अंधार्या रात्रीवर मात करीत, सकाळी आकाशातील सूर्याकडे पाहिले की, आपल्याला प्रसन्न वाटते. कधीतरी त्या सूर्याला तुमच्याकडे पाहून प्रसन्न वाटण्याची संधी द्या. अशी सूर्याला तुमच्याकडे पाहून हसण्याची संधी मिळावी, यासाठी प्रचंड मेहनत, तपस्या करावी लागते. या तपस्येत गुरूसुद्धा तसाच असावा लागतो. विदर्भातील काहीशा मागास किंवा दुर्लक्षित अशा गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ अशा सात जिल्ह्यांमध्ये, दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांकडे सूर्याला पाहून हसता यावे, यासाठी एक संस्था निरलसपणे गेल्या 29 वर्षांपासून काम करते आहे. अशा दुर्लक्षित, आदिवासी किंवा वंचित मुलांसाठी काम करणार्या या संस्थेचे नाव आहे ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था.’
कै. लक्ष्मणराव मानकर हे गोंदिया या दुर्गम जिल्ह्यातील आमगाव या छोट्याशा गावचे. मानकर गुरुजींना परिस्थितीमुळे आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण, यामुळे खचून न जाता लक्ष्मणराव मानकर यांनी देशसेवेचे व्रत हाती घेतले आणि जोपासलेही. आपल्याला शिक्षणाच्या अभावामुळे अनेक गोष्टी करता आल्या नाहीत, याची खंत मानकर गुरुजी कायम बोलून दाखवत. यामुळेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेची पूर्तता करण्याचा चंग, त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधला आणि एका वटवृक्षाचे बीजरोपण झाले. 29 वर्षांपूर्वी काही कार्यकर्त्यांनी एकत्र येत, अवघ्या चार विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ‘एकलव्य एकल विद्यालया’ची सुरुवात केली.
जंगल, खेड्यात वस्ती करून राहणार्या बांधवांना बदलत्या सामाजिक आणि आर्थिक अडचणींमुळे, असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक मूलभूत आणि पायाभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यातसुद्धा, अनेकदा अडचणी निर्माण होतात. अशा अडचणींचा सामना करणार्या अनेकांच्या घरी शिक्षणाचा दिवा लावण्याचे काम, ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती समिती’ने हाती घेतले. सध्या विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ अशा सात जिल्ह्यांमध्ये, ‘एकलव्य एकल विद्यालया’च्या माध्यमातून 1 हजार, 135 एक शिक्षकी शाळांमधून आज 30 हजार, 382 विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, या सगळ्या कामाचे पालकत्व गेल्या 28 वर्षांपासून स्वीकारले आहे. इतकी वर्षे केवळ निष्ठा आणि कर्तव्याच्या भावनेतून कोणत्याही प्रकारे कामाचा गाजावाजा न करता, नितीन गडकरी यांनी शिक्षणातून समाज निर्मितीचा लावलेला दिवा अखंड तेवत आहे आणि राहील.
या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या बरोबरच, आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टींची माहिती, ज्ञान देण्याचा प्रयत्न या शाळांमधून केला जातो. या ‘एकलव्य एकल विद्यालया’च्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि शिक्षणाच्या दृष्टीने मागास भागात, एक शिक्षकी शाळांच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. या शिक्षणाच्या गंगेचा प्रवास ‘एकलव्य एकल विद्यालय’ या मार्गाने सुरू झाला.
आपण ‘एकलव्य एकल विद्यालया’च्या माध्यमातून सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञाची यावर्षीची आकडेवारी, या संस्थेच्या कामाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता लक्षात आणून देणारी आहे. गडचिरोलीमध्ये ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’च्या माध्यमातून, 340 एकल शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये 10 हजार, 120 विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 40 शाळांच्या माध्यमातून 1 हजार, 290 विद्यार्थी, भंडारा जिल्ह्यात 30 शाळा, तर गोंदिया जिल्ह्यात 160 शाळांच्या माध्यमातून 5 हजार, 588 विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचा उपक्रम सुरू आहे. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटसह 180 दुर्गम भागातील शाळांच्या माध्यमातून, 6 हजार, 068 तर अकोल्यात 53 आणि बुलढाण्यात 52 शाळांमधून अनुक्रमे 1 हजार, 350 आणि 1 हजार, 296 विद्यार्थी एकल विद्यालयात येऊन शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
यवतमाळसारख्या जिल्ह्यातसुद्धा 180 एकलव्य एकल शाळांच्या माध्यमातून 3 हजार, 640 विद्यार्थी याब उपक्रमात सहभागी होतात. म्हणजे आठ जिल्ह्यांमध्ये मिळून 24-25 या वर्षासाठी 1 हजार, 035 शाळा आणि तेवढ्याच म्हणजे 1 हजार, 035 शिक्षकांच्या माध्यमातून, 30 हजार, 382 विद्यार्थी शिक्षणाच्या ज्ञानगंगेत सहभागी होत आहेत. या सगळ्या एकलव्य एकशिक्षकी शाळा उत्तम पद्धतीने चालाव्यात, यासाठी ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’चे 134 कार्यकर्ते या सगळ्या आठ जिल्ह्यांमध्ये सतत प्रवास करतात. शाळा नीट चालाव्यात, विद्यार्थी-शिक्षकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी कर्तव्यदक्ष असतात. पण, हा प्रवास इथेच थांबत नाही तर सुरू होतो.
