साधारणत: कलाकार हाच कलेची निवड करत असतो, पण कलेनेच ज्यांची निवड केली आहे, अशा डॉ.कलाश्री बर्वे यांच्याविषयी...
कला ही आत्म्याच्या अतिसूक्ष्म गाभ्यातून प्रकटणारी एक दैवी जाणीव. ती केवळ चित्रात, सुरावटीत किंवा शिल्पात नाही, तर कलाकाराच्या अंतर्मनात साकारणार्या एका अलौकिक अनुभूतीत असते. शब्द जेथे थांबतात, तिथे कलेची भाषा सुरू होते. ही भाषा संवेदनांनी समजते. कलाकाराचे मन म्हणजे एका तपस्व्याचे ध्यानस्थ विश्वच! साधारणतः कलाकार हा कलेची निवड करत असतो, पण कलेने एखाद्याला निवडावे ही कथा विरळच! अशीच काहीशी कथा आहे डॉ. कलाश्री बर्वे यांची.
मुंबईतील गोरेगावमध्ये जन्मलेल्या कलाश्री यांच्या घरातील वातावरण हे कलामयच! कलाश्री यांचे वडील भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कलादिग्दर्शक. त्यामुळे साहजिकच कलेचा वारसा वडिलांकडूनच मिळाला. मात्र, संघर्षाशिवाय कलाकाराचे आयुष्य उजळत नाही, हेच खरे. चुकीच्या उपचार पद्धतीमुळे अकराव्या महिन्यातच कलाश्री यांना पोलिओची लागण झाली. त्यानंतरही कलाश्री यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. पुढे त्यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये ‘अप्लाईड आर्ट्स’ला प्रवेश घेतला.
याकाळात देखील सर्वोत्तम कामगिरी करण्याची परंपरा कलाश्री यांनी जपली. जे. जे. महाविद्यालयातदेखील कलाश्री यांच्या कलेचे कौतुक अनेक शिक्षक करत. कलाश्री यांच्या कलाकृती पुढील विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठीही शिक्षकांनी ठेवून घेतल्या.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कलाश्री यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. लहानपणापासून सखी असलेल्या कलेच्या साहाय्यानेच, आयुष्यात रंग भरण्याचे कलाश्री यांनी निश्चित केले होते. कलाश्री यांना आतापर्यंतच्या प्रवासामध्ये अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले होते. पोलिओमुळे काही शारीरिक मर्यादादेखील येत होत्या.
मात्र, कलाश्री यांची जिद्द मोठी होती. बाह्य जगतामधील बंधने समजल्यावर कलाश्री यांनी अंतर्मनातील आवाज ऐकला आणि समाजाला कलेच्या माध्यमातून आनंद देण्यासाठी त्या स्वतः सज्ज झाल्या. त्यानंतर कलाश्री यांनी आपले नाव सार्थ ठरवत, अनेक कलांच्या माध्यमातून या समाजाची सेवा केली. हिंदू संस्कृतीमध्ये ‘श्री’ हे लक्ष्मी अर्थात समृद्धतेचे प्रतीक मानले जाते. या नियमाने ‘कलाश्री’ या नावाचा अर्थच कलेने समृद्ध असणारी असा होतो. कलाश्री यांचे आयुष्यही असेच कलेने सर्वांगीण समृद्ध आहे. लेखन, दिग्दर्शन, कलादिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रांमध्ये कलाश्री यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे.
आजवर कलाश्री यांनी ‘द आय ऑफ द मून’ आणि ‘द अॅपिटायझर’ या पाश्चात्य चित्रपटांसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच, भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘कुछ कुछ होता हैं’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसहित जवळपास 15 चित्रपटांच्या निर्मितीमध्येही कलादिग्दर्शक म्हणून भूमिका निभावली आहे. त्याच पद्धतीने मराठीमध्ये ‘देऊळ’, ‘सावरखेडं-एक गाव’ अशा चित्रपटांसाठीही काम केले आहे. तसेच, ‘बिग बॉस’, ‘विक्राळ’ आणि ‘गबराल’ अशा अनेक मालिकांमध्येही कलादिग्दर्शक म्हणून त्यांनी लीलया जबाबदारी पार पाडली.
कलाश्री यांना त्यांच्या कार्यासाठी असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, त्यात अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचाही समावेश आहे. जवळपास 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कार आज कलाश्री यांच्या नावावर आहेत, तर राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांच्या ‘देश आगे बढ रहा हैं’ या लघुपटाला ‘दादासाहेब फाळके’ हा सन्मानाचा पुरस्कारही मिळाला आहे. आजवर अनेक कलाकृतीच्या माध्यमांतून कलाश्री यांची कला समाजासमोर आली आणि त्या कलाकृतीवर रसिकांनीही भरभरून प्रेम केले. त्यामुळे कलाश्री आणि पुरस्कार हे एक समीकरणच झाले आहे. सध्या कलाश्री दिग्दर्शन क्षेत्रामध्ये एका मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील असून, गुंतवणूकदारांच्या शोधात आहेत.
कलाश्री यांची कला जशी दिग्दर्शनातून दिसते, तशीच ती चित्रांतूनही बहरते. कलाश्री उत्तम चित्रकार असून, त्यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने देशभरात अनेक ठिकाणी भरवली गेली आहेत. तसेच, सातासमुद्रापल्याड असलेल्या प्रदर्शनांत कलाश्री यांच्या चित्रांनी रसिकांच्या मनाला भुरळ पाडली. कलाश्री जितक्या उत्तम दिग्दर्शक व चित्रकार आहेत, तितक्याच संवेदनशील लेखिकही आहेत. ‘इंक फ्रॉम हार्ट’ हे त्यांचे पुस्तक फारच लोकप्रिय झाले. तसेच, या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत, तर ‘फॉर यू’ हे त्यांचे दुसरे पुस्तकही लवकरच रसिकांना वाचायला मिळणार आहे. या पुस्तकाचे कौतुक प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक अनंत महादेवन आणि प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक ‘पद्मश्री’ विजेते कैलाश खेर यांनी केले आहे.
कलाश्री यांच्या कलेच्या प्रसार आणि प्रचाराची दखल घेत ‘वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्ल युनिव्हर्सिटी’कडून, कलाश्री यांना मानद ‘डॉक्टरेट’ही प्रदान करण्यात आली. आज ‘कलाविशारद’ या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून विविध कला जोपासताना कलाश्री यांनी, दिव्यांगांच्या कार्यातदेखील स्वतःला वाहून घेतले आहे. दिव्यांगांसाठीच्या समाजकार्यात कलाश्री या हिरिरीने सहभागी होतात. “आपण काय कमावले, यापेक्षा आपण या दिले यातील आनंद अवर्णिनीय आहे,” असे कलाश्री म्हणतात. म्हणूनच त्या सातत्याने समाजाला काही देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर