बालनाट्य - भाषा

    19-Apr-2025
Total Views | 19

Children
 
भाषा या विषयावरून सध्या अनेक मतप्रवाह समोर येत आहेत. मातृभाषेतून शिक्षण ते प्रांतिक अस्मिता असे अनेक कंगोरे या मुद्द्याला आहेतच. पण, भाषा ही समाजाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी असल्याने नाटकामध्येही अशा अनेक पैलूंचा विचार करणे क्रमप्राप्तच. बालरंगभूमीवर भाषेचा हा मुद्दा कसा प्रभाव टाकतो, याचा घेतलेला आढावा...
 
भारतात अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. त्या सर्व आपल्या भाषा आहेत असे आपण म्हणतो. पण, सर्वांत जवळची आणि इतर भाषांपेक्षा जास्त बोलली जाते, ती असते आपली मातृभाषा. ज्या राज्यात ती सर्वांत जास्त बोलली जाते ती तिथली राज्यभाषा. माझी आई मराठी बोलते, म्हणून माझी भाषा मराठी. मी समाजाशी पहिल्यांदा संवाद साधला, तोही मराठीतच. माझी ‘मराठी आई’ माझ्यावर प्रचंड माया करते, म्हणून ती मला प्रिय. मग नृत्य, नाट्य, संगीत असो वा कला; त्याचे प्रस्तुतीकरण मला मराठीत करायला आवडते. पण, हे माझे वैयक्तिक मत झाले. सध्याच्या कोवळ्या मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना काय वाटते? यावरून त्यांना कोणत्या भाषेत व्यक्त व्हायला आवडते हे ठरले जाते. भाषा हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे.
 
सध्या भाषेवरून गदारोळ माजला आहे. माझी-तुझी असे म्हणत, हमरी-तुमरीवर येत लोकं भांडणे करताना दिसत आहेत. भाषा ही आई असते. मग ती कोणतीही असो, तिचा आदर झालाच पाहिजे. मुळात अशी परिस्थिती का निर्माण झाली आणि यावर ठोस उपाय काय? हा चर्चेचा विषय तर आहेच पण, चिंतेचाही विषय झाला आहे. ‘मराठी ठार मारा’ असे म्हणत द्वेष, उपहास करताना मी पाहिले आहे. ‘घाटी’ म्हणत मराठी माणसांवर हसताना मी पाहिले आहे. भारतात तिसर्‍या क्रमांकावर सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा मराठी आहे. अभिजात मराठी बोलणार्‍या संतांचा, मावळ्यांचा इतिहास थोर आहे. त्याची कीर्ती सर्वदूर पसरली असतानासुद्धा, त्याचा इतका द्वेष का? याला जबाबदार कोण? तर सखोल विचार करता, आपणच! आपणच त्यांना सूट दिली, नाही का? अन्यराज्यांतील, परराष्ट्रीय भाषेचा मार मराठीवर आपण बसू दिला, त्यात भेसळ होऊ दिली आणि त्यात जात-पात घुसवून, ‘बामनांची भाषा हीच प्रमाणभाषा कशी?’ असे प्रश्न निर्माण करत, आपल्याच भाषेला दूषणे देत तिचे पावित्र्य कमी केले. तुम्ही म्हणाल, याचा आणि बालरंगभूमीचा काय संबंध? संबंध आहे. हे सगळे मुले बघत असतात. या सगळ्याचा मुलांवर परिणाम होतो, मुलांच्या कानावर सगळे पडत असते. अ‍ॅलेक्झा जसे सगळे ऐकत असते, तसेच लहान मुलेही ऐकत असतात. मग मुलांनी जर मोठ्यांचे अनुकरण केले, तर त्यात वावगे काय?
 
