‘डॉ. आंबेडकर चौक विकास संघ कुर्ला’ची भीमजयंतीची गौरवशाली परंपरा

    14-Apr-2025
Total Views | 10
 
Dr. Ambedkar Chowk Vikas Sangh Kurla
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. 14 एप्रिल रोजी, कुर्ला परिसरात एक भव्य उत्सव साजरा होतो. सुरुवातीपासून या उत्सवाचे प्रमुख आयोजक असलेल्या ‘डॉ. आंबेडकर चौक विकास संघा’ची स्थापना 1962 मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत या संघाने या उत्सवाचे उत्तम आयोजन केले आहे. सुरुवातीला पारंपरिक लेझीम, बँड पथक आणि बैलगाड्यांवर सजवलेल्या झांक्यांद्वारे मिरवणूक काढली जायची. या झांक्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांसारख्या थोर महापुरुषांचे देखावे साकारण्यात येत असत. त्याकाळीही बाबासाहेबांविषयी असलेला अभिमान आणि अनुयायांचा उत्साह अफाट असे.
 
आजही ही परंपरा कायम ठेवत, ‘डॉ. आंबेडकर चौक विकास संघा’च्या पुढच्या पिढ्यांनी हा उत्सव अधिक भव्य आणि सामाजिक भान राखणारा केला आहे. या उत्सवाला एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारा हा उत्सव आता तब्बल पंधरवड्याचा असतो. यावेळी धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचाही समावेश उत्सवात केला जातो. विविध वयोगटांतील व्यक्तींसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व, गायन स्पर्धा तसेच क्रिकेट सामने आयोजित केले जातात. या स्पर्धांमधून करमणूकीबरोबरच, विद्यार्थ्यांना थोर पुरुषांचे विचार आणि त्यांचे कार्य यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न संस्थेचा असतो.
 
दि. 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता, डॉ. आंबेडकर चौकाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या उत्सवाचा शुभारंभ होतो. विविध पक्षांचे नेते, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून यावेळी अभिवादन करतात. ढोल-ताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि भीमगीतांचा जल्लोष, यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
 
दि. 14 एप्रिल रोजी काढण्यात येणारी भव्य मिरवणूक हा या उत्सवाचा मुख्य आकर्षणबिंदू असतो. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा, त्यांच्यावरील प्रेरणादायी गाणी, ट्रकवर मांडलेले देखावे आणि महापुरुषांचे भव्य बॅनर्स यांचा समावेश असतो. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, चक्रवर्ती सम्राट अशोक, सुभेदार रामजी सकपाळ आणि रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव या झांक्यांमधून केला जातो. ही मिरवणूक संपूर्ण कुर्ला विभागात फिरत असल्यामुळे ,विभागातील विविध मंडळांकडून तिचे स्वागत होते. ठिकठिकाणी थंड पेये, मिष्टान्न आणि इतर वस्तूंचे वाटप करून मिरवणुकीतील सहभागींचे स्वागत केले जाते.
 
या उत्सवाचे व्यवस्थापन इतके चोख असते की, आजवर एकदाही कुठलीही गैरसोय किंवा गालबोट लागलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणारी ही मिरवणूक केवळ आनंदाचा उत्सव नसून सामाजिक समरसता, बंधुभाव आणि समतेचे प्रतीक झाली आहे.
 

Dr. Ambedkar Chowk Vikas Sangh Kurla 
 
दि. 16 एप्रिल रोजी या उत्सवाचा समारोप प्रबोधनात्मक कार्यक्रमाने केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण आणि सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण या कार्यक्रमात केले जाते. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर हजेरी लावतात.
 
या सार्‍या परंपरेचा एक ऐतिहासिक भाग म्हणजे, पंचशील बुद्ध विहार. ‘डॉ. आंबेडकर चौक विकास संघा’च्यावतीने उभारण्यात आलेल्या या विहारात, प्राचीन उत्खननातून मिळालेली तथागत बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. 1972 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती मूर्ती ‘डॉ. आंबेडकर चौक विकास संघा’च्या कार्यकर्त्यांना भेट दिली होती. त्या मुर्तीची स्थापना अत्यंत श्रद्धेने येथे करण्यात आली.
 
आज ‘डॉ. आंबेडकर चौक विकास संघ’ केवळ जयंती साजरी करणारी संस्था नसून, सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक झाली आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि समाजमनांत समानतेची भावना जागवण्याचे कार्य, ही संस्था गेली अनेक दशके करत आहे आणि येणार्‍या काळातही ही प्रेरणा नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत राहील.
 
भीमजयंती म्हणजे बाबासाहेबांना प्रेरणा म्हणून आत्मसात करण्याचा महोत्सव
 
कुर्ला विभागात भीमजयंती उत्सवा निमित्त निघणार्‍या भव्य मिरवणुकीची गेल्या 62 वर्षाची उत्साही परंपरा अखंड राहण्यासाठी डॉ आंबेडकर चौक विकास संघ सदैव प्रयत्नशील आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ एका समाजापूर्त मर्यादित न ठेवता त्यांना व्यापक विचारांचे प्रेरणास्रोत म्हणून जनमानसात रुजवण्यासाठीची संधी ही आम्हाला भीमजयंती मुळे सार्वजनिक रित्या मिळते. कुर्ला विभागात भीमजयंती महोत्सवाच्या यशाचे श्रेय हे समुचय आंबेडकर प्रेमी आणि उत्सवात सहभागी होणार्‍या जनतेचे आहे.
 
विशाल वाघमारे,
सरचिटणीस, डॉ. आंबेडकर चौक विकास संघ
 
- सागर देवरे 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121