मुंबई: ( Minister Nitin Gadkari on service-education sector ) “खेड्यातील अर्थव्यवस्था जोपर्यंत सुदृढ होत नाही, तोवर भारत आत्मनिर्भर किंवा विश्वगुरू होऊ शकत नाही. त्यासाठी समाजकारण, सेवा-शिक्षण या क्षेत्रात काम करणे ही खरी आजची आवश्यकता आहे. तसे झाल्यास भारत विश्वगुरू म्हणून नावारुपास येईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सोमवार, दि. 14 एप्रिल सायंकाळी 6 वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्य मंदिर-प्रभादेवी येथे ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’चा कर्मयोगी पुरस्कार सोहळा संपन्न झाला. संस्थेचे प्रशांत बोपर्डीकर यांना ‘कर्मयोगी पुरस्कार 2025’ने गौरविण्यात आले. उपस्थितांना संबोधत नितीन गडकरी म्हणाले, “गावात रस्ता, प्यायला शुद्ध पाणी, मुलांकरिता शाळा, शेतकर्यांच्या मालाला किंमत या गोष्टी म्हणजे गावातील सुखांक आहेत. गावातील मुलांनाच छोट्या छोट्या उद्योगांमध्ये कुशल करून त्यांनी शहरात नाही, तर आपल्या गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जाते.”
पुढे ते म्हणाले, “29 वर्षांपूर्वी गडचिरोली नक्षलवादाची राजधानी होती. अशा ठिकाणी ‘एकल शाळा’ चालवणे कठीण काम होते. 29 वर्षांत सरकारकडून संस्थेने कधी अनुदान घेतले नाही. समाजबांधवांच्या सहकार्यातून आपण पाहात असलेले कार्य उभे राहिले. 29 वर्षांपूर्वी आदिवासी विभागाच्या विकासासाठी काम करायच्या केलेल्या निर्धारास आज विशाल स्वरुप प्राप्त झाले आहे. लोक एक रुपयाचे काम करतात आणि हजार रुपयांचा प्रचार करतात; आम्ही हजार रुपयांचे काम करतो आणि एक रुपयाचा प्रचार करतो.”
संस्थेच्या आगामी संकल्पाविषयी बोलताना ते म्हणाले, “काही वर्षांपूर्वी गावात मीठ नसल्याने गावातील लोक लाल मुंग्या ठेचून ते चवीला खायचे, अशी परिस्थिती होती. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले गाव होते. ही परिस्थिती संस्थेने बदलायची ठरवली. समाजाच्या मुख्य प्रवाहात आदिवासींना आणायचे ठरवले. प्रशांत बोपर्डीकर यांच्यासह 1 हजार, 200 शिक्षक मन लावून काम करत आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून आज राज्याच्या प्रत्येक आदिवासी भागात शाळा सुरू करण्याचा मानस आहे. 1 हजार, 200 शिक्षकांची संख्या तीन हजारांवर आणि 30 हजार विद्यार्थ्यांची संख्या एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाढावी, असा संकल्प आहे.”
प्रशांत बोपर्डीकर यांना कर्मयोगी पुरस्कार
कार्यक्रमादरम्यान प्रशांत बोपर्डीकर यांना ‘कर्मयोगी पुरस्कार 2025’ने गौरविण्यात आले. नागपूर येथे 20 वर्षे नोकरी केली. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता 2011 रोजी नोकरीचा राजीनामा दिला. जनजाती पाड्यात काही विद्यार्थी आजही प्रवाहाच्या बाहेर असल्याचे प्रशांत बोपर्डीकरांच्या लक्षात आले आणि त्यांनी चित्र बदलायचे ठरवले. ’एकल एकलव्य विद्यालया’च्या माध्यमातून क्रांती घडवली. आजच्या घडीला 130 हून अधिक पर्यवेक्षक जोडले असून 1 हजार, 35 ‘एकल विद्यालये’ सुरू आहेत.