"मराठी म्हणून एकत्र येणं हे..."; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    14-Apr-2025
Total Views | 27
 
Raj Thackeray
 
मुंबई : आपण मराठी म्हणून एकत्र येणे, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणे आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे योग्य स्मरण ठरेल, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
 
राज ठाकरे म्हणाले की, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसे सडेतोड उत्तर दिले होते, याचे स्मरण होणे आवश्यक आहे."
 
  
बाबासाहेबांची 'ती' आठवण!
 
"संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितले होते. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असे सांगितले होते. इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनले. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हेदेखील उपस्थित असायचे. स्वतः बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावे या मागणीला पाठींबा देणारे निवेदन दिले होते. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचे विस्तृत विवेचन आहे आणि हे विवेचन Maharashtra As A Linguistic Province मध्ये वाचता येईल.
 
"हे सगळे सविस्तर सांगायचे कारण असे की, बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणे केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असे होत नाही. मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही. पुढे बाबासाहेबांचे निधन झाले. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी. सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी. सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी देसाईंना जेरीस आणले होते. पुढे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचे योगदान हे विसरता येणार नाही."
 
...तर या लढ्याला काय अर्थ? 
 
"आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ? आपण मराठी म्हणून एकत्र येणे, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणे आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणे हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे योग्य स्मरण ठरेल," असेही राज ठाकरे म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121