महाराष्ट्रात मराठी अनिवार्यच, पण हिंदी आणि इंग्रजी...; नवीन अभ्यासक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
17-Apr-2025
Total Views | 25
मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहेच. परंतू, हिंदी आणि इंग्रजीसह इतर भाषादेखील शिकू शकतात, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ले येथे 'मुंबई मेट्रो मार्ग ७अ' वरील डाऊनलाईन टनल ब्रेकथ्रू कार्यक्रमादरम्यान पाहणी केली आणि संबंधित अधिकार्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग आळवणी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महणाले की, "नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात सर्वांना मराठी यायला हवी. यासोबतच आपल्या देशातील इतर भाषादेखील यायला हव्या. आपल्या देशात एक संपर्क भाषा असावी, हा केंद्राचा प्रयत्न असून त्यादृष्टीने हा प्रयत्न केला आहे. देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरिता हिंदी ही एक संपर्कसूत्राची भाषा आहे. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलेच पाहिजे हा आपला आग्रह आहे. यासोबतच ते इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषादेखील शिकू शकतात," असे ते म्हणाले.
पुढच्या वर्षीपर्यंत मेट्रोचा १५० किमीचा मार्ग पूर्ण
ते पुढे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून विमानतळ स्टेशनपर्यंतचा हा नवीन महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबईमध्ये मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. पुढच्या वर्षीपर्यंत १५० किलोमीटरचा मार्ग पूर्ण व्हावा, या गतीने आमचे काम सुरु आहे. मुंबईकरांसाठी ही मेट्रो एक नवीन लाईफलाईन म्हणून काम करेल," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.