नवी दिल्ली: ( Narendra Modi on WAQF )“वक्फ’च्या ताब्यात हजारो एकर जमीन असतानाही त्याचा मूठभरांनी केवळ गैरवापर केला. म्हणून मुस्लीम समाजातील तरुणांना सायकलचे पंक्चर काढण्याची वेळ आली,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातील हिसार येथे केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील हिसार येथील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली.
“वक्फ’च्या अखत्यारीत असलेल्या विस्तीर्ण भूमीचा वापर मुसलमान समाजातील गरीब, निराधार महिला आणि मुले यांच्यासाठी होणे अपेक्षित होते. मात्र, मूठभर भूमाफियांनी त्यांचे शोषण केले. जर या जमिनींचा प्रामाणिक वापर झाला असता, तर मुस्लीम तरुणांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करण्यात आपले आयुष्य घालवावे लागले नसते.
हे माफिया दलित, मागासवर्ग आणि आदिवासींच्या जमिनी हडप करत असून पसमंदा मुसलमान समुदायाला काहीही लाभ मिळालेला नाही. ‘वक्फ कायद्या’तील सुधारणांमुळे अशा शोषणाला आळा बसणार आहे. त्याचप्रमाणे सुधारित कायद्यातील एका महत्त्वाच्या तरतुदीमुळे ‘वक्फ बोर्डा’स वनवासींच्या जमिनींना हात लावता येणार नाही,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
काँग्रेसचा हेतू मुस्लीम कल्याणाचा नव्हता खरे स्वरूप उघड
मुस्लीम कल्याणासाठी काम केल्याचा दावा केल्याबद्दल आणि प्रत्यक्षात कोणतीही अर्थपूर्ण कामगिरी करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल काँग्रेस पक्षावर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जर त्या पक्षाला मुस्लीम समुदायाची खरी काळजी होती, तर त्यांनी त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून एका मुस्लीम व्यक्तीची नेमणूक करायला हवी होती किंवा निवडणुकीत उभे राहणार्या त्यांच्या उमेदवारांपैकी 50 टक्के तिकिटे मुस्लीम उमेदवारांना द्यायला हवी होती. मात्र, काँग्रेसचा हेतू कधीच मुस्लिमांच्या खर्या कल्याणाचा नव्हता आणि यातून त्यांचे खरे स्वरूप उघड होते,” असाही टोला पंतप्रधानांनी यावेळी लगावला आहे.