नुकतीच ‘पॅट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसह राज्यातील सुमारे 21 विविध युट्यूब चॅनलवर प्रसारित झाली आणि एकच खळबळ उडाली. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा ‘कॉपीमुक्त’ व्हाव्यात म्हणून अभियान राबविण्यात आले. तरी या गैरप्रकाराला 100 टक्के आळा बसू शकला नाही, हे वास्तव. या घटनांमधून सामाजिक शहाणपण आणि विवेकाची नितांत गरज अधोरेखित झाली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन’ व ‘प्रशिक्षण परिषदे’च्यावतीने ‘स्टार’ प्रकल्पातंर्गत तिसरी ते नववीसाठीच्या द्वितीय सत्र परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका राज्य स्तरावरून शाळांना पाठवण्याची प्रक्रिया गेली काही वर्षे सुरू आहे. अर्थात, राज्य स्तरावरील ‘नियतकालिक मूल्यांकन चाचणी’ (periodic assessment test) म्हणजे, ‘पॅट’ या परीक्षेचे कार्यवाहीचे वेळापत्रक राज्य स्तरावरून सर्व शाळांना पाठवण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून प्रथम व द्वितीय सत्र परीक्षांसाठीच्या प्रश्नपत्रिका स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळांना शासनाकडून पाठवण्यात येत आहेत. नेहमीप्रमाणे, याहीवर्षी परीक्षा घेण्याच्या संदर्भात नियोजन करून त्यानुसार संपूर्ण राज्यभर दि. 25 एप्रिल रोजीपर्यंत परीक्षा सुरू राहतील, असे वेळापत्रक देण्यात आले. परंतु, यावर्षी परीक्षा लांबवण्यात आल्याने काहीसा संघर्ष सुरू झाला. शिक्षक संघटनांनी पेपर तपासणी आणि निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार नसल्याने तक्रारी केल्या आहेत; तर विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढत असल्याने व परीक्षेचा कालखंड वाढल्याने विरोध केला. यासंबंधी वेळापत्रक बदलासाठी शासनाला निवेदन देण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही. बरेच दिवस तो संघर्ष असाच सुरू राहिला. हा संघर्ष संपत नाही, तोच परीक्षेच्या वेळापत्रकाप्रमाणे शाळांना परीक्षा घेणे भाग पडले. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ‘पॅट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसह राज्यातील सुमारे 21 विविध युट्यूब चॅनलवर प्रसारित झाली. त्यातील काहींनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि त्यांची उत्तरे देत विश्लेषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेकांनी शासनाने पुरवलेल्या प्रश्नपत्रिका आहे तशाच स्क्रीनवर दाखवणे पसंत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका मिळाल्या आहेत. यामुळे परीक्षेचे गांभीर्य कमी होत असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होऊ लागली. हा प्रकार शिक्षणक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्ह मानायला हवा. यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा ‘कॉपीमुक्त’ व्हाव्यात म्हणून अभियान राबवण्यात आले. तरी या गैरप्रकाराला 100 टक्के आळा बसू शकला नाही, हे वास्तव आहे. शिक्षणात ही वाममार्गी पेरणी नेमकी कशी आणि का होते? हा खरा प्रश्न आहे.
या सर्व वाममार्गाने विद्यार्थ्यांचा प्रवास घडवण्याच्या प्रक्रियेत पालक, समाजातील विविध घटक, शिक्षक, प्रशासन आणि आता युट्यूब वाहिन्यादेखील सहभागी होत असतील, तर आपण सामाजिक शहाणपणच गमावले आहे, असा यावर शिक्कामोर्तब झाल्याचेच म्हणावे लागेल. माणसांचीदेखील विवेकाची वाट हरवताना दिसते आहे. त्याचा परिणाम म्हणून यासारखे गैरमार्ग अनुसरले जात आहेत. यानिमित्ताने आपण कोणत्या दिशेने प्रवास करीत आहोत? याचाही विचार करायला हवा. अवतीभोवतीचा भोवताल बिघडलेला असताना, तो सुधारण्यासाठी समाज शिक्षणाकडे पाहत आहे. मात्र, अशावेळी शिक्षणच वाममार्गाने पाऊलवाट चालत असेल, तर आपले भविष्य कशाच्या आधारावर प्रकाशमान होणार, हा प्रश्नच आहे.
