पश्चिम बंगालमध्ये भय आणि दहशतीचा ‘बिझनेस’

- आयोग केंद्र सरकारला सादर करणार अहवाल

    19-Apr-2025
Total Views |
 
 West Bengal
 
नवी दिल्ली: ( West Bengal ) मुर्शिदाबादमध्ये नागरिकांना अमानवी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग कटिबद्ध असून तसा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, असे प्रतिपादन आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शनिवारी केले आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधात मुस्लिम संघटनांनी हिंसक विरोध सुरू केला आहे. त्याचा सर्वाधिक फटका मुर्शिदाबादमध्ये बसला असून येथील हिंदूंना आपला जीव वाचविण्यासाठी पलायन करण्याची वेळ आली आहे. येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद परिसराला भेट दिली.
 
जाफराबादमधील हिंसक निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वडील आणि मुलाच्या कुटुंबाची रहाटकर यांनी भेट घेतली. भेटीनंतर त्या म्हणाल्या, या कुटुंबाच्या वेदनांचे वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत. येथील लोक अतिशय अमानवी परिस्थितीचा सामना करत आहेत. यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग कटिबद्ध आहे. त्यासाठी आयोग सविस्तर अहवाल तयार करणार असून तो केंद्र सरकारला सादर केला जाईल, असेही रहाटकर यांनी यावेळी नमूद केले आहे.
 
पोलिसांकडून पिडितांना मदत नाही – आयोगाचा ठपका
 
आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी आपल्या दौऱ्यात पिडितांची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी दु:ख अनावर झालेल्या पिडित महिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. रहाटकर यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल सरकारवरही त्यांनी ताशेरे ओढले.
 
प. बंगाल सरकारने जबाबदारी टाळल्याचा आणि पोलिसांकडून पिडितांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचा अतिशय गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बंगालमध्ये अशाप्रकारे भय आणि दहशतीचा ‘बिझनेस’ सुरू असल्याचेही रहाटकर यांनी म्हटले आहे.