बालरंगभूमीवर या सगळ्याचा परिणाम होतो. कारण, नाटक हे व्यक्त होण्याचे ठिकाण आणि भाषा हा त्याचा आधार. मग भाषेत जर भेसळ असेल, त्यात प्रमाण, बोली, शहरी यावर वाद अथवा नैराश्य असेल आणि जी भाषा आपली आहे असे म्हणतो, त्याचा जर जाज्वल्य अभिमानच नसेल, तर त्या भाषेत सादरीकरण करताना कसा आनंद मिळेल बरं? हे सगळे शक्य आहे; जर भाषेचे संस्कार चांगले झाले तर. नाट्यसंस्कार करताना, आपोआप भाषेचे संस्कार होत असतात. पण, त्याकरिता भाषेवर प्रेम करायला घरून शिकवायला हवे. मुले बोलत असताना, इतर भाषांचा उपयोग टाळावा. कुत्रा पाळला की त्याच्याशी इंग्रजीत बोलतो. कारण, त्याला तीच भाषा कळत असावी बहुदा. पण, मग नकळत आपण मुलांशी पण कधी इंग्रजीत बोलायला लागतो, कळतसुद्धा नाही.
बालरंगभूमीवर नाटकात काम करताना, त्यांना एकच भाषा वापरायची असते. ती साधी-सोप्पी मराठीसुद्धा त्यांना अवघड जाते. कारण, एकतर त्यांचे व्याकरण बिघडले असते. ते सुधारले, तर बोलताना इंग्रजीत बोलल्यासारखे बोलतात. नाटक बसवायचे तर कोणत्या भाषेत? बालरंगभूमीवर मी भाषेला घेऊन पडणारे काही प्रश्न, इथे मांडणार आहे. पालक, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक परिस्थिती, या चार घटकांमध्ये ते विभागणार आहेत.
 
पालकांना वाटते की, त्याला पल्लेदार वाक्य मिळावी. पण, भाषेचे संस्कार झाले नसल्याकारणाने त्याची भाषाशुद्धी करून घ्यावी लागते. ‘आमची मुलगी कॉन्व्हेन्टमध्ये जाते आणि आम्ही घरी तसे मराठी फार बोलत नाही, म्हणून तुम्ही तिच्याशी इंग्रजीत बोलाल का?’
 
’आमची मुले हिंदी भाषिक आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी हिंदीत नाटक बसवा.’ बसवायला हरकत नसते पण, मग जेव्हा घ्यायची वेळ येते, तेव्हा मुलांचे प्रवेश खूप कमी होतात. मग आर्थिक गणित बसत नाही. बरं आलेली मुलं मराठी भाषिक असली की, परत त्यांना हिंदी शिकवणे आलेच.
 
भाषेचे महत्त्व पालकांनाच कळले नसल्याने आणि ते स्वतः काही विशेष पावले उचलत नसल्याकारणाने, ही परिस्थिती उद्भवलेली आहे. शालेय शिक्षक मुलांना परीक्षेत उत्तीर्ण करायचेच आहे या भावनेने फार मेहनत घेत नाहीत का? असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला आहे. एक प्रशिक्षक म्हणून, फार मोठी जबाबदारी चातुर्याने पार पाडावी लागते. कुठलेही नाटक शिकवताना मी तिन्ही भाषांचा उपयोग करते, करावा लागतो. कारण, मुलं वेगवेगळ्या स्तरातून आलेली असतात. त्यांचे राहणीमान, त्यांच्या घरचे विचार आणि संस्कार वेगवेगळे असतात. पण, नाटक हे एकाच भाषेत सादर करायचे असते, त्यामुळे त्यांना त्या भाषेची गोडी लागली पाहिजे आणि वाक्य अंगवळणी पडली पाहिजे. बरं, मी जर ठरवले की मी मराठीतूनच बोलणार, तर मग जी हिंदी भाषिक मुलांना समजायला कठीण जाते. त्यामुळे ती माझ्याशी मोकळी होत नाहीत. दडपणात राहून चालणार नसते, कारण नाटक शिकवताना मैत्रीचे नाते हवे. बरं मराठी भाषिक मुलांना मात्र इंग्रजीत बोललेले चालते. कारण, त्यांना सगळ्या भाषा एकत्र करून, बोलायची सवय झाली आहे. मात्र, काहीही असले, तरी नाटक मात्र एकाच भाषेत सादर होत असल्याने,मग त्याची मुलांना सवय लागते. त्यांची भाषा सुधारते, व्याकरण सुधारते, उच्चार सुधारतात आणि गोडीसुद्धा लागते. हे सगळे नकळत होते. मात्र, प्रशिक्षक इथे फक्त नाटक शिकवणारा नसून, त्याला भाषेचा शिक्षकसुद्धा व्हावे लागते. हे सगळे करत असताना , मुलांचे भाषेवरचे प्रेम तर वाढावे पण, त्यांना नाटकसुद्धा आपलेसे वाटावे, म्हणून मग अनेकवेळा नाट्यभाषेत बदल करावे लागतात. आजकालची मुलं जशी बोलतात, तशी काही वाक्य संहितेत घ्यावी लागतात. कारण, नाटक त्यांना त्यांचे वाटणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. नाटक आताच्या काळातले वाटावे आणि असावे म्हणूनही हे करावेच लागते. शेवटी नाटक हे समाजाचाच आरसा असते, हे विसरून चालणार नाही.
 
