रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला मिळणार विक्रमी लाभांश
अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा ३० हजार कोटी जास्त मिळणार
14-Apr-2025
Total Views | 10
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून भारतसरकारला यंदाच्या आर्थिक वर्षात विक्रमी लाभांश मिळण्याची शक्यता आहे. २०२५ या आर्थिक वर्षासाठीचा हा लाभांश तब्बल २.५ लाख कोटींपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात हाच लाभांश २.२ लाख कोटी असण्याची शक्यता गृहीत धरण्यात आला होता. त्यापेक्षा तब्बल ३० हजार कोटी सरकारला जास्त मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून ही लाभांशाची रक्कम वाढतेच आहे. येत्या मे महिन्यात हा लाभांश सरकारला हस्तांतरित करण्याची शक्यता आहे.
भारत सरकारला मिळणाऱ्या या लाभांशामुळे भारत सरकारला आपली महसुली तूट आटोक्यात ठेवण्यास मदत होणार आहे. २०२४ या आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेने भारतसरकारला २.११ लाख कोटींचा लाभांश दिला होता. त्यात आता तब्बल ३० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची भर पडणार आहे. रिझर्व्ह बँकेशिवाय भारत सरकारला सरकारी कंपन्यांकडून सर्वात जास्त लाभांश मिळाला आहे. त्यातून सरकारला ७४, ०१६ कोटी इतका लाभांश मिळाला आहे. या लाभांशातही १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँकेला लाभांश कुठून मिळणार
१) डॉलरविक्रीतून मिळणारा नफा – भारतीय रिझ्रर्व्ह बँकेने रुपयाच्या घसरण सुरु असताना आपल्या गंगाजळीतील डॉलर्सची विक्री केली होती. या व्यवहारांतून रिझर्व्ह बँकेला मोठा नफा मिळाला आहे.
२) बँकांकडून मिळालेले व्याज – रिझर्व्ह बँकेने भारतीय बँकांना दिलेल्या कर्जावरील व्याजातूनही उत्पन्न मिळाले आहे.
३) गुंतवणुकीवरचे व्याज - विविध पोर्टफोलिओमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून मिळालेला नफा. यासर्वांतून रिझर्व्ह बँकेला नफा मिळाला आहे.
२०२५ या वर्षासाठी मिळणारा लाभांश हा मोठा असला तरी काही अर्थतज्ज्ञांच्या मते लाभांशाची हीच रक्कम ३.५ लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे.