राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    16-Apr-2025
Total Views | 17
 
Mangalprabhat Lodha
 
मुंबई : राज्यभरात येत्या २२ ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून शासनाच्या सर्व विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी दिले.
 
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर सचिव मनीषा वर्मा, दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, दीनदयाळ संशोधन संस्थेचे सचिव अतुल जैन उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? - पवारांनी फावल्या वेळेत त्यांना हवा तसा इतिहास लिहावा! गोपीचंद पडळकर यांची टीका  
 
या हिरक महोत्सवासाठी सरकारच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून मंत्री मंगलप्रभात लोढा या समितीचे अध्यक्ष आहेत. या बैठकीत बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "मानव कल्याणासंदर्भातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे मौलिक विचार समाजात रुजावेत या उद्देशाने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव साजरा होणार आहे. देशभरात या महोत्सवाची सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे."
 
महोत्सवादरम्यान कोणते उपक्रम?
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचार प्रणाली, एकात्म मानवदर्शन याबाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवात ग्रामीण भागात बचतगट, अंगणवाड्या आणि शाळांमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. तसेच गावातील स्वच्छता विषयक उपक्रम, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजना पोहचवण्यासाठी या महोत्सवात युद्ध पातळीवर प्रयत्न करा, अशा सूचना मंत्री लोढा यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121