नवी दिल्ली : भारतातील सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना, याच चढ्या भावांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक गुंतवणुक कंपनी गोल्डमन सॅच याच्याकडून सोन्याचे भाव प्रतितोळा सव्वालाखांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. भारतातील या जबरदस्त वाढीमागे अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेले आयातशुल्कावरुन पेटलेले व्यापारयुध्द, त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता यांमुळे ही भाववाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर सर्वच गुंतवणुकदारांना यामुळे चिंतेने ग्रासले आहे.
गोल्डमन सॅचचा अंदाज काय सांगतो ?
जागतिक गुंतवणुक बँक असलेल्या गोल्डमन सॅचकडून वर्तवल्या गेलेल्या अंदाजात, जागतिक पातळीवर सुरु असलेल्या व्यापारयुध्दाचे विपरित परिणाम सोन्याच्या भांवांवर होणार असे सांगितले आहे. या अनिश्चिततेमुळे जागतिक बाजारात सोन्याचे भाव प्रति औंस ४५०० डॉलर्सवर जातील. भारतीय रुपयांमध्ये बघितलं तर हीच किंमत १ लाख ३० हजारांवरती जाते. त्यामुळे भारतायांची चिंता वाढू शकते. जागतिक मंदीचा धोकासुध्दा यात वर्तवण्यात आला आहे. यामुळे भारतात सोन्याच्या किंमतींत चांगलीच वाढ होऊ शकते.
सोन्याच्या वाढत्या किंमतींमागची कारणे
सोन्याच्या वाढत्या भावांमागे जागतिक बाजारातील अनिश्चितताच जास्त कारणीभूत असल्याचे सांगीतले जाते. अमेरिकेकडून इतर देशांवरील वाढीव आयातशुल्काला स्थगिती दिली गेली असली तरी चीनवर १४५ टक्के आयातशुल्क लादले गेले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीनकडून अमेरिकी वस्तुंवर ८४ टक्के आयातशुल्क लादले गेले आहे. यामुळे व्यापारयुध्द पेटून अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे जगातील गुंतवणुकदारांचा कल सर्वात सुरक्षित अशा सोन्यातील गुंतवणुकीकडे वाढतोय त्यामुळे जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमती भरमसाठ वाढत आहेत.
सोन्यातील गुंतवणुकीला सोन्याचे दिवस
जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवर सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे सोन्यातील गुंतवणुकीला सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. सोन्यातील गुंतवणुक चांगला परतावा देण्याची शक्यता या काळात जास्त आहे. याचसाठी गुंतवणुकदारांनी सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय अवलंबणे फायदेशीर ठरु शकते.