नाशिक: ( Nashik Municipal Corporation hammers at unauthorized dargah ) उच्च न्यायालयाने आदेश देवूनही सातपीर दर्गा हटविण्यात न आल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अखेर दर्ग्यावर हातोडा चालवत जमिनदोस्त केला.
शहरातील काठे गल्ली परिसरात असणाऱ्या या सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी दर्गा ट्रस्टला १५ दिवसांपूर्वीच दिली होती. मात्र, कोणतीही कार्यवाही न केल्याने नाशिकचे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने बुधवारी दि. १६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास पाडकामाला सुरुवात केली. हा अनधिकृत दर्गा पुर्णपणे हटविण्यात आला असून त्याचा राडारोडा देखील उचलण्यात आला.
मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास दर्ग्याच्या पाडकामाला प्रारंभ करण्यापूर्वी धार्मिक विधी पार पाडण्यात आले. यावेळी अनधिकृत सातपीर दर्ग्याबाहेर मौलवी, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मौलवी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी हा दर्गा हटवण्याची तयारी दर्शवली होती.
मात्र, मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उस्मानिया चौकाच्या बाजूने आलेल्या जमावाने गोंधळ झालण्यास सुरुवात केली. दर्ग्याचे ट्रस्टी, प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याचगरम्यान या जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि सौम्य लाठीमार केला.
हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास आडकाठी आणत दंगल घडवत शहरात अशांतता निर्माण करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दगडफेक करुन पोलिसांना जखमी करणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच ५७ दुचाकी देखील हस्तगत केल्या आहेत. दर्ग्याचे बांधकाम पूर्णत: निष्कासित करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मोठ्या लवाजम्यासह केले पाडकाम
बुधवार दि. १६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजता महापालिका प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात करण्यात आली. हे पाडकाम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ४ बुलडोझर तैनात केले. तर ६ ट्रक, २ डंपर आणि ४० ते ५० मनपा अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने राडारोडा उचलून हा परिसर मोकळा करण्यात आला.
परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातपीर दर्गा विश्वस्तांनी दर्गा हटविण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतू दर्गा हटविण्यास विरोध करण्यासाठी हिंसक जमाव पोलिसांवर चालून आला. जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आणि नागरिकांवर या जमावाने दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. या झटापटीत पोलिसांच्या तीन वाहनांचे नुकसान असून २१ पोलिस जखमी झाले आहेत. तर जमावातील १५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरु आहे.