‘दी लिनियन सोसायटी ऑफ लंडन’ या निसर्ग विज्ञान विषयातील जगातील सर्वांत जुन्या संस्थेकडून ‘फेलो’ म्हणून निवड झालेले वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मयुर धोंडिराम नंदीकर यांच्याविषयी...
ग्रामीण भागातील शिक्षण हे माणसाला यशोशिखरावर घेऊन जाऊ शकते, याचे उत्तम उदाहरण असणारा हा माणूस. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणार्या या माणसाने वनस्पतींच्या 46 नव्या प्रजातींचा शोध लावला. एवढ्यावरच न थांबता, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधनही पूर्ण केली आहेत. ज्या काळात वर्गीकरण म्हणजेच ‘टॅक्सोनॉमी’सारख्या क्लिष्ट विषयाचा अभ्यास करण्यास लोक धजावत नव्हते, त्या काळात या माणसाने हा विषय अंगीभूत केला. वनस्पतीशास्त्रज्ञात आकंठ बुडालेला हा माणूस म्हणजे डॉ. मयुर नंदीकर.
मयुर नंदीकर यांचा जन्म दि. 2 डिसेंबर, 1983 रोजी मुंबईत झाला. वडील धोंडिराम नंदीकर यांनी त्यांचे पालनपोषण कोल्हापुरातील आपल्या मूळ गावी करण्याचे ठरवले. त्यानुसार राधानगरी तालुक्यातील सोळांकूर या मूळ गावी असणार्या आजीकडे त्यांना पाठवण्यात आले. राधानगरी अभयारण्याच्या कुशीत वसलेले सोळांकूर हे गाव तसे निसर्गाने नटलेले. डॉ. नंदीकर आजीच्या सावलीतच लहानाचे मोठे झाले. गावातच त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे कागलमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण झाले आणि दुधसागर महाविद्यालयामधून वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
विज्ञानाकडे ओढा असणारे नंदीकर महाविद्यालयीन वयात ‘वनस्पतीशास्त्र’ की ‘प्राणीशास्त्र’ या दोन विषयात करिअर करण्यासंदर्भात संभ्रमित होते. मात्र, वनस्पतीशास्त्राचे शिक्षण देणारे उत्तम शिक्षक त्यांना लाभले. त्यांच्याकडून जंगलात जाऊन वनस्पतींसंदर्भात उत्तम मार्गदर्शन मिळाले. वनस्पती संकलनाच्या मोहिमांमध्ये त्यांना सहभाग घेता आला. त्यामुळे वनस्पतींविषयी आवड निर्माण होऊन वनस्पतीशास्त्रातच करिअर करायचे ठरवले.
आईवडील मुंबईतच स्थायिक असल्याने उन्हाळी सुट्टीसाठी नंदीकर मुंबई गाठत. अशाच एका उन्हाळी सुट्टीत त्यांनी छायाचित्रणाचा कोर्स केला. त्यानंतर कोल्हापुरात परतल्यावर तिथे छोटेखानी स्टुडिओ सुरू केला. छायाचित्रणाच्या माध्यमातून वनस्पतींचे बारकावेही त्यांनी टिपले. पुढे वनस्पतीशास्त्रातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी मुंबईतील साठ्ये महाविद्यालयामध्ये घेतले. मुंबईत त्यांना अनुभवसंपन्न काम करण्यास मिळाले. ‘डब्लूडब्लूएफ’ या संस्थेसाठी माहीममधील महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि ‘बीएनएचएस’साठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे त्यांनी निसर्ग सहली घेतल्या. नवी मुंबई आणि ठाण्याच्या वृक्षगणनेच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले.
शिक्षणानंतर नंदीकर पुन्हा कोल्हापुरात परतले आणि स्वतः शिक्षण घेतलेल्या दुधसागर महाविद्यालयात शिकवण्यास सुरुवात केली. वर्षभरानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात ‘एमफील’चे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘केना’ कुळातील वनस्पतींवर अभ्यास केला.
पुढे ‘पीएच.डी’च्या संशोधनावेळी संपूर्ण भारतात आढळणार्या ‘केना’ कुळातील वनस्पतींवर अभ्यास केला. ‘पीएच.डी’च्या संशोधनादरम्यान त्यांनी पुण्यातील ‘आघारकर संशोधन संस्थे’साठी कोल्हापूर, सातारा, सांगली येथून औषधी वनस्पतींचे संकलन आणि त्याचे डिजिटायजेशन केले. 2013 साली त्यांनी आपली ‘पीएच.डी’ पूर्ण केली आणि 2014 साली गोवा विद्यापीठ गाठले.
गोवा विद्यापीठात संशोधन करण्यासाठी नंदीकर यांना ‘फेलोशिप’ मिळाली. त्यावेळी त्यांनी धामण या वनस्पतीवर सविस्तर संशोधनाचे काम केले. 2015 साली त्यांनी शिरवळ येथील ‘नौरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्च’ या संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
याठिकाणी त्यांनी ब्रिटिशकालीन वनस्पतीशास्त्रज्ञांनी केलेल्या कामांचे अवलोकन करून त्यावर अद्ययावत संशोधन केले. एम. आर. अल्मेडा या ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञाच्या लुप्तप्राय वनस्पतीच्या संग्रहाचे जतन करून डिजिटायझेशन केले. सातारा जिल्ह्यातील पळशी आणि मिरजे गावांमध्ये संस्थेच्या माध्यमातून वनीकरणाचे काम केले, ज्यामध्ये 60 प्रजातींची साधारण दीड लाख झाडे लावून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन केले.
‘ग्रेविया’ या कुळातील वनस्पतींच्या वर्गीकरणाचे महत्त्वपूर्ण काम केले. पश्चिम घाटातील स्थानिक फुलझाडांची ओळख पटवण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन आणि फोटोग्राफिक फील्ड गाईडही तयार केले. संस्थेच्या हर्बेरियमचे डिजिटायझेशन केले. पश्चिम भारतातील ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ एन.ए. डालझेल यांनी वर्णन केलेल्या स्थानिक वनस्पती प्रजातींचे वर्गीकरण केले. उत्तर पश्चिम घाटातील तिनाईघाट (कर्नाटक) ते कुलेम (गोवा)पर्यंत रेल्वे रुळाच्या प्रस्तावित दुहेरीकरणामुळे होणार्या प्रभावाचे पर्यावरणीय मूल्यांकन केले. 2015 ते 2022 या काळात त्यांनी ‘नौरोजी गोदरेज सेंटर फॅर प्लांट रिसर्च’ या संस्थेमध्ये काम केले.
त्यानंतर जुलै 2022 ते मे 2023 पर्यंत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले.
सध्या ते गुजरातच्या ‘फार्मान्झा हर्बल प्रा. लिमिटेड’ या कंपनीत वनस्पतीशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र केंद्राचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. 65 हून अधिक संशोधनात्मक निबंध त्यांनी लिहिले आहेत. ‘इंटरनॅशल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संस्थेच्या ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप’चे ते सदस्य असून त्याद्वारे ते वनस्पतींवर संशोधनाचे काम करत आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!