‘पॅट’ परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका राज्य स्तरावरून पुरवल्या जात आहेत. त्यासाठीच्या प्रश्नपत्रिका ‘राज्य शैक्षणिक संशोधन’ व ‘प्रशिक्षण परिषदे’ने पुरवल्या आहेत. प्रश्नपत्रिका राज्यभरातील शाळांमध्ये पोहोचल्या आहेत. त्यादृष्टीने शाळा परीक्षांची तयारी करत, परीक्षेचे गांभीर्य टिकून राहील यासाठी प्रयत्न करीत आहेत. ‘शिक्षण हक्क कायद्या’च्या अस्तित्वानंतर विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित असल्यास शाळेत पुन्हा येईल, तेव्हा परीक्षा घेण्याचे सूचित केले आहे. त्याचबरोबर पहिली ते चौथी आणि सहावी व सातवीच्या वर्गात पुढे 100 टक्के विद्यार्थी पाठवणे घडत आहे, त्यामुळे पालक बिनधास्त झाले आहेत. अर्थात, कायद्याची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण आली, तरी त्याचे नुकसान होऊ नये, ही त्यामागील भावना आहे. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि पुन्हा काही प्रश्न निर्माण झाले.
शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची वृत्ती हळूहळू कमी होत चालली आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणून शिक्षणाचे वर्तमान अधिक गडदपणे दिसू लागले आहे. परीक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेच्या प्रश्नपत्रिका बिनधास्तपणे समाजमाध्यमांत सहजतेने उपलब्ध केल्या जात आहेत. म्हणजे, पूर्वी प्रश्नपत्रिका विकल्या जात होत्या. त्यासाठी लाखो रुपयांचे व्यवहार होत होते. त्यात केवळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अनेक जण सहभागी होत असताना, वर्तमानात मात्र समाजमाध्यमांवर परीक्षेपूर्वी केवळ आपल्या युट्यूब वाहिनीला प्रेक्षक ग्राहकांची संख्या वाढली जावी, यादृष्टीने असे प्रयत्न केले जात आहेत. अर्थात, केवळ प्रश्नपत्रिका माध्यमांत दिल्या आहेत असे नाही, तर प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि त्यांची उत्तरे विश्लेषणासह समाजमाध्यमांवर परीक्षेपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. खरेतर ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीदेखील या स्वरूपातील प्रयत्न केले गेले होते. त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून बिनधास्तपणे परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका आपल्या युट्यूब वाहिनीवर प्रसारित केले जात आहेत. आपण अभ्यास करण्यापेक्षा अशा वाममार्गी पद्धतीने गुण मिळवण्यात विद्यार्थ्यांचा रस वाढतो आहे. आज कायदेशीर कारवाई केल्याने उद्या कदाचित असे घडणार नाही. मात्र, कायदेशीर कारवाई केली जाईल म्हणून न करणे म्हणजे केवळ भीतीने वागणे आहे. यानिमित्ताने मुळात माणूस म्हणून विवेकाची वाट चालणे घडणार की नाही? हा खरा प्रश्न आहे.
