पुण्यातील एका रुग्णालयामध्ये घडलेला प्रकार पाहता, मी म्हणून काय विचार करायला पाहिजे, म्हणून लिहिण्याचा हा अट्टाहास आणि माझ्यासारख्या अनेक मींसाठी ही धोक्याची घंटा! मी म्हणजे रुग्णालय आणि डॉक्टर, मी म्हणजे समाज, मी म्हणजे रुग्णाचे नातेवाईक आणि मी म्हणजे स्वतः रुग्ण... अशा प्रत्येकासाठी ही धोक्याची घंटाच!
रुग्णालय म्हणून रुग्ण येणार, बरे होणार आणि परत घरी जाणार. फक्त एवढेच? नक्की का? पण, रुग्णालय म्हणून, डॉक्टर म्हणून मी विचार करतोय का?
आलेला रुग्ण, त्याचे नातेवाईक यांचा विचार मी करायला पाहिजे. रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे जायला कोणालाच आवडत नाही. कोणाला मुळी तिथे जायचेच नसते. पण, शरीर हे यंत्र बंद पडले की, नाइलाजाने का होईना डॉक्टरांकडे जावे लागते. मग डॉक्टर म्हणून मी रुग्णांना आजारातून बरे करण्याबरोबरच, त्यांना समजावून घेऊन उपचार करणे योग्य नाही का? खूप रुग्णांना बघण्यापेक्षा आणि घाई घाई करून निर्णय घेण्यापेक्षा, आनंदाने काम करणे हे देखील मला यायला पाहिजे.
रुग्णालय आणि डॉक्टर म्हणून...
मला वाटते, डॉक्टर होण्यामागे पैसे कमावणे हा एकमेव उद्देश नसतोच मुळी. आर्थिक स्वास्थ्य तसेही डॉक्टर झाल्यावर मिळालेले असतेच. पण, सेवा देणारा आणि त्यामध्ये आनंद शोधणारा तो खरा डॉक्टर! डॉक्टर म्हणजे दुसरा देवच की! देवाला शरीररूपी पाहता येत नाही, पण डॉक्टरला पाहता येते. मृत्यूच्या दारातून जो परत घेऊन येतो, तो डॉक्टर! आता नक्की डॉक्टर म्हणून मी असा आहे का? हे चिंतन माझे मलाच करावे लागेल.
रुग्णालय चालवणे हे अजिबात सोपे नाही. आर्थिक गणिते मार्गी लागलीच पाहिजेत. पण, एकदा काय ते स्पष्ट करून टाकायला पाहिजे की, आम्ही वेगळे आहोत की फक्त वेगळेपणाचा आव आणत आहोत.
धर्मदाय संस्था मग आम्ही शासनाच्या सर्व गोष्टींचा संस्था म्हणून लाभ घेणार, ‘आम्ही इतर रुग्णालयांसारखे नाही आणि सेवा आमचे प्रथम कर्तव्य समजतो,’ असे म्हणणार आणि नंतर उपचार करताना इतर रुग्णालयांप्रमाणेच रुग्णांना वागणूक देणार, हे योग्य नाही.
नंतर रुग्णालय प्रशासनाने आपली चूक मान्य केली. अहो, पण त्या बाईचा जीव गेला की, तो परत थोडाच येणार? ‘दहा लाख अनामत रक्कम भरा,’ हे सांगणेच मुळात चुकीचे. सर्वसामान्य, तुमच्या-आमच्यासारखा माणूससुद्धा एकदम दहा लाख लगेच भरू शकणार नाही. म्हणून चूक ती चूकच!
आता रुग्णालय प्रशासनाने विचार पक्का करायला पाहिजे. रुग्णालय म्हणून रुग्णालय प्रशासनाने मी प्रशासन म्हणून नक्की कसा आहे? मी सेवा देणारा असा आहे का? असे चिंतन करावे लागेल. म्हणूनच म्हटले, डॉक्टर आणि रुग्णालय यांच्यासाठीही ही धोक्याची घंटा.
रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक
21वे शतक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीवर्षात आपण आहोत. स्त्रीला पुरुषांप्रमाणे पूर्ण अधिकार, तसेच तिला काय वाटते, हे लक्षात घेऊन, तिला सामावून घेऊन सर्व विषय करणे, हे अपेक्षित. आपल्या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. वरील सर्व गोष्टी विचारात घेता खरे तर ‘ती’चा विचार होणे गरजेचे होते. पण, तसे खरोखरच होतेय का?
एक संदर्भ देतो. ती आई, ताई, भगिनी आता आपल्यात नाही. पण, तिला त्या 24 तासांमध्ये झालेल्या वेदनांचा विचारसुद्धा आपण करू शकणार नाही. मग कशासाठी हा सगळा अट्टाहास? शारीरिक व्याधी असणे हे आपल्या हातात नाही. हे आपण मान्य का करत नाही? कर्करोगासारख्या आजारातून बरे झाल्यावर परत एवढी मोठी शारीरिक जबाबदारी कशाला घ्यायची? आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट. परमोच्च आनंदाचा क्षणच तो. पण, त्यासाठी स्वतःचे आयुष्य दावणीला लावणे, हे कितपत योग्य? आधी सांगितल्याप्रमाणे ती आई, माता, भगिनी आता आपल्यात नाही. तिच्या आत्म्यास शांती लाभो. स्वर्गातून ती आपल्या बाळांना पाहून नक्की आनंदी होत असेल आणि त्या ईश्वरालाच काळजी. तो बघून घेईल त्या दोन चिमुरड्यांकडे...
