भारताचा वस्तु आणि सेवा क्षेत्राच्या निर्यातीचा, ७३ अब्ज डॉलर्सचा विक्रम
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून आकडेवारी प्रसिध्द
18-Apr-2025
Total Views | 8
नवी दिल्ली : भारताने वस्तु व सेवा क्षेत्राच्या निर्यातीत वाढणारी आपली ताकद पुन्हा एकदा सिध्द केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसार भारताची या क्षेत्रातील निर्यात ७३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत झालेली ही वाढ ०.०८ टक्के इतकी आहे. यामध्ये पेट्रोलियम पदार्थांव्यतिरिक्तची निर्यात ही ६ टक्क्यांनी वाढली आहे. हे सर्वात विशेष आहे.
वस्तुंच्या निर्यातीत प्रामुख्याने कॉफी, तंबाखू, इलेक्ट्रीक वस्तु, भात, तागापासून बनवलेल्या वस्तु, यामध्ये धान्य वाहून नेण्याच्या गोण्या, मांस, दुग्धजन्य पदार्थ, पोल्ट्री उत्पादने, चहा, प्लॅस्टिकच्या वस्तु यांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त कापड उत्पादने, औषधे आणि त्यांच्यासाठीची आवश्यक ड्रग्स यांच्याही निर्यातीत वाढ झाली आहे. या वस्तुंच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. या संपूर्ण निर्यातीत अमेरिकेला होत असलेल्या निर्यातीचा वाटा सर्वात जास्त आहे. अमेरिकेचा वाटा ३५.०६ टक्क्यांचा आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, केनिया आणि युकेचा नंबर लागतो. यादेशांना भारताची जास्त निर्यात होत आहे.
क्षेत्रवार बघायला गेले तर मांस, दुग्धजन्य पदार्थ, पोल्ट्री उत्पादने या उत्पादनांची निर्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ४.५३ अब्ज डॉलर्सवरुन ५.१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. ही वाढ १२.५७ टक्क्यांची वाढ आहे. कापड निर्यात ही २०२३-२४ मध्ये १४.५३ अब्ज डॉलर्सवरुन २०२४-२५ मध्ये १५.९९ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. औषधांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली असून २०२३-२४ मधील २७.८५ अब्ज डॉलर्सवरुन २०२४-२५ मध्ये हीच निर्यात ३०.४७ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. यातून भारताची या क्षेत्रातील वाढती ताकद आणि विस्तार दिसत आहे असे म्हणता येईल.