माओवादमुक्त जंगलांनंतर शहरी नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाची गरज

    18-Apr-2025
Total Views | 23

Naxalism
“जंगलातून माओवादी हद्दपार होत असले तरी शहरी नक्षलवाद्यांचा धोका अजूनही कायम आहे,” असे विधान नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानिमित्ताने शहरी नक्षलवाद्यांची समाजात खोलवर विषपेरणी करणारी कार्यशैली आणि राष्ट्रविरोधी षड्यंत्रे उलगडणारा हा लेख...
इसवी सन पूर्व 63 मध्ये सल्लागार असलेले रोमन राजकारणी मार्कस टुलियस सिसेरो यांच्या मते, “एखादे राष्ट्र त्या देशातील मूर्खांना आणि महत्त्वाकांक्षी लोकांनाही टिकवून ठेवू शकते. पण, ते अंतर्गत बेईमानीला तोंड देऊ शकत नाही.” ते म्हणतात ना, वेशीवर असलेला शत्रू कमी शक्तिशाली असतो. कारण, तो परिचित असतो आणि तो त्याचा झेंडाही फडकवतो. तथापि, देशद्रोही वेशीच्या आत मुक्त संचार करतो, त्याचे धूर्त विचार सर्व गल्लीबोळांतून गुंजत असतात आणि अगदी सरकारच्या स्वतःच्या सभागृहातही पोहोचतात. कारण, तेव्हा देशद्रोही हा ‘देशद्रोही’ दिसत नाही; तर तो अशा बोलीभाषेत बोलतो, ज्याची त्याला सवय असते, समाजातील अन्य लोकांचे स्वरूप आणि कल्पना तो स्वीकारतो आणि सर्व लोकांमध्ये खोलवर असलेल्या अशा सुप्त अवगुणांवर खेळतो. तो राष्ट्राच्या आत्म्याला एकप्रकारे कुजवतो, दिवसरात्र देशाच्या अस्मितेला कमकुवत करण्यासाठी गुप्तपणे आणि अदृश्यपणे काम करतो आणि राजकीय व्यवस्थेला इतके संक्रमित करतो की, ती आता प्रतिकारच करू शकत नाही. त्यांच्यापेक्षा खून करणारा कमी भयावह असतो. भारतही गेली कित्येक दशके नक्षलवादाच्या अशाच अंतर्गत समस्येचा सामना करीत आहे, ज्यामध्ये शहरी नक्षलवादाचाही समावेश आहे. देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 वरून 38 पर्यंत कमी झाली आहे. केंद्र सरकार 2026 सालापर्यंत नक्षलवादाचे समूळ नेटवर्क नष्ट करण्याची योजना आखत आहे. तथापि, मार्कस सिसेरोची विधाने शहरी नक्षलवादाच्या सर्वांत मोठ्या धोक्याचे वर्णन करतात. या विषारी मानसिकतेचा किंवा विचारसरणीचा परिणाम म्हणून, आपण एक समाज आणि राष्ट्र म्हणून खूप त्रास सहन करीत आहोत. ते आता ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक, 2024’ विरुद्ध लोकांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करीत आहेत.
 
शहरी नक्षलवाद्यांची कार्यशैली
 
अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेला ‘शहरी नक्षलवादी’ हा शब्दप्रयोग शहरी भागांतील अशा व्यक्ती आणि संघटनांना सूचित करतो, जे माओवादी बंडखोरीबद्दल सहानुभूती दाखवतात, त्यांना पाठिंबा देतात किंवा सक्रियपणे मदत करतात. शहरी नक्षलवादी आणि माओवादी भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका निर्माण करतात आणि शत्रू देशांमध्ये त्यांचे असंख्य समर्थकही आहेत, ज्यांच्याशी आपण अनेक वर्षांपासून ‘प्रॉक्सी युद्ध’ लढत आहोत. स्थानिक स्पर्धेला विकत घेऊ पाहणार्‍या जागतिक व्यावसायिक महाकायाप्रमाणे हे शहरी नक्षलवादी आणि माओवादी भारताविरुद्ध हल्ला करण्यासाठी आदर्श मार्ग आहेत. हे शहरी नक्षलवादी खोटी सहानुभूती दाखवणारे, बनावटी बुद्धिमान, चांगुलपणाने बोलणारे असतात आणि कथित सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ किंवा मानवी हक्कांचे समर्थक म्हणून स्वतःला समाजासमोर सादर करतात. परंतु, त्यांचे खरे ध्येय तरुण, भोळ्याभाबड्या लोकांना सोबत घेऊन माओवादी प्रचाराचा प्रसार करून देश अस्थिर करण्याचेच असते. ‘एनआयए’च्या अभ्यासानुसार, अनेक आघाडीच्या संघटना आणि विद्यार्थी संघटना या भरती प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत. या संघटना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या आदर्शवादाचा आणि नाजूक मनाचा फायदा घेतात. ते विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते असल्याचे भासवून, सरकारला विरोध करण्यास आणि हिंसक, बंडखोर जीवनशैली स्वीकारण्यास प्रवृत्त करून कट्टरपंथी विचारसरणीचे शिक्षण देतात.
 
