दक्षिण कोरियाच्या राजधानीचे शहर असलेले सेऊल हे जगातील सर्वांत मनमोहक शहरांपैकी एक. इथे प्राचीन परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. सेऊलमध्ये कला, संगीत आणि संस्कृती एकरूप झालेली दिसून येते. अशा या सेऊलला सुमारे दोन हजार वर्षांचा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला.
बायकजेची राजधानी विरीय सोंग ही आताच्या सेऊलच्या आग्नेय भागात हाँगकाँग नदीच्या काठावर वसलेली होती. सन 1394 मध्ये जोसेन राजवंशाची (1392-1910) राजधानी म्हणून घोषित झाल्यानंतर या शहराच्या विकासाने जोर धरला. 19व्या शतकाच्या अखेरीस या भागात आलेल्या बंदर प्रकल्पांमुळे अनेक सुविधांनी बाळसे धरले. विजेची सुविधा, रेल्वेमार्ग, रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा सुविधा, शाळा आणि रुग्णालयांनी आधुनिक सेऊलच्या निर्मितीचा पाया रचला. सन 1910-1945च्या दरम्यान सेऊल जपानी वसाहतवादाच्या प्रभावाखाली आले. त्यानंतर हळूहळू औद्योगिकीकरण झाले, ज्यामुळे शहराभोवती मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती उभ्या राहिल्या. या परिघीय प्रदेशांना शहराच्या कार्यक्षेत्रात मान्यता मिळू लागल्याने सेऊल एका नवीन निवासी क्षेत्रात रूपांतरित होऊ लागले. 1945 साली कोरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, शहराचे अधिकृतपणे ‘सेऊल मेट्रोपॉलिटन सिटी’ असे नामकरण करण्यात आले. मात्र, कोरियन युद्धामुळे शहर उद्ध्वस्त झाले.
1950च्या दशकात सेऊलने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे या युद्धाच्या राखेतून विकासाच्या दिशेने भरारी घेतली. विकास आणि जलद आर्थिक वाढीच्या आधारावर केवळ अर्ध्या शतकात सेऊल पुन्हा एकदा जागतिक महानगर बनले. जागतिक युद्धानंतर अनेक युरोपीय देशांना औद्योगिकीकरणासाठी एका शतकाचा कालावधी लागला. मात्र, कोरियाने 30 वर्षांपेक्षा कमी कालावधीत जागतिक महानगर बनण्याच्या दिशेने कूच केली. केवळ 50 वर्षांत सेऊलने विविध शहरी समस्यांवर मात करत ‘स्मार्ट सिटी’ बनवली, जिथे एक कोटी लोक आरामात वास्तव्य करू शकतील.
सेऊलचा समकालीन विकास तीन टप्प्यात विभागला जातो. 1960 ते 1970 सालच्या दशकात, सेऊलमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा प्रवाह आणि सामाजिक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे वाहतुककोंडी, प्रदूषण, बेकायदेशीर वसाहतींची निर्मिती आणि घरांची कमतरता यांसारख्या गंभीर शहरी आव्हानांचा सामना केला. या समस्या सोडवण्यासाठी, सेऊल महानगर सरकारने रस्त्यांचा विस्तार, बेकायदेशीर वसाहती क्षेत्रांमध्ये अपार्टमेंट कॉम्प्लेक्स बांधणे आणि चेओंग्गे ओव्हरपास आणि येउइदो बेट बांधून मूलभूत पायाभूत सुविधा स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले.
1980 ते 1990 सालच्या दशकात, कोरियन सरकारने 1986 साली सेऊल महानगरात आशियाई खेळ आणि 1988 साली ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले. यामुळे या भागात जलद सुधारणा आणि शहर सुशोभीकरण धोरणांची मालिकाच सुरू झाली. एकीकडे हांगांग नदी पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजना तयार करण्यात आली. नदीकाठी चांगले रस्ते बांधण्यात आले. दुसरीकडे मध्यमवर्गीयांमध्ये घरांच्या मागणीत झालेल्या स्फोटक वाढीला प्रतिसाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अपार्टमेंट कॉम्प्लेक्स स्थापन केले. परिणामी सेऊल सार्वजनिक वाहतूक, उच्च-गुणवत्तेचे रस्ते, जलकुंभ आणि सांडपाणी व्यवस्था असलेले महानगर म्हणून नावारूपास आले.
2000 सालच्या दशकात, माहिती- तंत्रज्ञानाच्या विकासासह नागरिकांचे जीवनमान सुधारण्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे सेऊलच्या शहरी व्यवस्थापन धोरणाने प्रगत आयटीसह एक शाश्वत शहर निर्माण करण्याच्या दिशेने बदलांना सुरुवात केली. यामध्ये ‘सेऊल वन’ विकास प्रकल्प यांसारख्या अनेक उद्यान विकास प्रकल्पांसह, सेऊल महानगर सरकारचे प्रशासन डिजिटल झाले. कारमुक्त रस्त्यांची निर्मिती हा सेऊल शहरातील पादचार्यांकडे लक्ष वेधणार्या वाहतूक धोरणांशी संबंधित एक प्रातिनिधिक प्रकल्प होता. सेऊलने 1997 साली तीन रस्ते ‘कारमुक्त रस्ते’ म्हणून घोषित झाले आणि हळूहळू कारमुक्त क्षेत्रांची संख्या वाढू लागली. अशारितीने सेऊलच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत, एका शाश्वत महानगराच्या दिशेने सेऊलचा प्रवास नक्कीच लक्षवेधी आणि जगासाठी अनुकरणीय आहे.