या शाळांमध्ये गावातीलच बारावी उत्तीर्ण किंवा स्थानिक युवक-युवतींना, शिक्षक म्हणून नियुक्त केले जाते. यामुळे त्यांना रोजगाराची संधी मिळते आणि विद्यार्थ्यांनाही, परिचित शिक्षक मिळतात. शाळेच्या वेळा गावकर्यांच्या सोयीप्रमाणे ठरवल्या जातात. काही ठिकाणी सकाळी, तर काही ठिकाणी सायंकाळी तीन तासांच्या सत्रांमध्ये शिक्षण दिले जाते. उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी धडपडणार्या या शिक्षकांना, उत्तम प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे कामसुद्धा ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’च्यावतीने केले जाते.
या विद्यालयांमध्ये केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. अक्षरओळख, पाढे, इंग्रजी मुळाक्षरे यांसोबतच शारीरिक व्यायाम, खेळ, देशभक्तीपर गीते आणि प्रेरणादायी कथा सांगून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाला प्रोत्साहन दिले जाते. त्याचबरोबर नियमित हजेरी, स्वच्छता आणि आरोग्यावर विशेष लक्ष देऊन, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम करण्याचा प्रयत्न केला जातो.
आज शिक्षणाबरोबरच कौशल्यांचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’ने गडचिरोली, धानोरा आणि त्याच्या आसपासच्या भागांतील तरुणांसाठी, लघुउद्योग प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. यातून गाडी दुरुस्ती, शेविंग सलून, फॅन्सी दुकान, मोबाईल रिपेअरिंग, सीताफळ प्रक्रिया, बेकरी, पापड-लोणचं तयार करणे, अशा विविध व्यवसायांची ओळख आणि याचे प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम तरुणांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेन उचललेले, एक ठोस पाऊल ठरला आहे.
महिलांचे आर्थिक सबलीकरण हे समाजप्रगतीचे मूळ आहे. संस्थेने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, अनेक ठिकाणी बचत गट स्थापन केले आहेत. या गटांद्वारे, त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. उदा. शिवणकाम, शेती प्रक्रिया उद्योग, छोटे दुकान इत्यादी. या स्त्रियांनी केवळ स्वतःच्या संसारात बदल घडवला नाही, तर आपल्या गावातही आदर्श उभा केला आहे.
समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी, शिक्षण हा महत्त्वाचा घटक असतोच. पण, त्याशिवाय महत्त्वाच्या असलेल्या विविध विषयातसुद्धा ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था’ समरसून काम करते आहे. ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जलसंवर्धन, महिला बचत गट, शेतकरी बचत गट या माध्यमातून, समग्र ग्राम विकासाचे ध्येय ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’ने अंगीकारले आहे. ‘एकलव्य एकल विद्यालया’च्या दुसर्या टप्प्यात अपघात वीमा संरक्षण, ‘उज्ज्वला गॅस योजना’ आणि ‘अटल पेन्शन योजना’ या सरकारी योजनांचा लाभ फक्त एकल विद्यालयाच्याच मुलांना आणि पालकांनाच नाही, तर सगळ्या गावकर्यांना मिळण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून नियोजनबद्ध काम सुरू आहे.
‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’च्या कामाचा हा फक्त धावता आढावा आहे. कारण, संस्थेने गेल्या 29 वर्षांत म्हणजे जवळ जवळ तीन दशकांत, माणूस आणि पर्यायाने समाज घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. समाज आणि माणूस निर्मितीच्या या कामाच्या अनेक यशोगाथा आहेत. अशा संस्थेच्या माध्यमातून, एक अनोखा असा पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच मुंबईत होत आहे. विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतून सुरू झालेल्या या कामाला, आता राज्याच्या सर्व जिल्ह्यात ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’चे काम नेण्याचा नितीन गडकरी यांचा प्रयत्न आहे. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेले 30 हजार विद्यार्थी, या उपक्रमाचा भाग आहेत. पण, गरजू अशा सुमारे एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचा, ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’चा प्रयत्न आहे. या पथदर्शी आणि प्रकाशझोताच्या बाहेर राहिलेल्या ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’चा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.
- निकिता भागवत