अशा विद्यापीठांच्या, महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये भारतविरोधी जी काही निषेध आंदोलने आणि हिंसाचार आपण पाहतो, ते मुख्यत्वे शहरी नक्षलवाद्यांचे विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडण्याचे माध्यम आहे. अशा ब्रेनवॉशिंगमुळे समाज आणि राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाला धक्का बसतो. हे नक्षलवादी, ‘जागतिक डीपस्टेट’ बाजारपेठेच्या मदतीने केवळ स्वार्थासाठी काम करतात. आंतरराष्ट्रीय मालकांना आणि वित्तपुरवठादारांना अनुकूल असलेल्या कार्यांना ते समर्थन देतात. परंतु, राष्ट्र-समर्थक असलेल्या प्रत्येक गोष्टीला नाकारतात. त्यांना फक्त जातीयवाद, काश्मिरी फुटीरतावाद आणि खलिस्तानी चळवळीसारखे विभाजनवादी विचारच भडकवायचे आहेत. मग अशा फुटीरतवादी विचारांना अनिवासी भारतीयांचे सोशल मीडिया, काही मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि कॅम्पस गप्पासारख्या व्यासपीठांवरुन हवा दिली जाते. म्हणूनच तुम्हाला कळण्यापूर्वी भारताला आतूनच खोलवर पोखरण्यासाठी पुरेसे नक्षलवादी तयार झालेले असतात.
 
त्यांचे अनुयायी आणि कार्यकर्ते, तसेच माओवाद प्रभावित भागातील बहुसंख्य लोकांचाही माओवादाशी फारसा सैद्धांतिक संबंध नाही. ते फक्त संतप्त, अलिप्त, उपेक्षित आहेत, ज्यांना अत्याचारित, अपमानित आणि अन्याय्य वागणूक समाजाकडून अथवा सरकारकडून आपल्याला कायमच दिली जाते, असे वाटते. माओवादी या भावनेचा चतुराईने फायदा घेतात. उदाहरणार्थ, बिहारमधील जातीचे वाद, आंध्र प्रदेशातील जमीनदारांबद्दलचा द्वेष, आदिवासी भागात वन कायद्यांबद्दलचा असंतोष, तरुणांची बेरोजगारी आणि मुस्लीम कट्टरतावाद या सर्वांकडे बंदुकांच्या वापराद्वारे सत्ता मिळविण्याचे मार्ग म्हणून बघितले जाते. म्हणूनच कट्टरपंथी नेमके कशासाठी उभे आहेत, याची अंतिम उद्दिष्टे आणि परिणामांबद्दल सार्वजनिक समज वाढवण्याची आज नितांत गरज आहे. तसेच, स्थानिक तक्रारी चांगल्या प्रशासनाद्वारे आणि जबाबदारीद्वारे योग्यरित्या सोडवल्या पाहिजेत, जेणेकरुन असुविधेचे रुपांतर असंतोषात होणार नाही.
 
माओवादी शहरीकरणासोबतच येणार्‍या नैसर्गिक दोषरेषांचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. जप्त केलेल्या कागदपत्रांनुसार, सर्वेक्षण हा शहरी एकत्रीकरण मोहिमेतील पहिला टप्पा आहे. या टप्प्यात शहरी भू-दृश्यांचे त्यांच्या भौगोलिक रचनेनुसार परीक्षण करणे समाविष्ट आहे, ज्यामध्ये ते औद्योगिक किंवा अविकसित प्रदेशांत सेवा देतात की नाही; कार्यबलाच्या रचनेतील बदल; भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांचे बारकाईने परीक्षण; शहरांमधील आर्थिक असमानता आणि वस्तीकरणात गुंतलेल्या प्रक्रियांचा समावेश आहे. कारण, ही त्यांच्या भरतीसाठी संभाव्य प्रजनन स्थळे आहेत, ज्यांचा ते सहजपणे भारतीयांच्या हिताविरोधात, त्यांना ब्रेनवॉश करण्यासाठी शस्त्र म्हणून उपयोग करू शकतात.
 
असे हे माओवादी वैचारिक तर्क आणि लॉजिस्टिकल मदत देऊन नक्षलवादी संघटनांमध्ये भरती वाढवतात, ज्यामुळे बंडखोर चळवळी वाढीस लागतात. जरी शहरी नक्षलवादी सशस्त्र युद्धात सक्रियपणे सहभागी नसले तरी, त्यांच्या कृती देशांतर्गत हिंसाचार, दंगली आणि नागरी अशांतता निर्माण करतात, ज्यामुळे गावे, नगरीय, महानगरीय प्रदेश अस्थिर होतात. शहरी नक्षलवाद्यांचे जागोजागी भाषण राजकीय ध्रुवीकरण वाढवू शकते, ज्यामुळे सामाजिक दरी निर्माण होऊ शकते आणि लोकशाही प्रक्रियांना तडा जाण्याची शक्यता असते. शहरी नक्षलवाद्यांविरुद्ध सरकारी कारवाई विरोधात वारंवार मानवी हक्कांच्या चिंता निर्माण उभ्या केल्या जातात, ज्यामध्ये मनमानी अटक आणि मतभेद, दडपशाहीचे दावे समाविष्ट आहेत, ज्यामुळे व्यापक सार्वजनिक अशांतता निर्माण होते.
 
