भय आणि वास्तव या दोन्हींची सांगड घालणार्या ’रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या नाटकाच्या निमित्ताने...
आपल्या जवळचे कुणी देवाघरी गेले की तो तारा बनतो आणि कायम आपल्याला आकाशात दिसतो, असे जुनी मंडळी सांगायचे. मग रोज रात्री आकाशाकडे, त्या तार्याकडे एकटक पाहणे आणि त्याच्याशी गुजगोष्टी करणे, हा काहींसाठी कधी नित्यक्रम होऊन जाते, हे त्याचे त्यांनाही कळत नाही. याला विज्ञानाचा किती आधार आहे, हे माहीत नाही. पण, अनेकदा काही गोष्टींच्या मागचे विज्ञान किंवा वास्तव समजून न घेता, केवळ एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे त्यांचा प्रवास सुरू असतो. यात श्रद्धा, अंधश्रद्धा, रुढी, परंपरा, नियम असे सगळेच आले.
माणूस सध्या कितीही विज्ञानयुगात वेगाने प्रगती करीत असला तरी प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान शोधण्याच्या फंदात तो पडत नाही, तर बर्याच गोष्टींवर फक्त डोळे झाकून विश्वास ठेवत, तीच खरी मानण्याचा प्रयत्न करतो. कित्येकदा ती गोष्ट प्रत्यक्षात तशी नसतेही, उलट आपण जसा विचार करतो, त्यापेक्षा बराच विरोधाभास त्यात असतो. तरीसुद्धा आपल्याला जशी वाटते, तशीच ती गोष्ट आहे, हे कायम आपण मनाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. मग शेवटी त्या गोष्टीचे वास्तव कळले की, मन सैरभैर होऊन डोक्यात प्रश्नांची सरबत्ती सुरू होते आणि हळूच वास्तवाची जाण होते. असेच सैरभैर करून सोडणारे आणि वास्तवाचे भान करून देणारे नाटक म्हणजे ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी.’
खरं तर कुठलाही भयपट म्हटला की, त्यात प्रचंड कर्णकर्कश आवाज, भयावह पार्श्वसंगीत, चित्रविचित्र माणसे असे सगळे पाहायला मिळते. परंतु, ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे नाटक म्हणजे अगदी कौटुंबिक खेळीमेळीच्या वातावरणात असलेली सहज पण तितकीच गूढकथा.
डॅनी रॉबिन्सचे इंग्रजी नाटक ‘2.22 - ॠहेीीं डीेीूं’ यावर आधारित निरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे नाटक मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. जवळपास तीन तासांच्या या नाटकाची कथा प्रमुख चार पात्रांभोवती आणि चार भिंतींच्या आत फिरते. केतन (अनिकेत विश्वासराव), ऋतिका (गौतमी देशपांडे), सोनाली (रसिका सुनील) आणि दुर्गेश (प्रियदर्शन जाधव). यातील केतन आणि ऋतिका हे दोघे आपल्या लहान मुलीसह मुंबई सोडून पाचगणीला एका जुन्या बंगल्यात राहायला जातात. हा बंगला असतो एका विधवा ख्रिश्चन स्त्रीचा. ऋतिकाला काही दिवसांपासून रोज एक विचित्र गोष्ट घडत असल्याचा भास होतो. विशेष म्हणजे, रोज रात्री एकाच वेळी ती गोष्ट घडते, तीसुद्धा बरोबर 2 वाजून 22 मिनिटांनी! एका रात्री केतन, ऋतिका, सोनाली आणि दुर्गेश हे चौघेही एकत्र येतात. ऋतिका म्हणते तसे खरेच घडते का? हे पाहण्यासाठी ते सगळे वाट पाहतात, ती 2 वाजून 22 मिनिटे कधी होतात याची.
या वेळेची प्रतीक्षा करण्याचा संपूर्ण काळ अलगद आणि तितक्याच रहस्यमय पद्धतीने पुढे जात राहतो. केतन खगोलशास्त्रज्ञ अर्थात विज्ञानवादी असल्याने तो वारंवार ऋतिकाची समजूत काढत तिला भास होत असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या सोनालीही केतनच्या मताशी सहमत असते, तर दुर्गेश मात्र ऋतिकाच्या बाजूने उभा असतो. या सगळ्यानंतर रात्री 2 वाजून 22 मिनिटांनी नेमके काय होते? कोण जिंकतो? ऋतिकाला होणारा भास की केतनचे विज्ञान? याचे उत्तर अर्थात नाटक पाहिल्यानंतरच मिळेल.
या नाटकात चारही कलाकारांचा अभिनय अगदी ताकदीचा आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. भयकथेवर आधारित हे नाटक असले, तरी उगाच ओढून ताणून अनावश्यक आवाज किंवा प्रकाशाचा भडिमार न करता, संपूर्ण नाटक एका लयीत पुढे सरकते. ऋतिका आणि केतन यांच्यातील संवाद जितके विचार करायला लावणारे, तितकाच मध्येच दुर्गेशचा येणारा विनोद मनाला आनंद देणारा आहे. जितेंद्र जोशी यांचे गीत आणि अजित परब यांनी दिलेले संगीत नाटकाला आणखी रहस्यमय बनवते.
लेखक नीरज शिरवाईकर यांचे नेपथ्य कथानकाला अगदी साजेसे आहे. केतन खगोलशास्त्रज्ञ असल्याने घरात ठेवलेला टेलिस्कोप हे त्याचे उत्तम उदाहरण. शिवाय, घराच्या वरच्या खोलीत असलेल्या मुलीला पाहण्याकरिता जाण्या-येण्यासाठी जिन्याचा योग्य वापर केला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण नाटकात केतन आणि ऋतिकाच्या लहान मुलीला एकदाही न दाखवता तिचे अस्तित्व आहे, हे चारही कलाकार वेळोवेळी आपल्या अभिनयातून दाखवतात.
‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या नाटकाचे वेगळेपण म्हणजे, या नाटकाचे कथानक एका इंग्रजी नाटकावर आधारित असले, तरीही ते मराठीच्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात योग्य रितीने बसवले गेले. शिवाय, कलाकारांच्या ताकदीच्या अभिनयाने हे नाटक इंग्रजी असेल, असा विचारही येत नाही. संपूर्ण प्रयोगात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीतील सीमारेषा गाठताना, नाटक कोणत्याही एका बाजूला झुकत नाही. मुख्य म्हणजे, ‘तुला खरंच वाटतं का की, एखाद्या आत्म्यामुळे एखादे घर अस्वस्थ होते?’ यासारख्या संवादातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा अचूक मेळ साधण्यात आला आहे.
संपूर्ण नाटकात पुढे काहीतरी घडणार आहे, या विचारात प्रेक्षक खिळून राहतो. भय आणि वास्तव यांचा अचूक मेळ असलेले हे नाटक. भीती, विनोद, रहस्य, चिंता, आभास, वास्तव या सगळ्या भावना कुणाला एकाचवेळी जवळून अनुभवायच्या असल्यास त्यांच्यासाठी हे नाटक म्हणजे एक पर्वणीच.
नाटक : दोन वाजून बावीस मिनिटानी
निर्माते : अजय विचारे
लेखक : नीरज शिरवईकर
दिग्दर्शक : विजय केंकरे
कलाकार : अनिकेत विश्वासराव, गौतमी देशपांडे, रसिका सुनील, प्रियदर्शन जाधव
नेपथ्य : नीरज शिरवईकर