॥श्री देवी उपनिषद॥

    17-Apr-2025
Total Views |
 
Sri Devi Upanishad
 
 
महादेवी जगदंबा ही जशी विश्वमोहिनी आहे, तसेच सारे चराचर हे तिचेच रुप आहे. विश्वातील सगळ्याचीच व्युत्पत्ती तिच्यापासूनच झाली आहे. विश्वातील समस्त ईश्वरी तत्वेही तिचेच अवतार आहेत. अशा जगदंबेच्या स्वरुपाचा या देवी अथर्वशीर्षातून घेतलेला आढावा...
 
कामो योनिः कमला वज्रपाणिर्गुहा हसा मातरिश्वाभ्रमिन्द्रः।
पुनगुहा सकला मायया च पुरूच्यैषा विश्वमातादिविद्योम्॥14॥

श्री ललिता देवीचा पंचदशाक्षरी मंत्र या श्लोकात उल्लेखला आहे. हा श्लोक देवीच्या सूक्ष्म स्वरूपाचे, पंचदश वर्णांच्या रूपाने विवेचन करतो.
 
काम (क), योनि (ए), कमला (ई), वज्रपाणी - इन्द्र (ल), गुहा (ह्रीं), ह, स हे दोन वर्ण, मातरीश्वा - वायु (क), अभ्र (ह), इन्द्र (ल) पुनः गुहा (ह्रीं), स, क, ल हे तीन वर्ण आणि माया (ह्रीं). हा मंत्र हा वाग्भव कुट, मध्य कुट आणि शक्ती कुट यांपासून तयार झाला आहे.
 
वाग्भव कुट बीजाक्षरे : क ए ई ल ह्रीं
मध्य कुट बीजाक्षरे : ह स क ह ल ह्रीं
शक्ती कुट बीजाक्षरे : स क ल ह्रीं
यांपैकी क हे बीजाक्षर तीन वेळा आले आहे आणि ह हे बीजाक्षर, दोन वेळेला आले आहे. ही दोन बीजाक्षरे शिवतत्त्व निदर्शक आहेत. ह्रीं हे बीजाक्षर तीन वेळेला आले आहे. ते शिवशक्ती ऐक्यरूप निदर्शक आहे आणि बाकीची सात बीजाक्षरे हे शक्तीतत्त्व निदर्शक आहेत.
 
संपूर्ण पंचदशाक्षरी मंत्र हा, शिवशक्तैक्य स्वरूपाचे शब्दबद्ध रूप आहे. त्यामुळे या मंत्राचे पठण साधकाच्या सर्व इच्छांची पूर्तता करू शकते.
 
हा मंत्र सर्व मंत्रांचा मुकुटमणी समजला जातो आणि मंत्रशास्त्रांत पंचदशी ’कादी’ विद्येच्या नावाने प्रसिद्ध आहे. याचे भावार्थ, वाच्यार्थ, संप्रदायार्थ, कौलिकार्थ, रहस्यार्थ आणि तत्त्वार्थ असे सहा प्रकारे अर्थ ‘नित्या-षोडशिकार्णव’ नावाच्या ग्रंथात आले आहेत. तसेच ‘वरिवस्यारहस्य’ ग्रंथामध्ये, अनेक अर्थ दर्शविले गेले आहेत. हे गुह्यतम असे ज्ञान असून, केवळ पात्र साधकांनाच प्रदान केले जाते. ही (पंचदशाक्षरी) सर्वात्मिका जगन्मातेची मूळ विद्या तसेच ब्रह्मस्वरूपिणी आहे .
 
एषात्मशक्तिः। एषा विश्वमोहिनी पाशाङ्कुशधनुर्बाणधरा।
एषा श्रीमहाविद्या। य एवं वेद स शोकं तरति॥15॥
नमस्ते अस्तु भगवति मातरस्मान्पातु सर्वतः॥16॥
 
श्री देवी ही परमशक्ती आहे. ती विश्वमोहिनी आहे. देवीच्या चतुर्हस्तांमधील पाश आणि अंकुश, हे अनुक्रमे भौतिक सुखाची लालसा नियंत्रणात ठेवण्याचे आणि षड्र्िपुंवर नियंत्रण स्थापन करण्याचे कार्य करतात. यामुळे साधक उपासना करताना विचलित होत नाही. तिच्या हातातील कोदंड हा मनातील संकल्पविकल्पात्मक श्लेष संपवतो आणि त्यामुळे साधक, मन केंद्रित करून उपासना करू शकतो. पंच तन्मात्रांवर नियंत्रण ठेवणारे पुष्पबाण, साधकाला भौतिक पातळीवर परिपूर्ण आणि सुदृढ ठेवतात. तिने पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण धारण केलेले आहेत, अशी ही श्रीमहाविद्या आहे. अशा प्रकारे देवीचे ज्ञान असलेला दुःखापासून मुक्त होतो. भगवती माते! तुला नमस्कार असो. सर्व प्रकारे आमचे रक्षण कर.
 
