मुंबई: ( BJP 12 lakh active workers ) “भाजपकडून ७० टक्के बुथ समित्यांचे गठन झाले असून, दि. २२ एप्रिलपर्यंत १ लाख बूथ समित्या गठित करण्याचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या रचनेनुसार एका बुथमध्ये १२ सदस्य असतात. म्हणजेच १२ लाख सक्रीय कार्यकर्त्यांची फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्य करेल”, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) खा. अरुण सिंह यांनी शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी दिली.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. सदस्य नोंदणीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
संघटन पर्वाअंतर्गत दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रीय सदस्यांच्या नोंदणीचे उद्दीष्ट साध्य करून महाराष्ट्र भाजपचे सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन पर्व यशस्वी ठरत असल्याचे सिंह यांनी नमूद केले.
चौकशी होणारच
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी एका कंपनीकडून ७ कोटीला जमीन खरेदी केली. वाड्रा यांनी याच जमिनीची विक्री ४ महिन्यात त्याच कंपनीला ५८ कोटीला केली. अवघ्या चार महिन्यांत जमिनीची किंमत एवढी वाढवणारा व्यवहार केल्यावर त्याची चौकशी होणारच, असे खा. सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.