हसवणारा रडवून गेला; कन्नड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ विनोदी अभिनेते 'बँक' जनार्दन यांचे निधन!

    14-Apr-2025   
Total Views | 12
veteran comedian bank janardhan of kannada cinema passes away
 
 
बंगळुर : कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बँक जनार्दन यांचे रविवारी रात्री, १३ एप्रिलला निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जनार्दन गेल्या काही काळापासून आजारी होते आणि त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
 
'बँक जनार्दन' हे नाव कसे पडले?
जनार्दन यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका बँकेत कर्मचारी म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी रंगभूमीकडे वळत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. बँकेत काम केलेल्या पार्श्वभूमीमुळे त्यांना 'बँक जनार्दन' हे टोपणनाव मिळाले, आणि पुढे तेच नाव सिनेसृष्टीतही ओळखले जाऊ लागले.
 
 
२०२३ मध्ये हार्ट अटॅक, त्यानंतर प्रकृती ढासळली:
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची तब्येत हळूहळू बिघडत गेली. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
 
 
कला प्रवासाची सुरुवात रंगभूमीवरून:
जनार्दन यांनी अभिनयाची सुरुवात रंगभूमीवरून केली होती. बँकेतील नोकरीमुळे काही काळ त्यांनी रंगभूमीपासून विश्रांती घेतली होती. परंतु अभिनयाची ओढ पुन्हा रंगभूमीकडे आणि नंतर सिनेमांकडे घेऊन गेली. ‘श्श्श’, ‘तरले नान मगा’, ‘बेलियप्पा बंगारप्पा’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

५०० हून अधिक चित्रपटांत केले अभिनय
1948 मध्ये जन्मलेले बँक जनार्दन हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक खूपच ओळखीचे नाव होते. त्यांची कॉमिक टाइमिंग आणि सहायक भूमिकांमधील ताकद यामुळे ते विशेष प्रसिद्ध होते. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. वडिलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिका असोत की विनोदी पात्रं – त्यांची अभिनयशैली ही हळुवार आणि प्रभावी होती.

कन्नड सिनेसृष्टीत शोकाचे वातावरण:
बँक जनार्दन यांच्या निधनाने संपूर्ण कन्नड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणताही अधिकृत निवेदन आलेले नाही.


 

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121