येशूने सांगितलेला धर्म त्याच्या स्वर्गारोहणानंतरच्या काळात झपाट्याने जगामध्ये पसरला. या धर्माने आणि त्याच्या अनुयायांनी धर्मप्रसार करताना अनेक नवनव्या क्लृप्त्या लढवल्या. मात्र, आजही येशूच्या जीवनातील एका मोठ्या कालखंडाबाबत फारशी वाच्यता होताना दिसत नाही. या सर्व घटनांचा आढावा घेणार हा लेख...
शुक्रवार, दि. 18 एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’ झाला. त्याच्या साधारण 40 दिवस अगोदर जो बुधवार येईल, त्याला ‘अॅझ वेड्नसडे’ असे म्हटले जाते. तो दिवस यंदा दि. 5 मार्च रोजी पार पडला. येशू ख्रिस्त किंवा मूळ नाव ईसा नाझरथ हा स्वतःच्या वयाच्या 12व्या वर्षी, जेरुसलेमच्या प्रसिद्ध देवळात गेला. तिथल्या जत्रेत तो हरवला, म्हणून त्याचे आईबाप मेरी आणि जोसेफ हे त्याला शोधत-शोधत पुन्हा देवळात गेले, तर त्यांना येशू तिथे विद्वान पंडितांबरोबर, धर्मचर्चा करीत बसलेला दिसला.
यानंतरची 18 वर्षे येशू कुठे होता, हे कुणालाही माहीत नाही. म्हणजे कोणत्याही ख्रिश्चन धर्मग्रंथात त्याबद्दल काहीही उल्लेख नाही. स्वतः ख्रिश्चनच असणार्या अनेक विद्वान संशोधकांच्या मते, असलेले उल्लेख मुद्दाम दडपून टाकण्यात आलेले आहेत. कोणत्या कारणाने?
कारण, अगदी साधे, सोपे आणि सरळ आहे. येशू त्याकाळात भारतात आला होता. योग्य आध्यात्मिक गुरूच्या शोधार्थ, तो काश्मीरपासून जगन्नाथपुरीपर्यंत फिरला. मग तो पुन्हा पॅलेस्टाईनमध्ये गेला. सुमारे तीन वर्षे तो पॅलेस्टाईन भागात फिरत होता. त्याने अनेक चमत्कार केले. सामान्य लोकांना उपदेश केला. अनुयायांची संख्या वाढत चाललेली पाहून, त्याच्या मूळ उपासना पंथाचे म्हणजे ज्यू धर्माचे धर्ममार्तंड खवळले. यावेळी पॅलेस्टाईनवर राज्य करणार्या रोमन सत्ताधार्यांकडे त्यांनी, येशूची तक्रार केली. रोमन सुभेदार पाँटियस पिलात किंवा पिलेट याने तक्रारदारांच्या आग्रहानुसार, येशूला देहान्त शिक्षा दिली.
फाशी देणे, सुळावर चढवणे, शिरच्छेद करणे याप्रमाणेच तत्कालीन पॅलेस्टाईनमध्ये क्रूसावर खिळवून मारणे ही देहान्त शिक्षेची पद्धत प्रचलित होती. त्यानुसार रोमन सैनिकांनी येशूला क्रूसावर चढवून ठार केले. त्याच्या काही अनुयायांनी, त्याचा मृतदेह क्रूसावरून खाली काढून दफन केला. हे सगळे वासंतिक विषुवदिनानंतरच्या शुक्रवारी घडले, म्हणून मुळात तो ‘ब्लॅक फ्रायडे’ होता. पण, दोन दिवसांनंतर म्हणजे रविवारी सकाळी येशूच्या अनुयायांना आढळले की, येशू पुन्हा जिवंत झाला आहे. या चमत्काराला ‘रेझरेक्शन-पुनरुत्थान’ असे म्हटले जाते. ख्रिश्चन धर्मातला हा सर्वोच्च चमत्कार आहे. त्यानंतर गेल्या दोन हजार वर्षांत कोणताही स्वनामधन्य ख्रिश्चन संत अथवा संतीण, असा चमत्कार करून दाखवू शकलेले नाहीत.
