मुंबई, दि.१४ : विशेष प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जी-ब्लॉकमधील सी-८२ क्रमांकाचा भूखंड नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाला (एनएसई) देण्याच्या निर्णयाला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. एमएमआरडीएच्या भूविक्री नियमावली, १९७७ मधील नियम क्रमांक १६ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १५९व्या प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी सुमारे ४ ते ५ लाख चौ. फूट बांधकाम क्षेत्रफळाच्या अतिरिक्त भूखंडाची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने एमएमआरडीएने एनएसईसारख्या वित्तीय संस्थेचे महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. यापूर्वी, १९९३ साली एमएमआरडीएने जी-ब्लॉकमधील १६,०३८.३ चौ. मी. क्षेत्रफळ आणि ३१,०४४.०५ चौ. मी. बांधकाम क्षेत्रफळ असणारा भूखड ‘एक्सचेंज प्लाझा’ या एनएसईच्या मुख्यालयासाठी मंजूर केला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले, "एनएसईला सी-८२ क्रमांकाचा भूखंड देण्याचा निर्णय बीकेसीला एक प्रमुख वित्तीय केंद्र म्हणून अधिक सक्षम करण्याच्या एमएमआरडीएच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, "मुंबईतील वाणिज्य पायाभूत सुविधा विकसित करण्यावर एमएमआरडीएचा विशेष भर आहे. एनएसईला सी-८२ क्रमांकाचा भूखंड दिल्यामुळे एनएसईच्या विस्तारास हातभार लागेल आणि बीकेसी हे एक आघाडीचे व्यवसाय केंद्र म्हणून अधिक बळकट होईल."
महाराष्ट्र सरकारच्या जुलै, २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार, एनएसईने एमएमआरडीएकडे आवश्यक प्रीमियम भरल्यास त्यांना अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ मिळू शकेल. वांद्रे-कुर्ला संकुलातील सी-८२ क्रमांकाचा भूखंड एनएसईला देण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावास उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष यांच्या मान्यतेनंतर प्राधिकरणाच्या कार्योत्तर मंजुरीच्या अटीवर ही मंजुरी देण्यात आली आहे.
नवीन भूखंडचा तपशील :
• भूखंड क्रमांक : सी-८२
• क्षेत्रफळ : ५,५०० चौ. मी.
• अनुज्ञेय एफएसआय : ४.००
• नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्रानुसार अनुमत उंची : ६९.५२ मीटर
• बांधकाम क्षेत्रफळ : २२,००० चौ. मी.
• भाडे करार कालावधी : ८० वर्षे
• वापर : नॅशनल स्टॉक एक्सचेंजसाठी नवीन प्रशासकीय इमारत (व्यावसायिक वापर)
• भाडे करार शुल्क (प्रीमियम) : ₹७५७.९० कोटी
----------
"हा निर्णय वित्तीय विकास आणि पायाभूत सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्राच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजला वांद्रे-कुर्ला संकुलात विस्ताराची संधी देऊन आपण मुंबईची, भारताची आर्थिक राजधानी म्हणून असलेली ओळख अधिक बळकट करत आहोत. तसेच महत्त्वाच्या संस्थांसाठी सक्षम आणि अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करत आहोत."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री