उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांचा सर्वात मोठा अपमान! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17-Apr-2025
Total Views |
मुंबई : एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळासाहेबांचे शब्द समाजासमोर दाखवून उद्धव ठाकरेंनी त्यांचा सर्वात मोठा अपमान केला आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी केली.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळासाहेबांचे शब्द समाजासमोर दाखवून त्यांचा अपमान करण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केले आहे. बाळासाहेबांसारख्या महान व्यक्तींचा साऊंड एआयच्या माध्यमातून वापरणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब हयात नसताना त्यांचे शब्दप्रयोग राजकीय फायद्याकरिता वापरले. यापेक्षा बाळासाहेबांचा मोठा अपमान होऊ शकत नाही."
"उद्धव ठाकरेंना राजकारणाची वाटच समजत नाहीये. त्यांना महाराष्ट्राची आणि संघटनेची नाडी समजली नाही. संघटना चालवण्यासाठी त्यांच्याकडे माणसं नाहीत. आमची संघटना बुथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत मेरिटवर चालते. आज भाजपची दीड कोटी सदस्यसंख्या झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शब्द एआयच्या माध्यमातून दाखवायला लागले. इतकी त्यांची परिस्थिती वाईट का झाली, याचा विचार उद्धव ठाकरेंनी एकट्यात बसून करावा. त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. त्यांनी हिंदूत्वाशी कशी तडजोड केली, याबाबत ५० गोष्टी मी सांगू शकतो. उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधींच्या इतके आहारी गेलेत की, त्यांची वक्फ सुधारणा विधेयकच्या विरोधात मतदान करण्याची हिंमत त्यांची झाली. बाळासाहेबांना मान्य नसणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर न बोललेले बरे," असे ते म्हणाले.
स्थानिक पातळीवर भाषाभाषांमध्ये वाद अयोग्य
महाराष्ट्रात सर्वांना आपापली भाषा वापरण्याचा अधिकार आहे. पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची असून ती पुढे नेली पाहिजे. मराठी अग्रगण्य भाषा झाली पाहिजे, संपूर्ण देशात माय मराठीचा आवाज घुमायला हवा. परंतू, याचा अर्थ स्थानिक पातळीवर भाषाभाषांमध्ये वाद करणे योग्य नाही. हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे. आपल्या राज्यासाठी दोन्ही भाषा महत्वाच्या असून प्रत्येक शाळेत दोन्ही भाषांचा उपयोग झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.