पुनरुत्थान झालेला येशू नंतरचे 40 दिवस, पॅलेस्टाईन प्रदेशात चमत्कार करीत आणि उपदेश करीत भ्रमंती करीत होता. 40व्या दिवशी तो जेरुसलेमजवळ माऊंट ऑलिव्ह या टेकडीवर आला. तिथे त्याने अनुयायांसमोर एक प्रवचन केले. त्याला म्हणतात, ‘सर्मन ऑन द माऊंट.’ ते प्रवचन आटोपल्यावर येशू सदेह स्वर्गाला गेला. आज त्या जागेवर एक चर्च आहे. त्याचे नाव आहे ‘द चर्च ऑफ होली सेपल्कर.’ सेपल्कर म्हणजे समाधी. अर्थ स्पष्टच आहे, हे येशूच्या पवित्र समाधीवर बांधलेले प्रार्थनामंदिर आहे.
येशू वयाच्या 12व्या वर्षापासून 30व्या वर्षापर्यंत, म्हणजे 18 वर्षांच्या कालखंडात भारतात येऊन आध्यात्मिक गुरूच्या शोधात फिरत होता, ही गोष्ट आधुनिक चर्च अधिकारी का लपवून ठेवतात? कारण, ते उघड केले, तर हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व मान्य करावे लागते ना! हिंदू धर्म हा भुताखेतांचा, राक्षसांचा, सैतानाचा ‘हीदन’ किंवा ‘पेगन’ म्हणजे रानटी धर्म आहे, असे म्हणता येत नाही ना! म्हणून मग येशूच्या पॅलेस्टाईनमधल्या पुनरागमनापासून पुढचा भाग फक्त दाखवत राहायचा. आमचा देव बघा कसा गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी बळी गेला असे गहिंवर काढत भोळ्याभाबड्यांना शेंड्या लावायच्या.
संशोधकांच्या मते, येशूचे आकाशातल्या ढगात अदृष्य होणे, हा ही एक चमत्कार होता. तो स्वर्गाला गेला नसून, अज्ञातवासात गेला आणि पॅलेस्टाईनमधून पुन्हा भारतात काश्मीर प्रदेशात आला. तिथे आणखी 16 वर्षे काळ व्यतीत करून त्याने, वयाच्या 49व्या वर्षी योगसमाधी घेतली. ही ख्रिस्तसमाधी आजही काश्मीरमध्ये रोझाबाल या ठिकाणी आहे. आधुनिक चर्चला अर्थातच हेदेखील मान्य नाही.
ज्यांचा हिंदू योगशास्त्राचा अभ्यास आहे, वाचन आहे, त्यावर विश्वास आहे किंवा अनुभव आहे; त्यांच्या दृष्टीने येशूने पॅलेस्टाईनमध्ये करून दाखवलेले चमत्कार म्हणजे हस्तस्पर्शाने रोग बरे करणे, पाण्यावर चालून जाणे, हृदयात आणि डोक्यात खिळे ठोकलेले असतानाही जिवंत राहणे, आकाशात उडून ढगात अदृष्य होणे वगैरे गोष्टी म्हणजे, अगदी प्राथमिक पातळीवरचे चमत्कार आहेत. योगाभ्यासाच्या प्रारंभीच्याच काही पातळ्यांवर साधकाला अशा गोष्टी घडवून आणणार्या सिद्धी प्राप्त होतात. परंतु, खरा योगसाधक असल्या सिद्धींमध्ये अडकून न पडता पुढे जात राहातो, असे हिंदू अभ्यासक मानतात. कारण, चमत्कार करून दाखवणे हे त्यांचे उद्दिष्ट नसते. नंतर आत्मसाक्षात्कार झालेला एखादा योगी किंवा लोक ज्याला ‘संत’ म्हणतात तो, सर्वसामान्य समाजाला खर्या धर्माकडे वळवण्यासाठी क्वचित चमत्कार घडवतो. कारण, चमत्काराशिवाय नमस्कार नाही.
