बंगाल मधील हिंसाचार सुनियोजित कट! रामनवमीचा होता मुहुर्त; तपासात धक्कादायक खुलासे उघडकीस
16-Apr-2025
Total Views | 27
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (West Bengal violence) पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नव्या वक्फ कायद्याच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन हिंसक वळणावर येऊन पोहोचले. झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार आणि शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आहे. इस्लामिक कट्टरपंथींच्या उन्मादामुळे परिसरात दहशत पसरली असून अनेक हिंदू कुटुंबांना त्यांची घरे सोडून सुरक्षित ठिकाण गाठावे लागत आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हा हिंसाचार तीन महिन्यांपूर्वी रचलेला सुनियोजित कट होता. परदेशातून निधी मिळाल्याचा धक्कादायक खुलासाही यावेळी करण्यात आला आहे.
तपास यंत्रणांना आढळून आलेल्या माहितीनुसार, या हिंसाचाराला तुर्कियेकडून निधी देण्यात आला होता आणि हल्लेखोरांना लुटीसाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये दिले जात असल्याचे समोर आले आहे. पश्चिम बंगालला बांगलादेशसारख्या अराजक परिस्थितीत ढकलण्याचा कट यावेळी शिजत होता, हे देखील तपासातून आढळून आले. अशी माहिती आहे की, काही महिन्यापूर्वी दोन अज्ञात लोक मुर्शिदाबादमध्ये आले आणि त्यांनी स्थानिकांना मोठ्या प्रमाणात दावत दिल्याची चर्चा होती.
तपासातून पुढे असेही लक्षात आले की, सुरुवातीला रामनवमीचा दिवस हिंसाचारासाठी ठरविण्यात आला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तारीख पुढे ढकलण्यात आली. इतक्यातच नव्या वक्फ कायद्याला होणारा विरोध निमित्त मिळाले. हल्लेखोरांना गाड्यांची नासधूस, सरकारी मालमत्तेचे नुकसान, हिंदूंवर हल्ले, त्यांची घरे लुटणे इत्यादी गोष्टी करण्यास सांगितले होते. सध्या तपास यंत्रणा हिंसाचारामागील कटाचा खोलवर शोध घेत आहेत. तुर्कस्तानातून हल्लेखोरांना निधी आणि प्रशिक्षण मिळाल्याच्या पुराव्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनले आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांनी सरकारने कठोर कारवाईची मागणी केली आहे.