९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळावा : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
17-Apr-2025
Total Views |
पुणे : दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले याचे कौतुक असून ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यास मिळावा, अशी ईच्छा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी व्यक्त केली.
सरहद, पुणे आयोजित ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‘मु. पो. तालकटोरा’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या मसाप कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी सरहदचे अध्यक्ष संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्ली येथे शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. यानिमित्त प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, "माझा साहित्याचा अभ्यास नाही परंतू, आवड नक्कीच आहे. साताऱ्यात साहित्यिक आणि कलाकार यावेत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. साहित्य क्षेत्रात साताऱ्यातील मसाप शाखेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जात आहेत. सतत कार्यशील असणाऱ्या सातारकरांचा परिषदेवर ठसा उमटला आहे. एखाद्या मंत्र्याचे आंदोलक म्हणून स्वागत आणि सत्कार इतिहासात पहिल्यांदाच झाला असेल. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मराठी भाषिकांना खुला प्रवेश मिळवा तसेच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असे त्यांनी सांगितले.
दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट होणार
"मराठी भाषेची ओळख कधीच पुसली जाणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणे हा एकच ध्यास घेवून महाराष्ट्र साहित्य परिषदेसह सर्वांनी प्रयत्न केले. दिल्लीतील आंदोलन तसेच सतत पाठपुरावा करून या इच्छेला मूर्त स्वरूप मिळाले आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले याचे कौतुक असून महाराष्ट्र आता मागे वळून पाहणार नाही. दिल्ली आता दूर नाही. दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट झालेली पहायला मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.