येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी! पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदीही अनिवार्य
17-Apr-2025
Total Views | 17
मुंबई : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुसरून राज्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची अंमलजवणी केली जाणार आहे. तसेच इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शांळांमध्ये मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची राज्यात टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२३ आधारित तयार केलेल्या पुस्तकांचा देशातील २३ राज्यांकडून वापर करण्यात येत आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत आणि अनुभवी तज्ज्ञांकडून या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समिती आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी, महाराष्ट्रातही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली पुस्तके इयत्तानिहाय, आवश्यक त्या बदलासह टप्प्याटप्प्याने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम बदलणार?
सन २०२५-२६ - इयत्ता १ ली
सन २०२६-२७ - इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वी
सन २०२७-२८ - इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी आणि ११ वी
सन २०२८-२९ - इयत्ता ८ वी, १० वी आणि १२ वी
इंग्रजीसह हिंदी भाषा अनिवार्य!
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार यापुढे इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शांळांमध्ये मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासला जातील.