Nashik Kathe Galli Dargah : नाशिकमधल्या काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या पाडकामावरून झालेल्या हिंसाचारानंतर नाशिक पेटवण्याचं राजकीय कारस्थान होतं का असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे या प्रकरणी पोलिस तपासात उघडकीस आलेलं मविआ कनेक्शन. संशयितांमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश असल्याचं पोलिस तपासातून समोर आलंय.आतापर्यंत जवळपास दीड हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या हिंसाचार प्रकरणातील राजकीय धागेदोरे समोर आल्यानंतर गंभीर सवाल उपस्थित होतायत. नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना कोणाची फूस होती? नाशिक हिंसाचाराचं मविआ कनेक्शन नेमकं काय आहे? या सगळ्याची पार्श्वभूमी काय आहे?
तारीख १५ एप्रिल २०२५, वार मंगळवार मध्यरात्रीच्या एक-दीडच्या सुमारास नाशिकमधील काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्गा जमिनदोस्त करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते. दर्ग्याच्या पाडकामाला सुरुवात करण्यापूर्वी धार्मिक विधी पार पाडण्यात आले. यावेळी दर्ग्याबाहेर मौलवी, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मौलवी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी हा दर्गा हटवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र उस्मानिया चौकाच्या बाजूने आलेल्या जमावाने गोंधळ झालण्यास सुरुवात केली. दर्गा हटवण्यावरून तणाव निर्माण झाला. दर्ग्याचे ट्रस्टी, प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पाडकामादरम्यान शेकडो धर्मांध कट्टरपंथींच्या जमावाने पोलिस आणि पालिका कर्मचाऱ्यांवर रात्रीच्या सुमारास तुफान दगडफेक केली. हिंसा रोखण्यासाठी तसेच दंगलसदृश्य स्थिती नियंत्रणात आणण्यालाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, सौम्य लाठीमार करावा लागला. या सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी दर्गा ट्रस्टला १५ दिवसांपूर्वीच दिली होती. मात्र, कोणतीही कार्यवाही न केल्याने नाशिकचे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने अखेर पाडकामाला सुरुवात केली. हा अनधिकृत दर्गा पुर्णपणे हटविण्यात आला असून त्याचा राडारोडा देखील उचलण्यात आलाय.
दरम्यान, कट्टरपंथींच्या हल्ल्यात ३१ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत, घटनेचे धागेदोरे शोधून काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली. मागील दोन दिवसांपासून दगडफेक करणार्या कट्टरपंथींच्या टोळक्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. मात्र आता या दगडफेकीत आणि सगळ्या हिंसाचारामागील महाविकास आघाडीचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात पुढे आलंय. हिंसा भडकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची चिथावणी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचा हनिफ बशीर, उबाठा गटाची निलोफर शेख आणि शरद पवार गटाचा अरीफ हाजी पटेल शेख यांचा समावेश असल्याची बाब उघड झाली आहे. यासोबतच नाशिक पोलिसांनी एमआयएम पक्षाचा शहराध्यक्ष मुख्तार शेख याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवार, दि. १७ एप्रिल रोजी रात्री उशिरा मुख्तार शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. दरम्यान, कट्टरपंथींच्या हल्ल्यात ३१ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. मुंबई नाका पोलीस ठाण्यात आतापर्यंत तब्बल दीड हजार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मात्र या प्रकरणातील न्यायालयीन पार्श्वभूमी समजून घेणंही म्हत्वाचं आहे. याप्रकरणी न्यायालयात झालेल्यासुनावणीमध्ये कोणते खुलासे झालेत ? याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात.सातपीर दर्गा कमिटीची २५ फेब्रुवारी रोजी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणीत या जागेवर सिद्ध पुरूषांची समाधी असल्याचा दावा विधाते या मूळ मालकाने दावा केला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पालिकेने ओपन स्पेस निश्चित केली होती. पालिकेने सातपीर दर्गा २०१६ मध्ये अनधिकृत ठरवला होता. १५ दिवसांत अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटीसही जारी केली होती. अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी २०२३ सातपीर दर्गा कमिटीने वक्फ बोर्डात जागा वर्ग केली. पालिकेच्या पुराव्यांच्या आधारे उच्च न्यायालयाने याचिका मागे घेता की दंड करुन याचिका फेटाळू अशी कडक भूमिका घेतली. त्यानंतर कमिटीने याचिका मागे घेतली. १२ मार्च २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयानं आदेश जारी केले. एकंदरीत आताच्या संवेदनशील काळात राजकीय नेत्यांनी सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावं यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असताना राजकीय नेतेच हिंसेला प्रोत्साहन देत असतील, त्यांची अश्या गैरप्रकारांना फूस असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. पोलिसांवर हल्ला घडवून, लोकांची घरं पेटवून, दंगली घडवून जर कुणी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर अश्या समाजकंटकी प्रवृत्तींना आळा बसणं आवश्यक आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\