सैषाष्टौ वसवः। सैषैकादश रुद्राः। सैषा द्वादशादित्याः। सैषा विश्वेदेवाः सोमपा असोमपाश्च। सैषा यातुधाना असुरा रक्षांसि पिशाच्चा यक्षाः सिद्धाः। सैषा सत्त्वरजस्तमांसि। सैषा ब्रह्मविष्णुरुद्ररूपिणि। सैषा प्रजापतीन्द्रमनवः। सैषा ग्रहा नक्षत्रज्योतींषि। कलाकाष्ठादिकालरूपिणी। तामहं प्रणौमि नित्यम्। पापापहारिणीं देवीं भुक्तिमुक्तिप्रदायिनीम्। अनन्तां विजयां शुद्धां शरण्यां शिवदां शिवाम्॥17॥
 
समस्त ईश्वरी तत्त्वेसुद्धा देवीचेच अवतार आहेत, असा या श्लोकाचा अर्थ आहे. देवीच अष्टवसू, एकादश रूद्र, द्वादश आदित्य आहे, विश्वदेव इथपर्यंतच्या गुणांचे वर्णन खाली विस्ताराने केले आहे.
 
बृहदारण्यकात अष्टवसूंचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते अष्टवसू म्हणजे पृथ्वी, वरुण, अग्नी, वायू, सूर्य, आकाश, चंद्रमा, नक्षत्र. या विवेचनात अष्टवसू म्हणजे, संपूर्ण विश्वातील जीवसृष्टीवर परिणाम घडवणारे असा अर्थ आहे. मानवी देह ज्या पंच महाभूतांचा तयार झाला आहे, ते पंच घटक पृथ्वीवरील जीवन ज्यामुळे अस्तित्वात आहे, असे सूर्य आणि चंद्र यांत अंतर्भूत आहेत. नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर, तसाच जीवसृष्टीवरसुद्धा परोक्ष रूपाने होत असतो. म्हणून त्यांचा उल्लेखसुद्धा अष्टवसू असा केला आहे.
 
या अष्टवसूंची मूळ नावे बृहदारण्यकानुसार जी होती, ती वरती दिली आहेत. कालौघात अन्य नावे जोडली गेली, त्यांचासुद्धा उल्लेख करतो म्हणजे संभ्रम निर्माण होणार नाही. पृथ्वी-भूमी-धरा, वरुण-समुद्र देव-आप, अग्नी-अनल, वायू-अनिल, आदित्य-अंशुमन-प्रत्यूष, आकाश-प्रभास, चंद्रमा-वर्चस-सोम, नक्षत्राणी-ध्रुव. 27 नक्षत्रांचा उल्लेख करण्याऐवजी, स्थिर अशा ध्रुव तार्‍याचा उल्लेख केला आहे.
 
एकादश रुद्र हे ईश्वरी शक्ती म्हणून पूज्य आहेत. मृत्यूसमयी जो सर्वांना रुदन करण्यास अर्थात रडण्यास भाग पाडतो, त्याला रुद्र म्हणतात. देहाला घडवणारे हे एकादश तत्त्वे, मृत्यूसमयी देहापासून विलग होत जातात. देह निश्चल होत जातो आणि आत्मा देहबंधातून मुक्त होऊ लागतो. या क्लेशातून जाताना जीव रुदन करतो.
 
आध्यात्मिक रुद्राचा उल्लेख बृहदारण्यक उपनिषदात आला आहे, अंतराळातील वायू हा रुद्र असून, तो मानवी देहात दहा स्थानी दशप्राण रूपाने स्थित आहे आणि याच वायूचे आत्मा हे एकादश रूप आहे.
 
अधिभौतिक एकादश रुद्र- पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्रमा, यजमान, पवन, पावक आणि शूचि.
 
आधिदैविक पातळीवर एकादश रुद्र-हर रुद्र, त्र्यंबक, बहुरूप, अपराजिल रुद्र, वृषाकपि, शम्भू, कपर्दी, रेवत, मृगव्याध, शर्व, कपाली.
 
