भारताचे सुपुत्र उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर नुकतेच त्यांचे इच्छापत्रही समोर आले. टाटांनी आपल्या इच्छापत्रातून त्यांची सर्वोपरी सेवा केलेल्या अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला आर्थिक राशी देऊन, कर्जमाफी करुन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीचे वास्तववादी दर्शन घडविणार्या रतन टाटा यांच्या इच्छापत्राच्या निमित्ताने...
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे अवघे जीवनकार्य सुपरिचित. सध्या त्यांच्या मरणोत्तर इच्छापत्राची चर्चा विविध माध्यमांत रंगली आहे. यामध्ये त्यांच्या विशाल औद्योगिक-व्यावसायिक साम्राज्याचा व्याप, वैयक्तिक संपत्ती व मालमत्ता यांची विचारपूर्वक व नियोजनपूर्ण वितरण-विभागणी टाटांनी केली. आयुष्यात खर्या अर्थाने साथसंगत देणार्या सहकारी-सेवकांबद्दल जाण ठेवून, जी मानवीय भावना त्यांनी इच्छापत्रांतून व्यक्त केली, ती अनेक कार्यांनी बेजोड व अनुकरणीय ठरावी.
नुकत्याच जाहीर झालेल्या रतन टाटा यांच्या इच्छापत्राचा मागोवा घेणे म्हणूनच क्रमप्राप्त ठरावे. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी त्यांचे इच्छापत्र सर्वप्रथम लिहिले होते ते दि. 18 एप्रिल 1996 रोजी. त्यानंतर सुमारे पाच वर्षांनी म्हणजेच टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष झाल्यावर या इच्छापत्रात काही बदल व सुधारणा त्यांनी केल्या. त्यानंतर या दोन्ही इच्छापत्रांना संयुक्त स्वरूप देऊन रतन टाटा यांनी आपले अंतिम इच्छापत्र तयार केले ते दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी व त्याचाच तपशील आता जाहीर करण्यात आला आहे.
या इच्छापत्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या कोट्यवधींच्या साधनसंपत्तीच्या मरणोत्तर वितरणात आपल्या जवळच्या कौटुंबिक नातेवाईकांसह जवळच्या कर्मचार्यांची जाणीवपूर्वक आठवण टाटांनी ठेवली. आपल्या मालमत्तेतील वितरणात या मंडळींना आवर्जून सहभागी करून घेतले. खरं तर त्यांच्या तुलनेत अशा छोट्या व्यक्तींची जाणीवपूर्वक नोंद घेतल्याने रतन टाटा यांचेच मोठेपण प्रकर्षाने अधोरेखित व्हावे.
यासंदर्भात थोडक्यात व महत्त्वाचे म्हणजे, रतन टाटा यांनी आपल्या एकूण संपत्तीच्या रकमेपैकी साडेतीन कोटी रुपये त्यांच्या कार्यालयीन कर्मचारी व वैयक्तिक, घरगुती कामे करणार्या कर्मचार्यांना देण्यासाठी आवजूर्र्न राखून ठेवले. यामध्ये रतन टाटा यांनी त्यांच्या वाहनाची साफसफाई करणारे, कार्यालयीन कामकाज करणारे साहाय्यक, शिपाई इत्यादी सर्व स्तरांवरील कर्मचार्यांचा आवर्जून समावेश तर केलाच; त्याशिवाय या मंडळींना त्यांनी दिलेल्या कर्जाऊ, उसन्या रकमेची संपूर्णपणे माफीसुद्धा दिली, हे विशेष!
रतन टाटा यांनी त्यांच्या इच्छापत्रात नमूद केल्यानुसार, त्यांच्याकडे घरगुती स्वरूपाची कामे करणार्या कर्मचार्यांना 15 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये या घरगुती कर्मचार्यांच्या सेवा कालावधीचा विचार करण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या घरी विविध प्रकारची आपत्कालीन सेवा देणार्या कामगारांना एक लाख रुपये मिळणार आहेत.
इच्छापत्रात नमूद केल्यानुसार, रतन टाटा यांच्याकडे असणार्या व ते वापरात असणार्या विशेष दर्जाच्या व महागड्या कपड्यांसह नित्योपयोगातील वापरत्या येण्याजोग्या वस्तू व उपकरणे गरीब व गरजू लोकांमध्ये संबंधित समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून वितरीत केल्या जाणार आहेत.
रतन टाटा यांनी त्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणार्या राजन शौ याला एक कोटी रुपये देण्याची तरतूद केली असून, यामध्ये त्यांना टाटा यांनी दिलेल्या 51 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा समावेश आहे. याशिवाय त्यांना भोजनसेवा देणार्या सुभाशीष कोनार यांना 36 लाखांच्या कर्जमाफीसह 66 लाख रुपये देण्याची तरतूद रतन टाटांनी आपल्या इच्छापत्रात व्यक्त केली आहे. यावरून रतन टाटांची त्यांच्या घरी व त्यांच्यासाठी काम करणार्या प्रत्येकाबद्दल आपल्या मरणोपरांत असणारी कणव आणि जाणीव स्पष्ट होते.
कार्यालयीन सहकार्यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास, रतन टाटांनी त्यांच्या इच्छापत्रात सचिव दिलनाझ ग्लॅझर यांच्यासाठी दहा लाख लिहून ठेवले. त्यांचे विशेष साहाय्यक शंतनू नायडू यांना कॉर्नेल विद्यापीठातून ‘एमबीए’चे उच्च शिक्षण घेण्यासाठी दिलेली एक कोटींची रक्कमही माफ केली आहे. याशिवाय रतन टाटा यांनी त्यांचा वाहनचालक असणार्या राजू लिऑन यांची 18 लाख रुपयांची कर्जमाफी करून, त्याशिवाय आपल्या वाहनचालकाला 15 लाख रुपये देऊ केले आहेत.