परीक्षेच्या संदर्भाने प्रश्नपत्रिका अशाप्रकारे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने प्रक्रियेबाबत जनमनात संशयाचे वातावरण निर्माण झाले. खरेतर कोणत्याही प्रकारच्या प्रश्नपत्रिका या गोपनीय मानल्या जातात. शेवटी परीक्षा आणि प्रश्नपत्रिकांवर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडणार असते.विद्यार्थ्यांना त्याआधारे गुण मिळत असतात.त्यातून मुलांच्या क्षमता, कौशल्य समजून घेणे घडते. त्याचबरोबर शिक्षणातील अडथळे समजून घेणे घडत असतात. नाही म्हटले तरी आपल्याकडे गुणांसाठी का होईना, पण अभ्यास केला जातो. शिक्षणापेक्षा परीक्षेतील गुणच महत्त्वाचे वाटू लागले आहेत. मात्र, आता किमान जे विद्यार्थी गुणांसाठी अभ्यास करतात, ते विद्यार्थीदेखील असे प्रकार समोर आल्यावर अभ्यासापासून दुरावणार नाहीत का? याची चिंता समाजाला लागणे साहजिकच आहे. मुळात समाज उन्नत करण्याची जबाबदारी ही केवळ शाळा, शिक्षक यांची नाही, तर समाजातील प्रत्येक घटकांची आहे. आपल्या जबाबदारीची जाणीव आपण पेलू शकलो नाही, तर समाजाची अधोगती होण्यास असा कितीवेळ लागेल? दुर्दैवाने समाजातील सर्वच जण आपली जबाबदारी विसरत चालले आहेेत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. समाज अधिकाधिक प्रामाणिकतेच्या दिशेने प्रवास करेल, यादृष्टीने पेरणी करण्याची आता वेळ आली आहे. खरेतर माहिती-तंत्रज्ञान हाती आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विवेक गमावणे घडू लागले आहे. समाजमाध्यमांमध्ये लोक ज्याप्रकारे व्यक्त होत आहेत, त्यातून जी भाषा वापरली जाते आहे, ती पाहिली की आपली अधोगती का होते आहे? याचे उत्तर मिळू लागेल. प्रामाणिकपणा आपण जोपासणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. आपण आपल्या संवेदना गमावत आहोत का? या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या महापुरुष क्रांतिकारकांनी बलिदान दिले, त्यांनी आपल्यातील प्रामाणिकपणाशी कधीदेखील तडजोड केली नाही, असा आपला इतिहास आहे. त्यांच्या बलिदानानंतर देशाचे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी तरी आपण अधिकाधिक चांगला समाज घडविण्याची जबाबदारी पेलायला हवी. समाजाची प्रगती करायची असेल, तर उत्तम गुणवत्तेची माणसे आपल्याला तयार करायला हवी. गुणवत्ता म्हणजे गुण नाही, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान असतानादेखील स्वतःच्या निवासस्थानी रेशनचे धान्य आणून त्यापासून बनवलेले पदार्थ खात होते. आपण आपल्या देशाशी अधिकाधिक प्रामाणिक असायला हवे, हा विचार त्यांच्या अंतकरणात कोणी रुजवला असेल? देशासाठी बलिदान देताना अनेक लोक भूमिगत होते, अनेकांनी प्राण दिले, पण देशाशी गद्दारी केली नाही, याचे कारण त्यांचा विवेक शाबूत होता. ते लोक निरक्षर होते, पण विवेक मात्र अधिक शाबूत होता, सामूहिक शहाणपणदेखील अधिक होते. आज शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक आहे. मात्र, नेमक्या विवेक आणि सामूहिक शहाणपणाचा अभाव वर्तमानात आपल्या भोवतालमध्ये दिसतो आहे.
परीक्षेशी निगडित असलेल्या अधिक महत्त्वाच्या असणार्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्या जाणार नाहीत, याची काळजी समाजमाध्यमांत जबाबदारी पार पाडणार्या प्रत्येक वाहिनीच्या प्रतिनिधीने घेण्याची गरज होती. मात्र, तसे घडताना दिसत नाही. सामाजिक शहाणपण, विवेकाची नितांत गरज पुन्हा पुन्हा अधोरेखित होऊ लागली आहे. आपण अशाप्रकारे वर्तन करून शासनाचे किती नुकसान करतो, यापेक्षा समाजाचे आणि उद्याच्या पिढीचे मात्र अधिक नुकसान करत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाची परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लावण्याची गरज असताना, समाजाची जबाबदारी असलेल्या समाजमाध्यमकर्तेच बेजबाबदार वागत असतील, तर शिक्षणाने अधिक जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. गुन्हा दाखल झाल्याने कदाचित उद्या संबंधितांवर कारवाई होईल, पण सारेच कायद्याच्या धाकाने घडावे हा शिक्षणाचा पराभव आहे, हे लक्षात घ्यायला हवे. शेवटी मूल्यांचा विचार पेरल्याशिवाय आपल्याला उन्नत आणि प्रगत समाजाच्या दिशेने जाता येणार नाही.
संदीप वाकचौरे
sandeepwakchaure2007@rediffmail.com