बंगळुरू : (Karnataka) कर्नाटकमधील शिवमोगा येथील सीईटी परीक्षा केंद्रावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काही विद्यार्थ्यांना जानवे आणि रुद्राक्ष काढण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर कर्नाटक सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये बुरख्या घालण्यास अडचण नसणाऱ्या सरकारला पवित्र धाग्याची अडचण का असावी, असा सवाल भाजप नेत्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारला केला आहे.
सीईटी आयोजित करणाऱ्या कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (केईए) गुरुवारी घडलेल्या बिदर आणि शिवमोग्गा येथील उपायुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवून चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च शिक्षण मंत्री डॉ. एमसी सुधाकर यांनीही शुक्रवारी या घटनांचा निषेध केला आहे. आणि या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. ते म्हणाले की," परीक्षेच्या नियमावलीत असे कुठेही म्हटलेले नाही की परिक्षार्थींनी जानवे काढावीत. यापूर्वी असे प्रकार कधीही घडले नव्हते. या प्रकरणाची आम्ही गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करु. असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही. अहवाल आल्यानंतर यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणी बिदर आणि शिवमोग्गा येथील उपायुक्तांकडून अहवाल मागवण्यात आला आहे."
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, "शाळकरी मुलींनी बुरखा घालण्यावर कोणतीही अडचण नसलेल्या काँग्रेस सरकारला आता हिंदू धर्माच्या पवित्र प्रतीकांमध्ये धोका दिसायला लागला आहे." त्याच वेळी, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी असेही म्हटले की, या प्रकारामुळे मराठा आणि वैश्य लोकांचाही अपमान झाला आहे कारण ते देखील जानवे परिधान करतात." याबरोबर अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेसह अनेक संघटनांनी या घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\