. शेतीत गेले की त्यांचा उत्साह द्विगुणित होतो. आणि सगळ्या जुन्या स्मृती जागृत होतात. एक प्रकारे शेतीत जाणे म्हणजे एक प्रकारचे त्यांना ‘प्रोटीन्स’च मिळणे, असे म्हणावे लागेल. आपल्या मुलांना, मुलींना शिक्षण दिलेच, पण आपल्या सुनांनासुद्धा त्यांनी मुलगी म्हणून मानले. आपल्या सुनेलासुद्धा त्यांनी आपल्याप्रमाणेच शेतीची जाणीव करून दिली. त्यांच्या सुनबाई वृंदाताई यासुद्धा आज शेतीत अग्रेसर आहेत. सुनेला आपल्या घरी आणल्यावर तिचे राहिलेले शिक्षण तिला पूर्णच करायला सांगितले. पण आयुर्वेदाचा आपल्या घराण्याचा वारसा असल्यामुळे आयुर्वेदाचेही शिक्षण घेण्यास सांगितले. वृंदाताईंनीसुद्धा आपल्या या आईसमान असलेल्या सासूची कधीच अवहेलना न करता, दिलेल्या आज्ञाच शिरसावंद्य मानून पालन केले. आयुर्वेदाचा लव्हाटे शास्त्रींचा जो वारसा आहे, तो तसाच पुढे चालू ठेवला आणि जोपासला.
त्यांनी शेतीचे काम सुरू केल्यावर, रोजच शेतीमध्ये जात असताना, शेतीत फिरताना त्यांच्याजवळ लोकर उपलब्ध असे. शेतीत फिरता फिरता त्या विणकाम करत असत. घरातील सर्वांना कधीही स्वेटर बाहेरून विकत आणू दिले नाहीत. सातत्याने शेतीत काम करत असताना विणकामही त्या करत राहिल्या. त्यांना संगीताचीही उत्तम जाण आहे. नाट्यगीत, शास्त्रीय संगीत याची त्यांना आवड आहे. त्यातून त्या समाधान व आनंद मिळवत राहिल्या. निर्मलाताई आज सुखासमाधानाने घरात असल्या, तरीही शेती हा त्यांचा प्राण, श्वास आणि प्रेरणास्रोत आहे. त्याकरिताच आजही वयाच्या 92व्या वर्षी फिरणे अशक्य असले, तरीही कोणाच्या ना कोणाच्या घरच्यांच्या मदतीने वॉकरसह शेतीमध्ये जातच असतात. कारण शेती हा त्यांची प्रेरणास्रोत आहे. ‘मार्गाधारे वर्तावे’ या माऊलींच्या संदेशाची प्रत्यक्ष कृतीची अनुभूती म्हणजे निर्मलाताई!
शरद जाधव
(लेखक प्रदेश संघटन प्रमुख,सहकार भारती आहेत.)
9422761699