मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Hindu Leader Death) बांगलादेशच्या दिनाजपूर येथील 'बांग्लादेश पूजा उद्यापन परिषद, बिरल युनिट'चे उपाध्यक्ष भाबेश चंद्र रॉय यांची काही अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्याने जगभरात संतापाची लट उसळली आहे. ते ५८ वर्षांचे होते. बांगलादेशातील एक प्रमुख हिंदू नेता म्हणून त्यांची विशेष ओळख होती. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी त्यांच्याच घरातून काही अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले होते व नंतर त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली होती.
हे वाचलंत का? : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी पोलिसांच्या अहवालात मोठा खुलासा
भाबेश चंद्र रॉय यांची हिंदू समाजावर मजबूत पकड होती. ते ढाक्यापासून ३३० किमी अंतरावर असलेल्या दिनाजपूरमधील बासुदेवपूर गावचे रहिवासी होते. त्यांची पत्नी शांतना यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेचार वाजता एक फोन आला. फोन करणाऱ्याला फक्त भाबेश घरी आहे की नाही हे जाणून घ्यायचे होते. सुमारे अर्ध्या तासानंतर दोन दुचाकीवरून चार जण भाबेश यांच्या घरी आले आणि त्यांचे अपहरण करत जबरदस्तीने पळवून नेले.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्यांना जवळच्या नाराबारी गावात नेण्यात आले, ज्याठिकाणी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळीच हल्लेखोरांनी भाबेशला बेशुद्धावस्थेत व्हॅनमध्ये बसवून घरी पाठवले. त्यांना प्रथम जवळच्या रुग्णालयात, नंतर दिनाजपूर वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे बिरळ पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अब्दुस सबूर यांनी सांगितले. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.
अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आवाहन
अमेरिकेने बांगलादेशात जाणाऱ्या आपल्या नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे. बांगलादेशात अशांतता, गुन्हेगारी आणि दहशतवादाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अमेरिकन नागरिकांनी चटगाव हिल ट्रॅक्ट प्रदेशात प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.
सर्वांना समान सुरक्षा आपली नैतिक जबाबदारी
बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या अंतर्गत हिंदू अल्पसंख्याकांचा पद्धतशीर छळ होतो आहे. यापूर्वीच्या घटनांचे गुन्हेगारही मोकाट फिरतायत. बांगलादेश सरकारने कोणतीही सबब आणि भेदभाव न करता सर्व अल्पसंख्याकांच्या, विशेषत: हिंदूंच्या सुरक्षिततेची खात्री केली पाहिजे. सर्व नागरिकांना समान सुरक्षा प्रदान करणे ही आपली घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी आहे.
- रणधीर जैस्वाल, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय