अकोल्यातील शाळेत आली दुर्मीळ पांढरी चिमणी; विद्यार्थ्यांनी केली नोंद

    17-Apr-2025
Total Views |
albino sparrow spotted in akola



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात दुर्मीळ अल्बिनो चिमणीचे दर्शन झाले आहे (albino sparrow). राजुरा घाटे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बुधवार दि. ९ एप्रिल रोजी या पांढऱ्या चिमणीची नोंद केली (albino sparrow). महत्त्वाचे म्हणजे गेल्या चार वर्षापासून या शाळेत निसर्गकट्टा संस्थेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य काम होत आहे. (albino sparrow)


राजुरा घाटे येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत निसर्गकट्टा या संस्थेच्या माध्यमातून चिमण्यांविषयी जनजागृती आणि संवर्धनाचे काम केले जाते. शाळेत दरवर्षी ऑनलाईन चिमणी गणना आणि चिमणी घरटे कार्यशाळा घेतली जाते. यामुळे मुलांना पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण झाली असून शिक्षक मनोज लेखनार हे स्वतः मुलांसोबत राजुरा घाटे परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करतात. याच निरीक्षणातून त्यांना शाळेच्या परिसरात ९ एप्रिल रोजी पांढरी चिमणी दिसली. याची माहिती त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना दिली. सावंत यांनी या चिमणीची ओळख पटवून ती अल्बिनो असल्याचे सांगितले.

मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन हा रंगद्रव्याचा प्रकार असतो. या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणसाच्या त्वचेच्या रंगामध्ये काळे, गोरे, सावळे वा पांढरी त्वचा असणारे लोकं असतात. याच प्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या बाबतीत मेलॅनिन रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो. त्यामुळे कातडी किंवा पंख पुर्णतः पांढरे होतात. त्याला इंग्रजीमध्ये अल्बिनिझम म्हणतात. पूर्ण अल्बनिझम क्वचितच आढळतो. संपूर्ण अल्बिनीझम प्रकरणात पिसे, चोच आणि पाय पांढरे असतात आणि डोळे गुलाबी किंवा लाल रंगाचे असतात. आतापर्यंत भारतामध्ये हाऊस क्रो, कॉमन किंगफिशर, रेड वेंटेड बुलबुल, मुकुट असलेला स्पॅरो लार्क, ब्लू रॉक पिजन, जंगल बॅचलर्स, ठिपकेवाला पिंगळा या पक्ष्यांच्या जातींमध्ये अल्बनिझम आढळून आला आहे. शालेय परिसरात पांढरी चिमणी दिसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या पांढऱ्या चिमणीचे दर्शन हे विद्यार्थ्यांनी केलेले पक्षीनिरीक्षण आणि चिमणी संवर्धानाचे यश आहे. शाळेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना येवले, स्वप्नील दुतोंडे, सुनील गाडेकर, प्रसाद कुलकर्णी या शिक्षकांचे तसेच गावचे सरपंच बंडू घाटे आणि संदीप बरडे यांचे सहकार्य लाभते.