ख्रिश्चन धर्माच्या बाबतीतला खरा चमत्कार हा आहे की, याचा उद्गाता येशू हा अनुयायांच्या दृष्टिआड होऊनही हा संप्रदाय टिकला कसा नि वाढला कसा? येशूच्या कथित स्वर्गगमनानंतर त्याच्या अनुयायांना रोमन राज्यकर्त्यांनी पॅलेस्टाईनमधून हद्दपार केले, ते दशदिशांना पळाले. मुख्यतः इजिप्तमध्ये गेले. तिथे त्यांना ‘ख्राईस्ट’चे अनुयायी म्हणून, ‘ख्रिश्चन’ हे नाव मिळाले. पण, प्रत्येक ठिकाणी हे ख्रिश्चन लोक येशूच्या नावाने एक मठ स्थापन करून, त्याचा संप्रदाय वाढवत राहिले. दिवसेंदिवस हा संप्रदाय लोकप्रिय होत गेला. मुख्य गुरू जागेवर नसताना, त्याच्या शिष्यांनी प्रवर्तित केलेली अशी कोणती विचारसंपदा होती की, जी तत्कालीन सामान्य जनतेला आकर्षक वाटली? की जिच्यामुळे लोक मोठ्या संख्येने या संप्रदायाचे अनुयायी बनले? हा खरा चमत्कार किंवा अभ्यासाचा, जाणून घेण्याचा विषय आहे.
नंतरच्या 300 वर्षांमध्ये हा संप्रदाय इतका फोफावला की, डळमळणारे रोमन साम्राज्य स्थिर ठेवण्यासाठी तत्कालीन रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन याला, या लोकप्रिय संप्रदायाचा स्वीकार करावा लागला. पोप सेंट सिल्व्हेस्टर यांच्या हस्ते त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, असे म्हटले जाते. आता जो सम्राटाचा धर्म तोच प्रजेचा धर्म, या न्यायाने हळूहळू संपूर्ण रोमन साम्राज्यातील नागरिक ख्रिश्चन बनले. जे बनले नाहीत, यांना पुढच्या काळातल्या पोप लोकांनी जबरदस्तीने बाटवले.
आता तत्कालीन रोमन साम्राज्य संपूर्ण युरोप खंडासह, उत्तर आफ्रिका आणि आशिया खंडातही पर्शियापर्यंत पसरलेले होते. एवढ्या विस्तीर्ण प्रदेशातल्या अनेक जनसमूहांना खुबीने अथवा सक्तीने, ख्रिश्चानिटीच्या एकाच छत्राखाली आणताना पोप लोकांनी अनेक तडजोडी केल्या. या जनसमूहांच्या मूळ उपासना पद्धतीमधल्या अनेक गोष्टी, या येशूच्या किंवा त्याच्या प्रमुख शिष्यांच्या जीवनात घडलेल्या आहेत असे दाखवून, त्यांना ख्रिश्चानिटीत सामावून घेण्यात आले. यासाठी अनेक दंतकथा, कहाण्या नव्याने घडवण्यात आल्या, रचण्यात आल्या.
