राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी आपला निवाडा दिला आहे, हे वास्तव उद्धव ठाकरे यांना स्वीकारावेच लागेल. आता बाळासाहेबांच्या आवाजाची मदत घेऊनही त्यांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. कारण, त्यांनी आपल्या हातानेच हा वारसा धुडकावून लावला आहे.
हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय, ते नाशिकमध्ये बुधवारी उबाठा सेनेच्या मेळाव्यात दिसून आले. या मेळाव्यात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात एक भाषण ऐकविण्यात आले. त्या भाषणातील आवाज जवळपास बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखाच होता. पण, भाषणातील शब्द अन् विचार मात्र उबाठा सेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचे होते. या भाषणातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर यथेच्छ दुगाण्या झाडल्या. बाळासाहेबांच्या आवाजामुळे प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचेच हे विचार असतील, अशी लोकांची समजूत होईल, या भ्रमात ते आहेत. आता लोकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी त्यांना आपल्या स्वर्गवासी पित्याच्या आवाजाची उसनवारी करावी लागत आहे. यामुळे जनतेत उद्धव ठाकरे यांची विश्वासार्हता अजिबातच उरलेली नाही, हे सिद्ध होते. बाळासाहेबांच्या आवाजामुळे आपले विचार लोकांना पटतील, असा त्यांचा हेतू होता; पण त्याचा दुसराच परिणाम झाला. तो म्हणजे, उद्धव ठाकरे यांची विश्वासार्हता शून्य असून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना बाळासाहेबांच्या आवाजावर अवलंबून राहावे लागते, हे स्पष्ट झाले. यालाच ‘हात दाखवून अवलक्षण करणे’ म्हणतात.
उद्धव ठाकरे यांची विश्वासार्हता मराठी जनतेत पार रसातळाला गेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून त्यांना जितका मान द्यायचा होता, तितका तो जनतेने दिलाही. एवढेच नाही तर त्यांच्या चुकाही जनतेने सांभाळून घेतल्या. पण, मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी आपल्या आत्म्याचा जो बळी दिला, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता नष्ट झाली. इतकेच नव्हे, तर आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी जे भयानक अपराध केले आणि जो क्रूर हुकुमशाही राजवटीचा वरवंटा मराठी जनतेवर फिरविला, त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेली उरलीसुरली सहानुभूतीही ते गमावून बसले आहेत. ज्या शिवछत्रपतींच्या नावाने बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, त्या छत्रपतींच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यालाच उद्धव ठाकरे यांनी नख लावले आणि ही गोष्ट मराठी जनता कधीच विसरू शकणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मराठी जनतेत आजही असलेला आदरभाव हा त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे आहे, हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही.
उद्धव ठाकरे यांचे कोते आणि बिनबुडाचे विचार या नकली आवाजातही शोभून दिसत नव्हते. हे भाषण म्हणजे आलिशान रोल्स रॉईस मोटारीतून आलेल्या व्यक्तीने रस्त्याकडेच्या ठेल्यावरील वडापाव खाण्यासारखे. त्या भाषणात नवे काहीच नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या मनातील भडासच त्यातून व्यक्त झाली. ‘भाजप हा पक्ष शिवसेनेमुळेच मोठा झाला,’ हा नेहमीचाच भंपक दावा यात आळविला गेला. वास्तविक, 1984 साली केवळ दोन लोकसभा जागांवर विजय मिळविल्यानंतरही भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही (जो उद्धव ठाकरे यांनी औटघटकेच्या मुख्यमंत्रिपदासाठी सोडला). उलट रामजन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून तो अधिकच भक्कम केला. या आंदोलनाला देशभरात मिळणार्या प्रतिसादामुळे शिवसेनेनेही हिंदुत्वाची भूमिका उघडपणे स्वीकारली. त्यानंतरच या दोन पक्षांमध्ये युती झाली. महाराष्ट्रात भाजपला एक मित्रपक्ष लाभला, हे खरे. पण, भाजपचा विकास आणि वाढ ही भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे झाली, शिवसेनेच्या नव्हे. तसे असते, तर शिवसेना हा पक्ष भाजपइतका का वाढला नाही, याचे उत्तर उबाठाकडे नसेल. या नकली भाषणातही बाळासाहेबांच्या आवाजात भाजपचे 25 वर्षे शिवसेनेशी हिंदुत्वाचे नाते होते, असे म्हटले आहे. हे हिंदुत्वच संपवायला निघाल्यामुळे भाजपच काय, शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते यांनीही शिवसेनेला रामराम ठोकला, याच उबाठा गटाला सोयीस्कर विसर पडलेला दिसतो.
शिवसेना पक्षाचा आत्मा हा हिंदुत्वच होता आणि आहे. पण, उबाठा हे त्यालाच तिलांजली द्यायला निघाल्यावर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता पसरली. राजकीय पक्षाचा वारसा ही त्या पक्षाची विचारसरणी. उबाठाने हिंदुत्वालाच सोडचिठ्ठी दिल्यावर मतदारांकडे कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे, या विचारांमधूनच या नेत्यांना शिवसेनेच्या खर्या वारशाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी बंड केले. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत या कथित बंडखोर, पण वास्तवात सच्चे शिवसैनिक असलेल्या नेत्यांच्याच पदरात मतदारांनी भरभरून मते टाकली आणि आपण कोणत्या पक्षाला खरी शिवसेना मानतो, ते दाखवून दिले. हाच मतदारांचा न्याय होता. आता त्याला आणखी कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मात्र, हा निकाल आपण मानणार नाही, असे म्हणणे ही निव्वळ आत्मवंचनाच. संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप आणि शिवसेनेला दिलेल्या प्रचंड मतांमुळेही उद्धव ठाकरे यांचा तिळपापड झाला असून, हा निकाल जबरदस्तीने लावला आहे, यासारखी बाष्कळ आणि पोरकट विधाने त्यांनी केली. याला त्रागा म्हणतात आणि उबाठाकडे आता केवळ त्रागा करणे इतकेच आता उरले आहे.
आपण कोणाच्या पाठीत वार करणार नाही, असे एक वाक्य या भाषणात आहे. पण, 2019 साली नेमके हेच तर उद्धव ठाकरेंनी करुन दाखवले. भाजपबरोबर निवडणूकपूर्व जागावाटप करून, मोदींच्या नावाने मते घेऊन निकाल लागल्यावर त्याच भाजपशी असलेली युती तोडणे याला पाठीत खंजीर खुपसणेच म्हणतात. अर्थात, शरद पवार यांच्याशी नाते जोडायचे असल्याने पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयोग आवश्यकच होता. गेल्या निवडणुकीत आपण शिवसेनाप्रमुखांचे खरे राजकीय वारस नाही, हेच जनतेने दाखवून दिल्यामुळे उद्धव ठाकरेंना आता ‘एआय’ तंत्राचा वापर करण्याची केविलवाणी धडपड करावी लागत आहे.
‘एआय’ तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे एखादी व्यक्ती आणि तिचा आवाज यांची हुबेहुब नक्कल करता येत असल्यामुळे खरे काय आणि खोटे काय, यातील रेषाच संपुष्टात आली. ही गोष्ट धोकादायकच. कारण, या तंत्रज्ञानाची मदत घेऊन लोकांची दिशाभूल करणे फारच सोपे बनले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी त्या तंत्राचा वापर यशस्वीपणे केल्यामुळेच भाजपच्या जागा घटल्या होत्या. नाशिकमधील मेळाव्यात याचाच वापर करायचा प्रयत्न झाला. पण, तो डाव उलटा उबाठा सेनेच्या अंगाशी आला आहे, हे नक्की!