कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदुषणावर योग्य कारवाई करा! कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश
16-Apr-2025
Total Views | 14
मुंबई : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात संयुक्तरित्या मोहिम राबवून कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेऊन आवश्यक कारवाई करा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी मंगळवार, १५ एप्रिल रोजी दिले.
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभाग, पर्यावरण विभाग आणि कामगार विभागाची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार राहुल कुल, कुरकुंभ एमआयडीसीमधील संबंधित अधिकारी, रासायनिक उद्योग प्रतिनिधी, पर्यावरण विभाग, कामगार विभाग यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, "महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात संयुक्तरित्या मोहिम राबवून कारखान्यांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेऊन आवश्यक कारवाई करावी. या मोहिमेमध्ये संबंधीत ग्रामपंचायत प्रतिनिधी सुध्दा घ्यावेत. कुरकुंभ परिसरात बहुसंख्य रासायनिक उद्योग कार्यरत असल्याने संभाव्य अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत त्वरीत उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र पथक गठित करून औद्योगिक परिसराची सखोल तपासणी करावी," असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आमदार राहुल कुल यांनी यावेळी एमआयडीसी परिसरातील CETP (कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट) संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. जे उद्योग प्रदूषित पाण्याची निर्मिती करतात, तेच उद्योग CETP चालवत असल्यामुळे प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण राहत नाही. याबाबत धोरणात्मक फेरआढावा घेऊन अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्या, असे निर्देश मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले. तसेच फायर ऑडीट संबधित महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ अंतर्गतचे नियम तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी उद्योग विभागासोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही दिल्या.