नवी दिल्ली: ( Bangladesh government leader Mohammad Yunus ) “बांगलादेशचे तुकडे करून ईशान्य भारताला समुद्राशी जोडावे,” अशा शब्दांत ईशान्य भारतातील नेत्यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना सुनावले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा हवाला देत चीनला आपली अर्थव्यवस्था वाढवण्याचे आवाहन केले होते. या विधानाचा भारताकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा म्हणाले, “बांगलादेशच्या तथाकथित अंतरिम सरकारच्या मोहम्मद युनूस यांनी ईशान्य भारतातील राज्यांना ‘भूवेष्टित’ म्हणून संबोधित केलेले आणि बांगलादेशला समुद्री प्रवेशाचे त्यांचे संरक्षक म्हणून स्थान देणारे विधान आक्षेपार्ह तीव्र निषेधार्ह आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, भारतातील अंतर्गत घटकांनीही ईशान्येकडील भागाला भौतिकदृष्ट्या मुख्य भूमीपासून वेगळे करण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग तोडण्याचा धोकादायक सल्ला दिला आहे.
म्हणूनच, ‘चिकन्स नेक’ कॉरिडॉरच्या खाली आणि आजूबाजूला अधिक मजबूत रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे नेटवर्क विकसित करणे अत्यावश्यक आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. टिप्रा मोथा पक्षाचे प्रमुख प्रद्योत माणिक्य यांनीही युनूस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ”अभियांत्रिकी आव्हानांवर अब्जावधी रुपये खर्च करण्याऐवजी आपण बांगलादेश तोडला पाहिजे आणि आपला सागरी प्रवेश सुनिश्चित केला पाहिजे,” असे त्यांनी म्हटले आहे.