रुग्णाचे नातेवाईक म्हणून
तू आई, भगिनी, ताई आमच्याबरोबर हवी आहेस, कशाला आपण तिला काही मागतोय, तू आहेस तशी आम्ही तुला स्वीकारणार, असे होऊ शकले असते का? मुले-बाळे नसली, तरी जीवन आनंदाने जगूया, हे तिच्याबरोबर कोणीतरी बोलले असेल का? एका रुग्णालयामधून दुसरीकडे नेताना तिचा विचार का नाही नातेवाईक म्हणून केला गेला? तिच्या वेदना आपण नातेवाईक म्हणून का नाही समजू शकलो? आपण आपल्या माणसांवर गोष्टी लादत तर नाही आहोत ना? देवाला आपण ‘डॉक्टर’ म्हणतो. अरे, पण तो हाडामांसाचा एक माणूसच शेवटी! तो नक्की प्रयत्न करणारच की! आता त्याला दोष देऊन काय होणार?
आता झाले ते झाले. पण, मी एक स्त्री म्हणून काय विचार करायला पाहिजे, हे महत्त्वाचे. तसेच रुग्णाच्या घरातील म्हणून आहे ती व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची नाही का? आता मी रुग्ण म्हणून किंवा घरातील, कुटुंबातील मी असा आहे का? हे चिंतन करावे लागेल मला. म्हणूनच म्हटले रुग्ण किंवा नातेवाईक यांसाठीही आहे धोक्याची घंटा.
समाज आणि आपण
काही प्रश्न पडले आहेत. एक महिला रुग्णालयामध्ये अॅडमिट होते. नंतर काही चुकीच्या गोष्टी घडतात आणि ती महिला दगावते. आता पुढे काय होते बघा.
डॉक्टरांच्या आई आणि वडिलांच्या दुसर्या ठिकाणी असणार्या क्लिनिकवर तोडफोड. ज्या ठिकाणी आधी महिलेला अॅडमिट केले होते, तिथे जाऊन निदर्शने, रुग्णालय प्रशासनाला शिवीगाळ. उपचार कारणार्या डॉक्टरला धमकी.
मीडिया ट्रायल. म्हणजे जो येईल तो बोलतोय. मग समाज म्हणून हे योग्य आहे का?
मी...
रुग्णालयामधील प्रकार आणि मी म्हणजे स्वतःविषयी मला खंत वाटली. संवेदना नसणारा मी तयार झालो आहे. मला याच समाजाने तयार केले आहे का? पण, खरेच मी असा आहे का?
मला म्हणून स्वतःला रुग्णालयाची इमारत बघितली की एक प्रेरणा मिळते. माझ्या शरीराला परत व्यवस्थित सुदृढ बनवणारी हीच ती इमारत. इथे आल्यावर सर्वजण (डॉक्टर, नर्सेस) मला कसे बरे करता येईल, यासाठी पूर्ण प्रयत्न करताना मी अनुभवले आहेत. स्वतः सोडून दुसर्याचा विचार करणारे...
या संवेदना नसणार्या समाजामध्ये चुकून मी तर नाही ना, याचा विचार आपणच करूया. तसे असेल तर मात्र माझ्यासारख्या मीसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
यातून मी म्हणून एक धडा घेणे गरजेचे आहे. विविध प्रकारचे आजार आणि तत्काळ लागणारी वैद्यकीय मदत, रुग्णालयामध्ये लागणारा भरपूर खर्च, तसेच तेव्हा करावे लागणारे आर्थिक नियोजन यासाठी आधीच आयुर्विमा काढून ठेवला पाहिजे.
मी म्हणून...
मी कोणीही असेन, डॉक्टर, रुग्णालय प्रशासक, रुग्ण किंवा त्याच्या घरातील एक नातेवाईक किंवा समाजामधील तो एक. ‘मी’च्या विचारांमध्ये बदल मात्र गरजेचा आहे. खरा मी तर हिंदू संस्कृतीला, कुटुंब व्यवस्थेला मानणारा आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारताच्या मूळ विषयाला मानणारा.
वैयक्तिक माझ्याविषयी...
माझा वैद्यकीय क्षेत्राशी दूरपर्यंत काहीच संबंध नाही. पण, ‘सुदर्शन कॅन्सर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे रुग्णाला उपचारांबरोबर मार्गदर्शनाची आणि सहवासाची गरज जास्त आहे.
मला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, मी लेखात माझे वैयक्तिक मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलीही व्यक्ती, डॉक्टर, रुग्णालय, सामाजिक संघटना यांच्यावर माझा आक्षेप नाही. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व!
- योगेश देशपांडे