नुकत्याच पार पडलेल्या ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या बैठकीत वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले (gargai dam). या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली (gargai dam). बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयांसंदर्भात स्वत: वन्यजीवप्रेमी असलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांची घेतलेली ही मुलाखत...(gargai dam)
गारगाई धरणामुळे तानसा वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र बाधित होणार आहे का?
गारगाई धरणामुळे तानसा वन्यजीव अभयारण्याचे मोठ्या प्रमाणावरील वनक्षेत्र बाधित होईल, असा एक प्रचार सुरू आहे. मात्र, मुळीच तसे काही घडणार नाही. गारगाई धरणामुळे तानसा वन्यजीव अभयारण्याचे साधारण 650 हेक्टर्स क्षेत्र हे पाण्याखाली बुडित क्षेत्र म्हणून जाईल. मात्र, 550 हेक्टर्स क्षेत्र हे तानसा अभयारण्यात नव्याने समाविष्ट केले जाईल. ते कसे, तर गारगाई नदीवर बांधण्यात येणार्या या धरणासाठी सहा गावांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यातील प्रामुख्याने चार गावांच्या पुनर्वसनामुळे 550 हेक्टर्स क्षेत्र उपलब्ध होईल. हे क्षेत्र गावातील शेतीसाठी वापरात येणार्या जमिनीचे आणि मालकी जागेचे असेल. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील दोन उंचवट्याचे भाग हे बेटांच्या स्वरुपात पाण्याबाहेरील येतील. हे सर्व क्षेत्र तानसा वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट करण्यात येईल. त्यामुळे केवळ साधारण 100 हेक्टर्स क्षेत्रच या धरणामुळे बाधित होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, गावांच्या पुनर्वसनामुळे अभयारण्य निर्मनुष्य होईल. धरण प्रस्तावित असलेल्या क्षेत्रामधून सद्य स्थितीत एक राज्यमार्ग सूर्यमाळच्या दिशेने जातो. सूर्यमाळ हे पर्यटनस्थळ असल्यामुळे या रस्त्यावरून त्याठिकाणी जाणार्या वाहनांची वर्दळ असते. धरणामुळे हा महामार्ग अभयारण्यातून बाहेर काढून दुसर्या मार्गाने वळविण्यात येईल. परिणामी, अभयारण्यातील मानवी वावर कमी होईल आणि वन्यजीवांच्या वावरासाठी जागा निर्माण होईल. महाराष्ट्रातील ‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ असो, वा केरळमधील ‘पेरियार राष्ट्रीय उद्यान’ या दोन्ही ठिकाणी धरण आणि धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. मात्र, धरणामुळेच जंगलाचे संवर्धनही झाले आणि त्याला सुरक्षादेखील मिळाली आहे.
डीपीएस तलावाला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा का देण्यात आला?
नवी मुंबईतील डीपीएस तलाव हे फ्लेमिंगोंच्या अधिवासाकरिता प्रसिद्ध आहे. या तलावाला फ्लेमिंगो संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा दिल्याबद्दल मी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. कारण, या निर्णयामुळे पर्यावरण आणि विकास या दोघांची उन्नती एकाचवेळी कशी करता येऊ शकते, याचे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हे उत्तम उदाहरण आहे. भरतीच्या वेळी ठाणे खाडीतील फ्लेमिंगो अभयारण्यातून डीपीएस तलावात येतात. ओहोटीच्या वेळी खाडीत अन्नग्रहण करणारे फ्लेमिंगो पक्षी हे भरतीच्या वेळी आराम करण्यासाठी डीपीएस तलावात उतरतात. त्यामुळे या जागेचे संवर्धन करणे गरजेचे होते. महत्त्वाचे म्हणजे डीपीएस तलावापासून काहीच किमी अंतरावर नवी मुंबई विमानतळ आहे. अशा परिस्थितीत फ्लेमिंगोमुळे विमानांचा ‘बर्ड स्टाईक’ होऊ नये, म्हणून डीपीएस तलावाच्या क्षेत्राला संरक्षण देऊन त्याठिकाणी पक्ष्यांना स्थिरस्थावर करणे गरजेचे होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून डीपीएस तलावाला फ्लेमिंगो संवर्धन राखीव क्षेत्राचा निर्णय घेण्यात आला आहे.
देवरायांच्या संवर्धनासाठी राज्यसरकार कशा पद्धतीने प्रयत्नशील राहणार आहे?
देवराई ही स्थानिक समाजाने जपलेली एक परिसंस्था आहे. मुळातच देवाच्या नावाने हे जंगल जपलेले असल्याकारणाने त्याला एक धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच या जागांना जैवविविधतेच्या अनुषंगानेदेखील तितकेच महत्त्व आहे. कारण, याठिकाणी मोठे पुरातन वृक्ष आहेत. ज्यांची वाढ एका मोठ्या कालावधीमध्ये झाल्याने त्यांची पुनर्वाढ करणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे पश्चिम घाटात सद्य परिस्थितीत अस्तित्वात असलेल्या देवरायांना सुरक्षा देऊन त्यांची जोपासना करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘राज्य वन्यजीव मंडळा’मध्ये आम्ही देवरायांच्या संवर्धनासाठी विशेष समिती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देवरायांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम घाटातील कोणत्या देवरायांचे संवर्धन करता येईल, याची तपासणी या समितीमार्फत केली जाईल.
व्याघ्र भ्रमण मार्गाच्या बळकटीच्या दृष्टीने काय करावे लागेल?
नुकत्याच पार पडलेल्या ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या बैठकीत व्याघ्र भ्रमण मार्गाच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाच्या ‘परिवेष’ या संकेतस्थळावर व्याघ्र भ्रमण मार्गाचा एक नकाशा उपलब्ध आहे. हा नकाशामध्ये प्रत्येक क्षेत्राचे जीआयएस लेअर देण्यात आले आहेत. वाघांबरोबर इतर वन्यजीवांच्या भ्रमण मार्गाच्या अधिवासाचा हा बिनचूक नकाशा आहे. त्यामुळे नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्याघ्र भ्रमण मार्गामध्ये प्रस्तावित असणार्या पायाभूत प्रकल्पांच्या मार्ग निश्चितीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरेल. कारण, त्यामुळे मार्ग निश्चितीमध्ये प्रमाणता येईल. तसेच, व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी सहमतीने संपादित करून त्यांचा वापर वनीकरणासाठी करण्याचा निर्णयही ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या बैठकीमध्ये घेण्यात आला.