समृद्धी महामार्गासाठी एमएसआरडीसीचा गौरव

व्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार गायकवाड यांनी स्वीकारला सन्मान

    14-Apr-2025
Total Views | 5

MSRDC


मुंबई, दि. १४: प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या यशस्वी उभारणीसाठी प्रतिष्ठेचा "स्कॉच पुरस्कार- २०२५" प्रदान करण्यात आला आहे. एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांना नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या १०० व्या स्कॉच समिटमध्ये प्रदान करण्यात आला. 

महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलणारा पथदर्शी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. यामुळे,आज महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेला एका नवा आयाम प्राप्त झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात डॉ.अनिलकुमार गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना समृद्धी महामार्गाच्या उभारणीचा प्रवास उलगडला. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी मिळालेला स्कॉच पुरस्कार म्हणजे एमएसआरडीसीच्या सर्व सहकाऱ्यांचे कामाप्रती समर्पण आणि मेहनतीचा सन्मान आहे. अनेक आव्हानांवर मात करून आम्ही राज्यातील सर्वात लांब एक्सप्रेसवे विक्रमी वेळेत पूर्ण केला.


हा यशस्वी प्रकल्प आम्हाला भविष्यातही महाराष्ट्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्रेरित करत राहील, असा आशावाद डॉ.गायकवाड यांनी व्यक्त केला तर हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा उच्च-गतीचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आहे. जो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांतील २६ तालुक्यांमधील ३९२ गावांना थेट जोडतो या महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवासाचा कालावधी १६-१८ तासांवरून अवघ्या ७-८ तासांवर आला आहे. याशिवाय, हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशांतील कृषी आणि औद्योगिक विकासास चालना देत असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देत असल्याचे ही डॉ.गायकवाड यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. 

प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार नेमका काय ? 

२००३ मध्ये स्थापन झालेला स्कॉच पुरस्कार हा प्रशासन, समावेशक विकास, तंत्रज्ञान उत्कृष्टता, कॉर्पोरेट नेतृत्व, नागरिक सेवा वितरण या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारताला अधिक प्रगत आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्ती, प्रकल्प आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121