रोमन लोकांमध्ये ‘मिथ्र’ या देवतेचा उपासना संप्रदाय फारच प्रबळ होता. रोमनांना म्हणे पर्शियन लोकांकडून ‘मिथ्र’ देवतेची उपासना मिळाली. या उपासकांची अशी समजूत होती की, दि. 25 डिसेंबर रोजी या दिवशी ‘मिथ्र’ जन्मला आणि वसंत ऋतूतल्या विषुवदिनाला त्याचे राज्यारोहण झाले. ‘मिथ्र’ सांप्रदायिकांना ख्रिश्चानिटीत सामावून घेताना पोप लोकांनी कशी गंमत केली पाहा. येशू ख्रिस्ताचा खराखुरा जन्म कुठेच नोंदवलेला नव्हता. तर त्याचा जन्म दि. 25 डिसेंबर रोजी झाला, अशी कथा निर्माण केली. येशू विषुवदिनानंतरच्या शुक्रवारी वधस्तंभावर चढला आणि रविवारी पुनर्जिवित झाला, एवढे माहीत होते. ती घटना ‘मिथ्र’च्या राज्यारोहण दिनाशी जोडून, ‘ब्लॅक फ्रायडे’ला ‘गुड फ्रायडे’ आणि मग येणार्या रविवारला ‘ईस्टर संडे’ असे म्हणण्यात आले.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला एक पोप ग्रेगरी-द-ग्रेट याने, या ‘ईस्टर संडे’च्या 40 दिवस आधी येणार्या बुधवारला ‘अॅश वेड्नसडे’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली. यंदा हा दिवस दि. 5 मार्च 2025 रोजी झाला. ख्रिश्चन उपासना संप्रदायातले कॅथलिक, ऑर्थोडॉक्स आदी सर्व पंथोपपंथ हा दिवस मानतात. चर्चमधले प्रमुख पाद्री आपल्या प्रार्थनेच्या पीठावर, एक काथवटामध्ये माडाच्या झांवळ्या जाणून त्याची राख बनवतात. मग प्रत्येक भाविकाच्या कपाळावर बोटाने ती राख, एक उभी रेघ, एक आडवी रेघ, अशा क्रूसाच्या आकृतीत लावली जाते. ‘लक्षात ठेव, तू राख आहेत आणि राखेतच तुला परतायचे आहे,’ अशा आशयाचे लॅटिन मंत्र पाद्री पुटपुटतो.
आता गंमत पाहा हं! अॅरिस्टॉटल हा प्रख्यात ग्रीक तत्त्ववेता इसवी सन पूर्व चौथ्या शतकात ग्रीसमध्ये होऊन गेला. त्याही काळात युरोपात ज्यू लोक होतेच. त्यांपैकी काही लोकांनी अॅरिस्टॉटलला असे सांगितले की, “आम्ही मूळचे भारतातले आहोत. आता भारतातले म्हणजे कुठचे, ते मात्र माहीत नाही.” येशू हा मुळात ज्यू होता, हे आता आपल्याला माहितच आहे. अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे की, येशूचे वधस्तंभावरचे शेवटचे वाक्य-‘परमेश्वरा त्यांना क्षमा कर’-मूळ आर्माइक हिब्रू भाषेतील वाक्य-‘एली एली लामा साबाकथनी’- हे प्राचीन तामिळ भाषेतले वाक्य आहे.
म्हणजे ज्यू हे प्राचीन हिंदू तामिळ भाषिक लोक असावेत. आंध्र आणि तामिळनाडूमधून जसे हिंदू लोक आग्नेय आशियात गेले, तसेच ते इजिप्त आणि पॅलेस्टाईन नंतर पुढे युरोपातही गेले. हे हिंदू तामिळ शैव पंथीय असावेत. त्यातही ते मुख्यतः, कापालिक वगैरे गुप्त तांत्रिक शैव पंथीय असावेत. एकंदर शैव पंथात भस्म किंवा विभूती या वस्तूला फार महत्त्व आहे. शिवपिंडीला भस्मलेपन करण्याबरोबरच साधकाने स्वतःच्या अंगाला भस्म लावणे, त्यातही शरीराच्या विशिष्ट चक्रांवर भस्मलेपन करणे, हा एक मोठा विधीच आहे. शैव गुप्त पंथांमध्ये तर विविध वृक्षांची पाने, फळे, खोडे यांच्याचप्रमाणे, मानवी चिताभस्माला फार महत्त्व आहे. याबाबत ‘शिवलिलामृत’ या ग्रंथात बर्याच कथा आहेत. त्यातला अद्भुततेचा भाग बाजूला ठेवला, तरी काहीतरी तथ्य आहेच. पोप ग्रेगरीने यातला भारत, हिंदू, तामिळ, शैव वगैरे सगळा भाग बाजूला ठेवला आणि वर्षातून एकदा, वासंतिक विषुवदिन म्हणजे दि. 21 किंवा दि. 22 मार्च रोजी पूर्वीच्या बुधवारला भस्मलेपन दिवस ठरवून टाकला.
- मल्हार गोखले