पुढच्या वेळी उद्धव ठाकरेंचे...! खासदार नारायण राणे यांचा दावा
18-Apr-2025
Total Views | 37
मुंबई : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे राज्याचे नुकसान केले. पुढच्या वेळी ठाकरेंचे पाच आमदारही नसतील, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. गुरुवार, १७ एप्रिल रोजी त्यांनी बेस्ट भवन येथे बेस्टच्या विविध प्रश्नांसंदर्भात समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
खासदार नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार का अंगिकारले नाहीत. त्यांना साहेबांचे विचार माहिती आहेत. त्यांच्या भाषणाच्या कॅसेट घरात आहेत. त्यांनी त्या रात्रभर ऐकाव्या. लोकांपर्यंत जाणे, शिवसैनिकांना सांभाळणे त्यांना प्रेम देणे हे बाळासाहेबांनी केले म्हणून संघटना मजबूत होती. उद्धव ठाकरेंना काहीही येत नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी अडीच वर्षे राज्याचे नुकसान केले. राज्य १० वर्षे मागे गेले. पुढच्या वेळी उद्धव ठाकरेंचे पाच आमदार नसतील. शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे आणि उद्धव ठाकरेंची सेना बंद अवस्थेत आहे. मी साहेबांचा शिवसैनिक आहे. उद्धव आपल्या समोर टिकणार नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कधी भीक पण दिली नाही," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "बेस्ट ही मुंबईकरांची ओळख असून ती टिकली पाहिजे. या बैठकीत एकूण पाच प्रश्नांवर चर्चा झाली. बेस्ट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली आहे. बेस्टकडे सध्या ७५० बसेस असून आणखी ८ हजार बसेसची गरज आहे. यासोबतच कामगारांचे प्रश्न, निवृत्तीवेतन, कोविडमधील भत्ता असे अनेक आर्थिक प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही राज्य सरकारकडे जाणार आहोत. येणाऱ्या १० दिवसांच्या आत बेस्टच्या प्रश्नांवर राज्य सरकारने काहीतरी मदत करावी तरच बेस्ट टिकेल," असेही ते म्हणाले.