बीड : आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. परंतू, आपण ती नाकारली, असा खळबळजनक दावा निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांनी केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रणजीत कासले या व्हिडीओमध्ये म्हणाले की, "मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती. पण मी त्याला नकार दिला. त्यासाठी १० कोटी, २० कोटी, ५० कोटी अशी ऑफर दिली जाते. मी सायबर विभागात होतो. पण माझा काही संबंध नसताना मला इकडे बोलवून घेण्यात आले."
त्यानंतर रणजीत कासले यांनी मंगळवारी पुन्हा एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्याला धनंजय मुंडेंनीच ही ऑफर दिल्याचे म्हटले आहे. "धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते. त्यामुळे त्यांनीच वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर दिली होती. कराड त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळे ते सहरोपी झाले असते," असा दावा रणजीत कासले यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे आता संतोष देशमुख मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागले आहे.