मुलांना विशेष फरक पडत नाही. कारण, त्यांना जर नाटक आवडले, तर मग भाषा कोणतीही असो ते ती आत्मसात करतात. मुलं मोठ्यांपेक्षा भाषा लवकर शिकतात. त्यांना ही भाषा चांगली आणि ती वाईट असे वाटत नाही. त्यांना तसे वाटण्याचे कारण, समाज आणि घरचे वातावरण हे असते. जेव्हा त्यांना भाषेचे महत्त्व नाटकात आम्ही शिकवतो, तेव्हा ते आपसुखच भाषेवर प्रेम करायला लागतात आणि त्याचा आदरही करतात. मला इंग्रजीची भीती वाटते म्हणणार्‍या मुलीला, इंग्रजी भाषा आवडायला लागली आहे असे सांगताना मी पाहिले आहे. ‘ख हरींश ारीरींहळ’ म्हणणारी मुलगी मला जेव्हा सांगते की, मला आता मराठी आवडते आणि शाळेत गुणसुद्धा चांगले मिळतात, तेव्हा मला प्रचंड आनंद होतो. हे सगळे नाटकामुळे सहज शक्य आहे. वेगवेगळ्या भाषेतील मुले एकत्र येऊन जेव्हा कला सादर करतात, तेव्हा ते तुझी भाषा श्रेष्ठ का माझी, अशी भांडणे करताना दिसत नाहीत. आपल्या आईची काळजी घेणे, आपले कर्तव्य आहे. मला नाट्यचळवळ चालवताना असे वाटते की, भाषेची गोडी ही बालपणीच लावणे गरजेचे आहे. ती केवळ संवाद म्हणून न वापरता, त्याचा उपयोग माणसे जोडण्यासाठी असावा, तोडण्यासाठी नव्हे. मुलांशी बोलताना आजही मला त्यांच्या भेसळ मराठी भाषेत बोलावे लागते, ते केवळ त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठीच. मग मात्र मी अस्खलित मराठीत बोलते.
 
समाजाला मात्र शहाणे व्हायला बराच काळ जावा लागणार आहे. कारण, जेव्हा मी इंग्रजी किंवा हिंदी भाषेत नाटक बसवते, तेव्हा मला ट्रोल केले जाते. जसे की, ‘मराठी असून हिंदी का बोलता? लाज वाटते का तुम्हाला? या आल्या मॅडम, आता मुलांना इंग्रजीत नाटक शिकवणार म्हणे!’ मला हसू येते आणि दयाही येते. मुलांना सगळ्या भाषा शिकवाव्या, मात्र त्याचा आदर करायला आधी शिकवावे हे त्यांना कोण सांगणार? जेव्हा मी ‘सियावर रामचंद्र की जय’ नावाचे हिंदी बालमहानाट्य बसवायला घेतले, तेव्हा 20 मिनिटांचा फोन कॉल एका मराठी बंधूने केला. त्यांनी नाटक पाहिले होते. ते त्यांना प्रचंड आवडले होते. पण, आक्षेप एकाच गोष्टीचा होता की, मॅडम, तुम्ही पुण्यात राहून हिंदीत का नाटक बसवले? मला समजावून सांगायला 20 मिनिटे लागली. एक मराठी बहिणीचे आधी कौतुक करायचे सोडून, भाषेचे भांडण करायचे होते. पण, मी मात्र त्यांना शांतपणे समजावून सांगितले. मराठी माणूस मोठा झाला. अटकेपार त्याने झेंडा फडकवला आणि याही पुढे तो पुढे जात राहणार आहे. मी येणार्‍या पिढीला नाटकाची गोडी लावते, तशीच भाषेचीसुद्धा गोडी लागली पाहिजे. मराठी रंगभूमी जिवंत ठेवायची असेल, समृद्ध करायची असेल, तर बालनाट्य प्रशिक्षकच त्यात खारीचा पण मोलाचा वाटा देणार आहे हे निश्चित. भाषेतून चांगले वाचणे, बोलणे आणि वागणे आवश्यक.
रानी राधिका देशपांडे  
7767931123
अग्रलेख
जरुर वाचा
१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान

१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान

( Maharashtra State Rural Improvement Mission honored in 100day office improvement program ) १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान करण्यात आला. अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121