राज ठाकरेंसोबत यूती करणार पण...; उद्धव ठाकरेंनी ठेवली अट
19-Apr-2025
Total Views | 42
मुंबई : राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत जाण्याची तयारी दाखवत एक अटदेखील ठेवली आहे. महाराष्ट्राचे हित ही एकच माझी शर्त असल्याचे ते म्हणाले.
एका मुलाखतीत बोलताना शिवसेनेत असताना उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची तशी ईच्छा आहे का? महाराष्ट्राची ईच्छा असेल तर जाऊन तिकडे सांगावे, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. त्यानंतर मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चांना उधाण आले.
त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मीसुद्धा तयार आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याचे मी आवाहन करतो. पण माझी एक अट आहे. महाराष्ट्रातून गुजरातला कारभार घेऊन जात आहेत, असे आम्ही लोकसभेच्या वेळी सांगतो होतो. तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार बसले नसते. आपण महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे सरकार केंद्रात बसवले असते आणि राज्यातसुद्धा ही महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे सरकार बसले असते. तेव्हा पाठिंबा द्यायचा. आता विरोध करायचा आणि परत तडजोड करायची असे नाही."
"महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कुणी येईल त्याचे स्वागत करणार नाही, त्याला मी बोलावणार नाही. त्याच्या घरी मी जाणार नाही. त्याचे आगत स्वागत, पंगतीला बसणार नाही, हे आधी ठरवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचे हित ही एकच माझी शर्त आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.