आपण 35 लेखांत योग म्हणजे नेमके काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग हे साधनेचे, तपाचे शास्त्र आहे. कोणी योगाकडे व्यायामाचे शास्त्र म्हणून बघत असेल, तर त्याचा तो अर्धवट समज आहे.
1) शरीरासाठी निरनिराळी अशी एकूण 84 आसने योगशास्त्रात दिली आहेत. पण ती व्यायाम म्हणून नव्हे, तर शरीराचे तप म्हणून स्वीकारायची आहेत. दुःख स्वीकार म्हणून करायची आहेत. स्वतःहून दुःख स्वीकार केले, तर सुख म्हणजे शरीरस्वास्थ्य आपोआपच येते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आपआपल्या प्रकृतीनुसार आसनांची निवड करावी किंवा ज्याला प्रकृतीचे निदान येते व योगही येतो, अशा तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. उगाचच टीव्हीवर, पुस्तकात बघून प्रकृतीविरुद्ध आसने करू नयेत. त्याने फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. ‘सबके लिए एक दवा’ हे सूत्र योगशास्त्रात नाही. अन्यथा 84 प्रकारची आसने दिली नसती.
2) प्राणायाम ही शरीर व मनासाठीची शुद्धीक्रिया आहे. मनात सात्विक भाव निर्माण करण्यासाठीचे ते उत्तम साधन आहे. अनेक प्रकारचे प्राणायाम आहेत. त्यांपैकी काही मुख्य आपण ‘प्राणायाम’ या लेखांक साखळीत बघितले. प्रत्येक प्राणायामाचे तंत्र वेगळे आहे. ते अनुभवी योगसाधकाकडून, अनुभवी योगशिक्षकाकडून शिकून घेणे अनिवार्य आहे. शिकण्याच्या प्रक्रियेत लाज व कमीपणा बाळगू नये. योगाचे कोणतेही अंग अभ्यासताना, शिकताना नम्रता बाळगावी.
योगसाधकाने स्वतःला प्रश्न विचारावा, मी काय केले? परिणामतः मला हा जन्म मिळाला?
त्याचे उत्तर भगवंताने गीतेत दिलेले आहे.
जन्म कसा होतो?
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्॥
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 8
अर्थ : आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे, पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मांनुसार उत्पन्न करतो. मग, या जन्मी कर्म करताना काय दक्षता घ्यावी, तर यम, नियम पाळत कर्म करावे.
3) यम, नियम : पहिले व दुसरे अंग. स्वाभाविकतः आसन, प्राणायाम करणार्याचे मन सात्विक होत जाते. अशा मनाला सात्विक दिनचर्या आवडते, अन्यथा मानसिक तणाव वाढत जाऊन शरीरात रोग बळावतात व हजारो वर्षे भारताच्या संस्कृतीमध्ये असलेल्या या सिद्ध शास्त्राविषयी शंका निर्माण होतात. त्याकरिता आपली दिनचर्या शूचिर्भूत होऊन, शुद्ध व पवित्र ठेवावी. यम, नियमांचा अभ्यास करून, प्रामाणिकपणे शनैः शनैः ते आपल्या जीवनात उतरवावेत. त्यामुळे स्वतःमध्ये खालील गुणांचा विकास होईल.
यम : सामाजिक शिस्त पाच आहेत. त्यांचे कर्म करताना प्रामाणिकपणे पालन केल्यास कोणते लाभ होतात, त्याची विस्तृत चर्चा आपण संबंधित लेखात केली आहे. इथे फक्त उजळणी करू :
1) सत्य पालनाने धैर्यप्राप्ती.
2) अहिंसा पालनाने निर्वैरता (मत्सर न होणे)
3) अस्तेय (चोरी न करण्याची कला) पालनाने निर्भयता प्राप्त होते.
4) अपरिग्रह पालनाने पर्याप्ततेची भावना निर्माण होते. आणि
5) ब्रह्मचर्य पालनाने (वरील शिस्त पाळल्यास आपोआप पाळल्या जाते) पावित्र्यता निर्माण होते.
नियम : वैयक्तिक शिस्त पाच आहेत.
1) शौच (शुद्धता) : शरीर, मन व साधनांचा शौच केल्यास, जीवन पवित्र व सात्विक होते.
2) संतोष : परिस्थितीचे तौलनिक आकलन करून, आपल्या अधिपत्याखालील परिस्थितीवर काम केल्यास संतोष म्हणजे समाधान प्राप्त होते.
3) तप : म्हणजे सातत्य. कोणतेही व्रत अपयशाने खचून न जाता सातत्याने करीत राहिल्यास, आत्मविश्वास वाढतो.
4) स्वाध्याय : आपण शिक्षित आहोतच, सुशिक्षित होण्याचा प्रयत्न केल्यास जीवनाचा खरा अर्थ कळून, आपपर भाव मिटतो.
त्यामुळे सर्वांभूती परमेश्वर बघण्याची वृत्ती होऊन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित न राहता विशाल होतो.
5) ईश्वरप्रणिधान : सर्व कर्म ईश्वराला अर्पण केल्याने कर्मदोष न लागता, संचित निर्माण होत नाही व जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होण्याची शक्यता निर्माण होते.
डॉ. गजानन जोग
(क्रमशः)
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
9730014665