उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट! भेटीमागचं कारण काय? शिंदे म्हणाले...
16-Apr-2025
Total Views | 23
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवार, १५ एप्रिल रोजी भेट घेतली. त्यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. यावर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
या भेटीवेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मनसे नेते अमित ठाकरे, मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर, मनसे नेते अभिजित पानसे हेदेखील उपस्थित होते. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज ठाकरेंनी आज मला जेवणाचे निमंत्रण दिले होते. त्यासाठी मी आलो होतो. गेल्या काही दिवसांपासून निवडणुका झाल्यानंतर भेटायचे, जेवायला या, एकत्र जेऊया आणि गप्पा मारुया असे आमचे सुरु होते. त्यामुळे मी आज आलो. ही सदिच्छा भेट होती आणि स्नेहभोजनही झाले. गप्पा गोष्टी झाल्या. बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. आम्ही एकत्र काम केलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या. बाळासाहेबांच्या काळातील अनेक जुन्या घटनांवर बरीच चर्चा आणि गप्पा झाल्या. अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला हे कळलेच नाही. त्यामुळे ही सदिच्छा भेट होती. याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "यावेळी अनेक विकासकामांबद्दलही चर्चा झाली. पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आमचा एवढा वेळ कसा गेला हे कळले नाही. ही वस्तूस्थिती आहे. आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे नेते आहोत. आम्ही पोटात एक ओठात एक ठेवणारे लोक नाही. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आता आम्ही महायुतीत आहोत. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुती चांगले यश मिळवेल. आता निवडणुकांवर चर्चा करण्याची वेळ नव्हती. आम्ही नेहमी तयारीतच असतो. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका आल्या की, काम करायचे, कार्यालये उघडायची, असे आम्ही करत नाही. त्यामुळे निवडणुका असू द्या किंवा नसू द्या, शिवसेना ही कायम काम करत असते. लोकांच्या अडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही," असेही ते म्हणाले.
विरोधकांनी चिंता करण्याचे कारण नाही
"आता जवळपास निवडणुका नाही. निवडणुकांचा माहोल तयार झाल्यावर युती, महायुती ही चर्चा तेव्हा होते. पण आज कुठलीही युती किंवा महायुतीची चर्चा नव्हती. केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती. राज ठाकरे हे लोकसभेत मोदींसोबत होते. राज ठाकरे आणि आमचे विचार मिळतेजुळते आहेत. त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही. त्यांनी काम करावे. घरी बसून निवडणूका जिंकता येत नाही. त्यासाठी काम करावे लागते. काम करणाऱ्या लोकांना निवडणूकांची चिंता नसते," असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.