वरील रकमा व विशेषतः त्यातील कर्जमाफीच्या संदर्भात आपल्या दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजीच्या इच्छापत्रानुसार, आपल्या इच्छापत्राची अंमलबजावणी करणार्या विश्वस्त व विश्वासू संबंधितांना स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, त्यांच्या अंतिम इच्छांप्रमाणेच विशेषतः त्यांनी नमूद केलेल्या सहकार्यांच्या कर्जमाफीच्या निर्देशांची कसोशीने अंमलबजावणी केली जावी. एवढेच नव्हे तर, “माझ्या सहकार्यांसाठी मी प्रस्तावित केलेली कर्जमाफी ही कुठल्याही प्रकारे मेहेरबानी न समजता, माझ्यातर्फे माझ्या या सहकार्यांसाठी देण्यात आलेली माझी सदिच्छा भेटच समजावी,” असे स्पष्ट निर्देश रतन टाटा यांनी दिले आहेत, हे महत्त्वाचे.
अन्य व्यक्तींच्या स्वरूपात उल्लेखनीय बाब म्हणजे, रतन टाटा यांनी ‘टाटा ट्रस्ट’मध्ये सल्लागार म्हणून काम करणार्या होशी मलेसरा यांच्यासाठी पाच लाख रुपयांची, तर अलिबाग येथील बंंगल्याची काळजी घेणार्या देवेंद्र कटामोलू यांच्यासाठी दोन लाख रुपयांची तरतूद आपल्या इच्छापत्रात नमूद केली आहे. याशिवाय त्यांनी आपल्या खासगी सचिव दिप्ती दिवाकरन यांना दीड लाख, तर कार्यालयीन शिपाई म्हणून काम करणार्या गोपालसिंह व पांडुरंग गुरव या उभयतांना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले असून, एक अन्य साहाय्यक सरफर्झ देशमुख यांचे दोन लाखांचे कर्ज माफ केले आहे. यावरून आपल्यासाठी काम करणार्या प्रत्येकासाठीच्या रतन टाटा यांच्या आत्मिक आपुलकीच्या भावनाच स्पष्ट होतात.
उच्च शिक्षण घेणार्यांना रतन टाटा नेहमीच वैयक्तिक स्तरावर प्रोत्साहन देत असत. त्यामुळेच रतन टाटा यांनी त्यांच्या शेेजारी राहणार्या जॅक मिलाईट यांना इंग्लंडमधील ‘वॉरविक बिझनेस स्कूल’मधून ‘एमबीए’ करण्यासाठी दिलेले 23.7 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आज जॅक मिलेट हे त्यांचा ‘एमबीए’ अभ्यासक्रम पूर्ण करून ‘प्रेट अॅण्ड व्हिटनी’ या हवाई वाहतूक कंपनीत उच्चपदावर कार्यरत असून, त्यांना आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टाटा यांनी दिलेला मदतीचा हात आयुष्यभराची साथ ठरला आहे.
आपल्या जमीन मालमत्तेपैकी एक तृतीयांश जमीन रतन टाटा यांनी ताज हॉटेलच्या निवृत्त कर्मचारी मोहिनी दत्ता यांच्या नावे केली आहे. याशिवाय 85 लाख रुपये सिंगापूर येथील वित्तीय संस्थेला सहयोग राशी स्वरूपात प्रदान केली व त्याचा विनियोग ‘टाटा ट्रस्ट’चे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरमण व ‘टाटा टेक्नोलॉजीचे निवृत्त मुख्याधिकारी पॅट्रिक मॅक गोल्डरिक यांनी करावा, असे आपल्या इच्छापत्रात नमूद केले आहे.
रतन टाटा यांनी आपल्या मरणोपरांत इच्छापत्राचे सारासार व संपूर्णपणे क्रियान्वयन करण्यासाठी आपल्या ज्या नातेवाईक, मित्र व सहकार्यांची निवड केली, त्यामध्ये योजनापूर्वक शिरीन जिजीभॉय व दिना जिजीभॉय या भगिनी, मित्र मिहिल मिस्त्री, ‘टाटा ट्रस्ट’चे विश्वस्त दारियस खंबाटा यांची निवड केली. रतन टाटा यांनीच दिलेल्या निर्देशानुसार, त्यांच्या इच्छापत्राची अंमलबजावणी करताना वरीलपैकी कुणी वाद वा मतभेद निर्माण केले, तर त्यांचा रतन टाटांच्या संपत्तीत कुठलाही वाटा राहणार नाही, हे देखील स्पष्ट केले आहे.
बर्याच वर्षांपूर्वी शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या इच्छापत्रानुसार आपल्या मृत्यूनंतर त्यांच्या वाहनचालकासाठी 25 हजार रुपये देण्याचे लिहून ठेवले होते. रतन टाटांनी अशाच उदारतेला आपल्यासाठी काम करणार्या छोट्या व्यक्तींसाठी, पण आपल्या इच्छापत्रात राशी प्रदान करून त्यांच्या मनाचे मोठेपण अनेक अर्थांनी स्पष्ट केले आहेच. मात्र, रतन टाटा यांच्या मनाचे मोठेपण प्रकर्षाने जाणवते, ते त्यांनी आपल्याला प्रिय असणार्या ‘टिटो’ या कुत्र्यासाठी आवर्जून राखून ठेवलेल्या 12 लाखांच्या तरतुदीमुळे एकूणच काय तर रतन टाटा यांचे मोठेपण त्यांच्या मरणांती अधिक भावते.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)