मुंबई : भारतातील ऑनलाईन व्यवहारांसाठी महत्वाचे माध्यम असलेले युपीआय ठप्प झाले. शनिवारी १२ एप्रिल रोजी युपीआय सहा तास बंद होते. सर्वच ऑनलाईन व्यवहार बंद झाल्यामुळे देशातील अनेकांची गैरसोय झाली. याच युपीआय बंद पडण्याच्या घटनांचा आढावा घेऊन एक अहवाल प्रकाशित झाला आहे. युपीआयच्या संचलनाची जबाबदारी असलेल्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संकेत स्थळावर प्रकाशित झालेल्या माहितीचा आधार या अहवालासाठी घेतला गेला आहे. २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या काळात १७ वेळा युपीआयची सेवा ठप्प झाली आणि त्यातून महत्वाचे म्हणजे ४ कोटींहून अधिक व्यवहारांवर परिणाम झाले आहेत.
युपीआय बंद पडण्याच्या घटना किती?
२०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या काळात युपीआय १७ वेळा बंद पडले. यात सगळे मिळून जवळपास १ हजार मिनीटे युपीआय बंद होते. यात वर्षवार माहिती बघितली तर २०२० मध्ये १३७ मिनीटे युपीआय सेवा बंद होती. २०२१ मध्ये ६२ मिनीटे, २०२२ मध्ये ३०८ मिनीटे, २०२३ मध्ये १८४ मिनीटे सेवा बंद होती, २०२४ मध्ये २०७ मिनीटे, २०२५ मार्च महिन्यापर्यंतची माहिती बघितली तर ९५ मिनीटे सेवा बंद होती. या सगळ्यामुळे एकूण ४ कोटींपर्यंत व्यवहार ठप्प झाले. यात मागील आठवड्यात शनिवारी झालेला बिघाड समाविष्ट नाही.
युपीआय वारंवार बंद का पडत आहे?
भारतात ऑनलाईन व्यवहारांसाठी युपीआयचा वापर केला जातो. त्याचे नियंत्रण करण्याचे काम हे भारत सरकारची कंपनी असलेली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करते. जरी या संस्थेकडे याचे नियंत्रण असले तरी प्रामुख्याने हे सर्व व्यवहार त्रयस्थ अॅप्सद्वारेच होत असतात. ही अॅप्स म्हणजे गुगल पे, फोन पे, पेटीएम, सुपर मनी यांसारख्या अॅप्सच्या मार्फत युपीआय कोड द्वारेच हे व्यवहार होतात. आता देशातील एकूण ऑनलाईन व्यवहारांचा आकडा बघितला तर त्यातील ४७.२५ टक्के व्यवहार हे फक्त फोन पे द्वारेच होतात. तर ३६.०४ टक्के व्यवहारांनी गुगल पे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाकीची सर्व अॅप्स बाकीचा टक्का व्यापतात. या सर्व अॅप्सवरुन एकाच वेळी होत असलेल्या प्रचंड व्यवहारांमुळे युपीआय ठप्प होण्याचे प्रमाण वाढते आहे असे स्प्टीकरण देण्यात आले आहे.
यासाठी नेमके कुठले उपाय करणे गरजेचे आहे ?
भारतात यासर्वा युपीआय व्यवहारांचे नियमन करणारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय ही एकच संस्था आहे. या संस्थेकडून दिवसाला ६० कोटी व्यवहार हाताळले जातात. त्यामुळे हा खुपच मोठी ताण निर्माण होतो आहे. यावर रिझर्व्ह बँकेने लवकरात लवकर ही यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकाच संस्थेवर सगळा भार पडत असल्याने लवकरात दुसरी सक्षम यंत्रणा उभारणे हे महत्वाचे काम आहे. यातूनच या व्यवहारांत सुसुत्रता येऊन या व्यवहारांना अधिकाधिक सक्षम करणे शक्य होईल.