शहरी नक्षलवाद्यांचा जंगलातील नक्षलवाद्यांवर ताबा आहे, हे समजून घेतले पाहिजे. सामाजिक त्रुटींचा फायदा घेत आणि आतून व्यवस्था कमकुवत करण्यासाठी मोठ्या गर्दीचे आयोजन करून हिंसक आणि अहिंसक, अशी दोन्ही प्रकारची निदर्शने भडकवण्याची जबाबदारी ही शहरी नक्षलवाद्यांवरच आहे. तसेच अटक केलेल्या नक्षलवाद्यांना कायदेशीर मदत पुरवणे, हा देखील त्यांच्या कार्यशैलीचाच एक भाग. त्याचबरोबर मानवी हक्कांच्या नावाखाली व्यवस्थेला झुकण्यासाठी देखील शहरी नक्षलवाद्यांकडून भाग पाडले जाते. समाजात ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून लष्करी किंवा बौद्धिकदृष्ट्या नक्षलवादी संघर्षाला पाठिंबा देणार्‍या नवीन सदस्यांना आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्टही अजिबात लपून राहिलेले नाही. ‘ट्रेड युनियन’ आणि शैक्षणिक संस्थांचे सदस्य नक्षलवादी चळवळीत सामील होण्यासाठी सहजपणे तयार होत असल्याने, या संघटनांमध्ये अशा व्यक्तींना पेरून राष्ट्रविरोधी कुटील हेतू साध्य केले जातात. व्यवस्थेला कमकुवत करण्याचा त्यांचा आणखी एक मार्ग म्हणजे राजकीय, कायदेशीर आणि नोकरशाही क्षेत्रात त्यांच्या व्यक्तींना अधिकारपदावर बसवणे. सर्वांत धोकादायक म्हणजे, नक्षलवादी ‘फेक नॅरेटिव्ह’च्या समर्थनार्थ पत्रकार म्हणून स्वतःला समाजासमोर उभे करतात. शिवाय, ते राष्ट्रवादी, दहशतवादविरोधी आणि नक्षलविरोधी शक्तींनाच चुकीचे ठरवतात.
 
मार्क्स, लेनिन, स्टॅलिन, माओ आणि चीनच्या विचारसरणीचे समर्थन करणारे हे मोठ्या प्रमाणात पाश्चात्य-शिक्षित ढोंगी लोक भारताच्या सार्वभौमत्वाला आणि राष्ट्रीयत्वाला सतत कमकुवत करण्यासाठी कार्यरत आहेत, जेणेकरून 140 कोटी लोक विविधतेने नटलेले आणि जवळजवळ 40 कोटी गैर-हिंदू असलेले राष्ट्र सतत संघर्षमय राहून, संतुलन गमावून एका अशांत समाजात विखुरले जाईल. म्हणूनच, ते आपल्या देशाच्या सामाजिक, राजकीय आरोग्याला क्षती पोहोचविण्यासाठी दिवसरात्र कार्यरत आहेत. हे शहरी नक्षलवादी विविध ध्येय साध्य करत आहेत, ज्यात प्रदेश, भाषा, जाती आणि धर्मानुसार लोकांना विभाजित करणे, तसेच हिंदू आणि इतर धार्मिक गटांना विरोध करणे यांचा समावेश आहे.
 
महाराष्ट्र पोलिसांचे माजी महासंचालक (विशेष ऑपरेशन्स) जयंत उमराणीकर यांच्या मते, “शहरी नक्षलवादी चळवळ ही पारंपरिक नक्षलवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक आहे. ही मंडळी अगदी घरी बसून तरुणांना सरकारी यंत्रणेविरुद्ध युद्ध करण्यास प्रवृत्त करतात आणि हे अधिक हानिकारक आहे. त्यामुळे शहरी नक्षलवादामुळे देशाला जीडीपी आणि आर्थिक विकासाच्या बाबतीतही मोठे नुकसान सहन करावे लागते, ज्याचा साहजिकच रोजगार आणि व्यावसायिक संधींवर नकारात्मक परिणाम होतो.”
 
निष्कर्ष
 
संपूर्ण समाजाला खासकरून तरुणांना अंतर्गत आणि अवतीभवतीच्या देशविरोधी वृत्तीबद्दल जागरूक होण्याची ही योग्य वेळ आहे. हे एक हळूवार पसरणारे विष आहे, जे संपूर्ण समाजाला कमकुवत करते आणि राष्ट्रालाही अस्थिर करते. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाला अडथळा आणते, ज्यामुळे देशाच्या सर्वांगीण कामगिरीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे मानवतेचे शत्रू असलेल्या शहरी नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी आपण अधिक जागरूक आणि जागृत होऊया.

पंकज जयस्वाल
7875212161
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121