मुंबई (विशेष प्रतिनिधी) - ब्रम्हपुरी तालुक्यात तीन जणांवर हल्ला करुन त्यांना ठार करणाऱ्या नर वाघाला गुरुवार दि. १७ एप्रिल रोजी जेरबंद करण्यात आले (tiger captured). त्याची रवानगी गोरेवाडा बचाव केंद्रात करण्यात आली (tiger captured) .
गेल्या काही दिवसांपासून ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव आणि चिचखेडा लगतच्या परिसरात टी-३ या नर वाघाचा वावर होता. १३ एप्रिल रोजी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या चिचखेडा येथील विनायक जांभुळे या वृद्धावर वाघाने हल्ला केला. त्यात जांभुळे ठार झाले. त्यानंतर आवळगाव येथे देखील याच वाघाने केलेल्या हल्ल्यात एक गावकरी ठार झाला, तर दोघे जखमी झाले. त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन या वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी दुपारी या वाघास जेरबंद करण्यात आले.
उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा येथे हा वाघ रेस्क्यू टीमला दिसला. त्यावेळी लागलीच पशुवैद्यक डाॅ. रविकांत खोब्रागडे यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन भरले आणि अजय मराठे यांनी निशाणा लावून वाघाला बेशुद्ध केले. त्यानंतर १५ वर्षांच्या या नर वाघाची रवनागी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात करण्यात आली.