भारतीय जनता पक्षाची आजची राजकीय उंची हा शाश्वत विचारधारेवर आधारित प्रदीर्घ वाटचालीचा परिणाम आहे. या प्रवासात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘एकात्म मानव दर्शन’ हा विचार आणि जनसंघाच्या प्रवासाचा अनुभव या दोन्हींचा सखोल प्रभाव आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय राजकारणात एक अद्वितीय वैचारिक प्रवाह आणला. त्यांनी ‘राजकारण हे समाजसेवेचे माध्यम असावे’ असा आग्रह धरला. त्यांच्या मते, भारताची उन्नती ही केवळ पाश्चिमात्य भौतिक प्रगतीच्या मापदंडावर नव्हे, तर भारतीय संस्कृतीच्या आत्म्याशी सुसंगत अशा सर्वांगीण विकासावर आधारित असावी. त्यामुळेच त्यांनी ‘एकात्म मानव दर्शन’ ही संकल्पना साकारली, जी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावर आणि समाजातील सर्व घटकांना एकसंध बांधण्यावर आधारलेली आहे.
1965 साली दि. 22 ते दि. 25 एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानव दर्शन’ आणि ‘अंत्योदय’ हे विचार प्रथम मांडले. या ऐतिहासिक घटनेला आता 60 वर्षे पूर्ण होत आहेत. सदर घटनेच्या स्मृती जपण्यासाठी, हा विचार साजरा करण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव’ दि. 22 ते दि. 25 एप्रिल दरम्यान त्याच परिसरात म्हणजेच रुईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात पंडित यांच्या विचारांवर आणि राष्ट्रहिताच्या विविध पैलूंवर नामवंत वक्ते आपले विचार मांडतील. हे तीन दिवस म्हणजे राष्ट्रभक्तीचा जागर आणि प्रेरणादायी चिंतनाचा उत्सव ठरणार आहेत. या माध्यमातून पंडित यांनी त्याकाळी जे साकार केले, त्यासाठी लागणार्या कर्तृत्वाचे काही पैलू जरी आपल्यात मुरले तरी सोन्याहून पिवळे!
त्या काळात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय जनसंघामधून राष्ट्रनिष्ठा, कर्तव्य भावना आणि ‘अंत्योदय’ यांसारखी मूल्ये रुजवली. त्यांच्या नेतृत्वाखाली जनसंघ एक वैचारिकदृष्ट्या परिपक्व पर्याय बनला. त्यांनी ‘स्वदेशी’, ‘ग्रामस्वराज्य’ आणि भारतीय गरजांनुसार विकासाची नीती मांडली. आणीबाणीनंतर जनसंघाच्या वैचारिक वारसदारांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. भाजपचे नेते आणि पंतप्रधान म्हणून कित्येक वर्षांनंतर आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांना पंडित यांची मूल्ये राज्यकारभारात रूजवण्याची प्रथम संधी मिळाली. वाजपेयी यांच्या नेतृत्वातून ‘प्रामाणिक प्रशासन’, ‘सर्वसमावेशक विकास’ आणि ‘अंत्योदय’ यांवर आधारित धोरणांचा प्रत्यय भारताला आला. त्यानंतर पुढे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यातसुद्धा तसाच राहिला. ‘उज्ज्वला योजना’, ‘जन-धन योजना’, ‘आयुष्मान भारत’, ‘आवास योजना’ यांतून ‘एकात्म मानव दर्शन’ आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न जनतेने अनुभवला आणि पुन्हा तिसर्यांदा आदरणीय मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा आपल्या राज्यात सर्वांगीण शाश्वत विकासासाठी विविध योजना राबविल्या गेल्या. मेट्रो प्रकल्पामुळे सर्वसामान्यांना जलद व स्वस्त प्रवास शक्य झाला, राज्यात वाहतुकीचे नवे मार्ग आले, युवकांना रोजगार मिळाला, माताभगिनींच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली गेली, शेतकर्यांसाठी ‘जलयुक्त शिवार’, ‘मागेल त्याला शेततळे’ यांसारख्या योजना राबविल्या गेल्या. आज महाराष्ट्रात देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली ‘अंत्योदया’च्या विचाराचा दिवा अविरत तेवत राहील, हा विश्वास आहे.
पंडित यांनी अनेकदा म्हटले की, “राजकारण हे केवळ सत्तेसाठी नाही, तर समाज रचनेला योग्य दिशेने नेण्यासाठी असावे!” आज मीसुद्धा माझ्या कामात हाच विचार अमलात आणायचा नेहमी प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्या अध्यक्षतेखाली ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव समिती’चे कार्य हे फक्त कार्यक्रम आयोजनापुरते मर्यादित राहणार नाही, याची काळजी घेतली. समितीच्या माध्यमातून पंडित यांच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण, या महोत्सवात ग्रामीण भागात बचतगट, अंगणवाड्या आणि शाळांमध्ये कौशल्य विकासावर भर, गावातील स्वच्छता विषयक उपक्रम, घनकचर्याची विल्हेवाट लावण्याबाबत योजना, यांसारखे अनेक उपक्रम सुरु करण्यात आले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली, ‘एकात्म मानव दर्शना’च्या सिद्धांताचा प्रसार आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास, हेच आपल्या महोत्सवाचे मुख्य ध्येय आहे. त्यांच्या शिकवणीचे पालन करून, राष्ट्रहितासाठी कार्य करत, आपल्याला समाजाचे सशक्तीकरण आणि समृद्धी साधता येईल. या महोत्सवाच्या माध्यमातून, पंडित यांच्या विचारांचे पुनरावलोकन करत, आपण एकत्र येऊन आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देऊया.
मंगलप्रभात लोढा
(लेखक महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकासमंत्री आहेत.)