रुद्रांची नामे वेगवेगळ्या पुराणात आणि उपनिषदात भिन्नभिन्न आहेत, परंतु कार्य या पातळीवर विचार केल्यास ते एकादश रुपांत आहेत. सूर्यावर आधारित पंचांगात 12 राशी आहेत, या 12 राशींचा एक एक महिना आहे आणि असे 12 महिने मिळून, एक संवत्सर होते. या प्रत्येक महिन्याचा एक एक आदित्य आहे. हे द्वादश आदित्य म्हणजे 12 ईश्वर होतात. या द्वादश आदित्यांची नामे-धातु, अर्यमा, मित्र, वरुण, इंद्र, विवस्वान, त्वष्टा, विष्णू, अंशुमन, भग, पुष्य आणि पर्जन्य.
 
द्वादश आदित्य म्हणजे सूर्याच्या 12 कला.ज्यामुळे पृथ्वीवरील जीवचक्र अव्याहतपणे सुरू राहते. या भिन्न भिन्न कलांमुळे ऋतूबदल घडतो. भिन्न भिन्न नाम आणि रूपांनी या विश्वात जी चैतन्य सत्ता प्रकाशित होत आहे, त्यालाच ‘विश्वदेव’ असे संबोधले जाते. चेतना नाम आणि रूपांच्या भिन्न भिन्न स्वरुपात, अंशमय स्वरुपात प्रकट होते. परंतु, तिचा प्रत्येक अंश हा अभिन्न आणि समानच आहे.
 
त्यामुळे मूर्ती जरी निर्जीव असली, तरी तिला व्यापून असणारी चेतना ही विश्वदेव आहे आणि मूर्तीची उपासना करणारा भक्त हासुद्धा त्याच विश्वदेवाचे रूप आहे. मानवाच्या देहातील जीवात्मा हा विश्वदेव आहे. दृश्यरूप जगत हे ‘मी’चेच प्रकाशमान सत्य स्वरूप आहे आणि याला विश्वदेव असे संबोधले आहे. इथे दृश्य जगत आणि जीवात्मा ’मी यांच्यातील चेतना रुपी अद्वैत सिद्ध होते.
‘इन्द्राग्नी’ इंद्र हा ऐश्वर्यशाली अर्थात सुखस्वरूप आहे, तर अग्नी हा दाहक अर्थात दुःखस्वरूप आहे. इन्द्राग्नी हा शब्द सुख आणि दुःखस्वरूप आहे. त्याचप्रमाणे प्राण आणि अपान वायू म्हणजे अश्विनीकुमार.
 
मित्रावरुणौ, इन्द्राग्नी, अश्विनीकुमार हे तिन्ही उभयात्मक देव आहेत. यांचे परस्पर विरोधी आणि संलग्न अस्तित्व हेच द्वंद्व आहे, ज्याची अनुभूती जीवात्मा घेतो. स्थूल जगतात जीव सुख-दुःख आदि विकारांची देहात्मक अनुभूती प्राण आणि अपान या वायूंच्या मार्फत घेतो, भोगतो. परंतु, या विकारांच्या रूपाने आणि विकारांचा भोग घेणार्‍या वायूंच्या रूपाने, दोन्ही पातळीवर त्या ‘मी’त चैतन्यशक्तीचेच प्रकटीकरण होते आहे.
 
देवीच असुर, राक्षस, पिशाच्च, यक्ष व सिद्ध आहे. हीच सत्त्व-रज-तम, ब्रह्म-विष्णू-रुद्र, ग्रह-नक्षत्र-तारे, कला-काष्ठादि-कालरूपिणी इ., पापांचा नाश करणारी, भोग व मोक्ष देणारी, अन्त नसलेली, विजयाची अधिष्ठात्री, निर्दोष, शरण जाण्यास योग्य, कल्याण आणि मंगल करणारी आहे. अशा देवीला आम्ही नित्य, सदा नमस्कार करतो.(क्रमशः)
 
- सुजीत भोगले   
(तळटीप- एकादश रुद्र, अष्टवसू, द्वादश आदित्य, मित्रवरुण आणि अश्विनी कुमार अशा 33 तत्त्वांनाच आपल्याकडे 33 कोटी देव असे संबोधले जाते. कोटी म्हणजे प्रकार. यांचे सविस्तर निरूपण माझ्या ‘श्री ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरूपण’ या चार खंडांतील ग्रंथात केले आहे. ही ग्रंथमाला हवी असल्यास आपण मला संपर्क करू शकता.)